
Alibaug News : गायरान जमिनीवर अतिक्रमण केल्याप्रकरणी महसूल विभागाकडून नोटिसा पाठवण्यास सुरुवात झाली आहे. रायगड जिल्ह्यात तब्बल तीन हजार ९३५ गायरान जमिनीवरील अतिक्रमण करण्यात आले आहे.
एका महिन्यात अतिक्रमण हटवणे किंवा त्यासंदर्भातील खुलासा संबंधित तहसिलदारांना द्यावा लागणार आहे. सरकारी उपक्रमांना जागा कमी पडत असताना काहींनी गायरान जमिनी बळकावल्या आहेत. या जमिनीवरील अतिक्रमणे काढण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याने महसूल विभागाने कारवाई सुरू केली आहे.
रायगड जिल्ह्यात गायरान जागेत अतिक्रमण झाल्याच्या तक्रारींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहेत. काहींनी त्या ठिकाणी घरे तर काहींनी गोठे बांधले आहेत. तर काही ठिकाणी व्यावसायिक वापर होत आहे.
अलिबाग तहसीलदार विक्रम पाटील यांनी महिन्याभरापासून कारवाई सुरू केली आहे. गायरान जागेत अतिक्रमण करणाऱ्यांना नोटिसा देण्याचे काम सध्या सुरू आहे. जिल्ह्यात ३ हजार ६७१ हेक्टर गायरान जमिनींपैकी तब्बल ९९ हेक्टर जमिनीवर अतिक्रमण करण्यात आल्याचे समोर येत आहे.
शहरालगतच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बांधकामे करण्यात आली आहेत. गतवर्षी ऑक्टोबरमध्ये अतिक्रमण दूर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी एक महिन्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. आता न्यायालयाच्या आदेशाने महसूल विभागाने पुन्हा नोटिसा देण्यास सुरुवात केली आहे.
यामुळे अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून काहीजण वकिलांना भेटत आहेत, तर काहीजण तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना भेटून समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. गायरान जागेत काहींनी घरे बांधल्याने आपले संसार उघड्यावर येतील, अशी भीती त्यांना सतावत आहे.
राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप
शेतीसाठी गायरान जमिनीवर अतिक्रमणाचे प्रमाण अल्प आहे. साधारण १५ टक्के जमिनीवर फळझाडे लागवडीतून अतिक्रमण झाले आहे, तर राजकीय व्यक्तींनी गायरान जमीन बाहेरच्या व्यक्तींना परस्पर विकण्याचे प्रकार ६० टक्के आहेत.
या ठिकाणी फार्महाऊस बांधण्यात आले आहेत. उरलेल्या ३५ टक्के जमिनीवर घरे, शाळा, मंदिरे, क्रीडांगणे आहेत. काही ठिकाणी गायरान जमिनीवर घरकुल योजनाही राबवण्यात आल्या आहेत.
गायरान क्षेत्रावरील अतिक्रमण
तालुका अनधिकृत अतिक्रमण बांधकामे (हेक्टरमध्ये)
अलिबाग ७०३ २५.०८
पेण ३५० १२. ५८.
मुरूड ६२ १.२४.
पनवेल ७२५ ३४. ३०
उरण ० ०
कर्जत ७९३ १०. ६२
खालापूर ७९४ ३. ९९
माणगाव २१८ ३. ४०
तळा ० ०
रोहा १६० २. २६
सुधागड ४५ ५. ७१
महाड ७६ ०. ४६
पोलादपूर ० ०
श्रीवर्धन ९ ०. १४
म्हसळा ० ०
एकूण ३९३५ ९९. ८०
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.