
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा
Solapur Agriculture Loan Update : शेतकऱ्यांना पीककर्ज देताना ‘सीबिल स्कोअर’ची ()अट घालू नये, असे आदेश राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीने (एसएलबीसी) सर्वच राष्ट्रीयीकृत व सहकारी बॅंकांना दिले आहेत.
‘सीबिल’च्या आडून शेतकऱ्यांची अडवणूक करू नये, असेही ‘एसएलबीसी’ने स्पष्ट केले आहे. पण तो शेतकरी कोठेही थकबाकीदार नसल्याची पडताळणी करूनच कर्जवाटप करण्याच्याही सूचना केल्या आहेत.
भाजप-शिवसेना व महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली. अनेक थकबाकीदार कर्जदारांनी बॅंकांशी तडजोड करून कर्जाचा भरणा केला.
काही वेळा फायनान्स कंपन्या किंवा पतसंस्था, नागरी बॅंकांकडून घेतलेले वाहन, गृहकर्ज थकबाकीत गेले होते आणि उशिराने फेडल्याने देखील ‘सीबिल’ स्कोअर कमी झालेला असतो.
त्यामुळे अशा लाखो शेतकऱ्यांना बॅंकांच्या ‘सीबिल’ सक्तीमुळे कर्ज मिळू शकत नव्हते. राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनीही त्यासंबंधीचे पत्र ‘एसएलबीसी’ला पाठवले होते. तरीपण काही बॅंका पीककर्ज देताना ‘सीबिल’ची सक्ती करीत होते.
या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘सीबिल’ स्कोअरची सक्ती करणाऱ्या बॅंकांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा दिला आहे. त्यामुळे ‘एसलबीसी’ने रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाकडे मार्गदर्शन मागविले होते.
त्यानंतर शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपावेळी ‘सीबिल स्कोअर’ कमी असल्याचे कारण सांगून कोणत्याही बॅंकांनी अडवणूक करू नये, अशा सक्त सूचना ‘एसएलबीसी’कडून देण्यात आल्या आहेत.
खरिपात ७० हजार कोटींच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट
यंदाच्या खरीप हंगामात राज्यातील ६४ लाख ७० हजार शेतकऱ्यांना विविध बॅंकांच्या माध्यमातून ७० हजार कोटींचे कर्जवाटप केले जाणार आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांना जवळपास ३० हजार कोटींचे टार्गेट असणार आहे.
राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीच्या माध्यमातून बॅंकांना आता तेवढे उद्दिष्ट दिले जाणार आहे. १०० टक्के कर्जवाटप व्हावे, यादृष्टीने देखील सूचना देण्यात आल्या आहेत.
‘सीबिल’ शून्य असले तरीही मिळणार कर्ज
ज्या शेतकऱ्याचा सीबिल स्कोअर शून्य किंवा मायनस एक आहे, अशा शेतकऱ्यांना बॅंकांनी तातडीने कर्ज द्यावे. त्या शेतकऱ्यांना आजवर कोणाकडूनही कर्ज घेतले नसल्याने त्यांना कर्ज देण्यास कोणतीही अडचण नसेल.
पण ज्या मोठ्या थकबाकीदार शेतकऱ्यांनी तडजोडीतून ‘ओटीएस’द्वारे (एकरकमी कर्जाची परतफेड) कर्जाची परतफेड केली आहे, त्या शेतकऱ्यांना कर्ज देताना वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंजुरी घेऊनच कर्ज द्यावे, अशाही सूचना ‘एसएलबीसी’ने केल्या आहेत.
कर्ज देण्यापूर्वी संबंधित कर्जदाराचा ड्यू-डिलिजन्स (यथायोग्य कार्यशक्ती) पडताळणी करून कर्जवाटप करावे, असेही स्पष्ट केले आहे.
शेतकऱ्यांना पीककर्ज देताना बॅंकांनी सीबिल स्कोअरची सक्ती करू नये, अशा ‘एसएलबीसी’कडून सर्वांना सूचना प्राप्त झाल्या आहेत. पण संबंधित कर्ज मागणारा व्यक्ती दुसऱ्या कोणत्याही वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा, अशी अट आहे.
- प्रशांत नाशिककर, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बॅंक, सोलापूर
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.