खर्डी : खर्डीतील एमआयडीसीच्या (MIDC) अधिग्रहित केलेल्या शेतकऱ्यांसाठी भिवंडी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निधी उपलब्ध होऊनही शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला (land compensation) मिळत नसल्याने येथील शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत. खर्डी एमआयडीसीकरिता ७०६ शेतकऱ्यांची ३१५ हेक्टर जमीन संपादीत करण्यात आली आहे.
गेल्या चार वर्षांपासून एमआयडीसीकरिता संपादीत झालेल्या जमिनीच्या सर्व शेतकऱ्यांनी खरेदीखत, करारनामा केलेला असूनही ६० टक्के शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळाला आहे; परंतु उर्वरित गरजू ४० टक्के शेतकऱ्यांना मोबदला मागायला गेल्यावर अनेक प्रशासकीय कारण मिळत असल्याने त्यांना हेलपाटे मारावे लागत आहे.
भिवंडी येथील प्रांत कार्यालयाचे वारंवार उंबरठे झिजवूनही मोबदला मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. प्रशासनाकडून वारंवार कागदपत्रांची मागणी करण्यात येत आहे. कागदपत्रांची पूर्तता करूनही जमिनीचा मोबदला मिळत नसल्याने शेतकऱ्यांना अनेक आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी इतरत्र ठिकाणाहून पैसे घ्यावे लागत आहेत. सर्व ७०६ शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित करण्यात आली आहे.
१११ एकरचा मोबदला स्थगित
खर्डी एमआयडीसीकरिता २०० एकर जमीनीच्या आसपास शेतकऱ्यांना मोबदला देण्यात आला आहे. खर्डी व घाणेपाडा येथील जमिनी जुलै २०२२ ला पश्चिम घाट (प्रतिबंध असलेले ठिकाण) मध्ये वर्ग झाल्या आहेत. काही जमिनीच्या न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने तसेच जागेतील डोंगर, घरे, रो हाऊसेस यांच्या मोबदल्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्याचे काम सुरू असल्याने १११ एकर जमिनीचा मोबदला थांबवण्यात आला आहे.
जमिनीचा रेड झोनमध्ये समावेश झाल्याने येथील जमिनीचा मोबदला रोखण्यात आला आहे. या झोनचा ऑरेंज झोनमध्ये समावेश करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
- उदय किसवे, उपजिल्हाधिकारी, एमआयडीसी, ठाणे
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.