

Aquaculture : भाईंदर : समुद्रात नष्ट होत असलेल्या मासळीच्या प्रजाती, वाढत्या मासळी दुष्काळाचा मासेमारी व्यवसायावर परिणाम होऊ लागला आहे. यासाठी विविध घटक कारणीभूत असले, तरी समुद्रातील माशांची प्रजननाची नैसर्गिक ठिकाणे नष्ट होणे, हेदेखील एक महत्त्वाचे कारण मानले जात आहे. यासाठी समुद्रात आर्टिफिशियल रिफ (कृत्रिम भित्तिके) निर्माण करण्याची गरज प्रकर्षाने जाणवू लागली आहे. या पार्श्वभूमीवर उत्तनमधील मच्छीमारांना मार्गदर्शन करणारे शिबिर नुकतेच पार पडले.
समुद्रातील प्रवाळ, नैसर्गिक खडक ही माशांची प्रजननाची, अंडी घालण्याची, तसेच सुरक्षित निवाऱ्याची ठिकाणे आहेत. मत्स्योत्पादनात ही ठिकाणे फार महत्त्वाची असतात; परंतु विविध कारणांमुळे ही ठिकाणे नष्ट होत आहेत. शिवाय मासळीच्या साठ्यांवरही परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे मासळीच्या दुष्काळासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर समुद्रातच किनाऱ्यापासून दोन किमी अंतरापर्यंत कृत्रिम भित्तिके तयार करण्याची आवश्यकता भासू लागली आहे. परदेशात असे प्रयोग यशस्वी ठरले आहेत.
मासळी उत्पादनवाढीसाठी प्रशिक्षण चेन्नईच्या केंद्रीय सागरी मत्स्यसंशोधन संस्थेचे वैज्ञानिक जो किझा कुडन यांनी नुकतीच उत्तन येथील मच्छीमारांची भेट घेतली. माशांच्या प्रजाती वाढविण्याकरिता कृत्रिम भित्तिके व त्यांच्या फायद्यांबाबत कुडन यांनी मच्छीमारांना मार्गदर्शन केले. कृत्रिम भित्तिका उभारण्यासाठी मच्छीमारांनी जागा सुचवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी पालघर आणि ठाणे मत्स्यव्यवसाय आयुक्त दिनेश पाटील, परवाना अधिकारी पवन काळे यांच्यासह उत्तनमधील विविध मच्छीमार संस्थांचे सदस्य उपस्थित होते.
कृत्रिम भित्तिकांसाठी समुद्राचा तळ टणक व कमी गाळाचा असणे, तसेच सभोवतालचे पाणी कमी गढूळ असणे आवश्यक आहे. मुंबई ते पालघर भागातील समुद्रात होत असलेल्या प्रदूषणामुळे अशी ठिकाणे कमी झाली आहे; मात्र तरीदेखील या विषयावर सर्व मच्छीमार संस्था एकत्र येऊन लवकरच विचारविनिमय करतील व समुद्रातील काही जागांची निवड करतील. - बर्नड डिमेलो, कार्याध्यक्ष, अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.