
शहरटाकळी, ता. शेवगाव ः परतीच्या पावसाने खरिपातील मुख्य कापूस (Cotton) आणि सोयाबीन (Soybean) या पिकाची मोठ्या प्रमाणावर वाताहत झाली. नगदी पिके हातची गेली. शिवाय शासनाची मदत आणि पीकविमा (Crop Insurance) अद्यापही मिळालेला नाही. यातच खरीप पेरणीस घेतलेली खासगी कर्ज व कृषी दुकानदारांची उधारी कशी फिटणार? याची चिंता आता शेतकऱ्यांना आहे. असे असले तरी रब्बीतील गहू, हरभरा, कांदा पिकाच्या पेरणीसाठीही शेतकऱ्यांना ओढाताण करावी लागत आहे. खासगी सावकारांकडून कर्ज आणि कृषी दुकानदार उधारीने बियाणे देत नसल्याने अल्पभूधारक शेतकरी आता मोठ्या संकटात सापडला आहे.
नैसर्गिक आपत्तीने शेती वर्षानुवर्षे धोक्यात आहे. अधिक उत्पन्न मिळावे, या हेतूने हजारो रुपये खर्च करून
देखील पिकास करण्यात आलेला खर्च पदरात पडत नाही. गत वर्षी अतिवृष्टीत खरडून गेलेल्या खरिपाचे नुकसान सहन करत यंदा शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरिपात कापूस, सोयाबीन, तूर, बाजरी आदी पिके घेतली. मागील वर्षी सोयाबीन आणि कापूस यास हमीभावापेक्षा अधिक दर मिळाला. त्यामुळे यंदा दहिगाव-ने परिसरात मोठ्या प्रमाणात कापूस लागवड केली. त्या पाठोपाठ सोयाबीन घेण्यात आले. मात्र परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने दोन्ही मुख्य पिके भुईसपाट झाली. एकाच वेचणीत कापसाचा खराटा झाला. त्यामुळे पेरणीस घेतलेले खासगी कर्ज आणि कृषी दुकानदारांची उधारी देणे इतपत कापूस घरात आला नाही. तर सोयाबीन कापणीअभावी शेतातच कुजले.
पाऊस बंद होऊन १५ दिवस होत आले आहेत. आता शेतकरी रब्बीतील गहू, हरभरा, आणि कांदा पिकाच्या पेरणीसाठी तयारी करत असताना खरीप हातचे गेले. शिवाय, मदत आणि पीकविमा अद्याप मिळाला नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.