
Pune APMC Election बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठीची गुरुवारी (ता. २०) अर्ज माघारीच्या दिवशी शह काटशाह, आर्थिक तडजोडी, राजकीय आश्वासनानंतर अनेक उमेदवारांनी अर्ज माघारीनंतर जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांच्या निवडणुकांचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे.
विविध तालुक्यांमध्ये महाविकास आघाडीमध्ये मतभेद होऊन, एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकले आहेत. तर राजकीय तडजोडींसाठी गेल्या अनेक वर्षांपासून नैसर्गिक मित्र असलेले भाजप, शिवसेना शिंदे आणि ठाकरे गट एकत्र आल्याने निवडणुकांमधील रंगत वाढली आहे.
पुणे जिल्ह्यातील बाजार समित्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. सध्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना (ठाकरे) गट बाजार समित्यांमध्ये समान जागावाटपासाठी प्रयत्नशील होते.
मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने आर्थिक सत्ता केंद्रांमध्ये वाटेकरू नको म्हणून शिवसेनेला एखाद्या दोन जागा देऊन बोळवण करण्याचा प्रयत्न सुरू होता.
मात्र शिवसेनेने देखील आक्रमक भूमिका घेत, आपल्या नैसर्गिक मित्र भाजपला जवळ करत, पुन्हा एकदा शिवसेना शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांनी काही ठिकाणी आपले स्वतंत्र पॅनेल उभे केले आहे.
दरम्यान, जुन्नर बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने विद्यमान सभापती संजय काळे यांच्या नेतृत्वाखाली शिवनेर पॅनेल उभे केले आहे. तर शिवसेना (ठाकरे) गटाने राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सभापती रघुनाथ लेंडे यांच्या साथीने आपले स्वतंत्र शेतकरी विकास पॅनेल उभे केल्याने निवडणुकीतील रंगत वाढली आहे.
मंचर बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान सभापती देवदत्त निकम यांची उमेदवारी नाकारल्याने त्यांनी स्वपक्षाच्या विरोधात शड्डू ठोकला आहे. तर शिवसेना (ठाकरे) गटाने उमेदवारी माघारी घेण्याच्या प्रक्रियेवर आक्षेप घेत जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार केल्याने रंगत आली आहे.
खेड बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात सर्वपक्षायांचे पॅनेल उभे ठाकले आहे. आमदार दिलीप मोहिते यांची एकाधिकारशाही मोडून काढण्यासाठी भाजप शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटाने स्वतंत्र पॅनेल उभे केले आहे. या पॅनेलसाठी भगवान पोखरकर, शरद बुट्टे यांनी पुढाकार घेतला आहे.
बारामती बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलच्या विरोधात भाजपने देखील पॅनेल दिल्याने या लढतील भाजपचा चंचू प्रवेश होणार का, अशी चर्चा सध्या सुरू आहे.
नीरा (ता. पुरंदर) बाजार समितीमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीचे पॅनेल एकमेकांसमोर ठाकले आहे. याही बाजार समितीमध्ये महाविकास आघाडी नावाला असून, शिवसेनेला एकही जागा देण्यात आलेली नाही. मात्र राष्ट्रवादीला १० आणि काँग्रेसला ८ जागा देण्यात आल्या आहेत.
इंदापूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनेल आणि शेतकरी विकास पॅनेलमध्ये लढत होत आहे. तर दौंडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाकरी फिरविली असून, जुन्या १९ संचालकांपैकी केवळ व्यापारी मतदार संघातील उमेदवारी कायम ठेवली आहे.
पुणे बाजार समितीत ५७ उमेदवार रिंगणात
पुणे (हवेली) कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेच्या १८ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत एकूण १९५ अर्ज वैध ठरले होते. त्यामध्ये गुरुवारपर्यंत १३८ जणांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले.
त्यामुळे समितीच्या निवडणुकीत ५७ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. सेवा सहकारी संस्था मतदार संघातून ११ जागांसाठी २९ उमेदवार, निवडणूक लढवीत आहेत.
त्यामध्ये सेवा सहकारी संस्थेचे सर्वसाधारण गटातून ७ जागांसाठी २१ उमेदवार, महिला राखीव गटातून २ जागांसाठी ४ उमेदवार, इतर मागासवर्गातून १ जागेसाठी २ उमेदवार,
विमुक्त/ भटक्या जातीमधून १ जागेसाठी २ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ग्रामपंचायत मतदार संघातून ४ जागांसाठी ११ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत.
त्यामध्ये सर्वसाधारण गटातून २ जागांसाठी ६ उमेदवार, अनु. जाती जमाती गटातून १ जागेसाठी ३ उमेदवार, आर्थिक दुर्बल गटातून १ जागेसाठी २ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
तर व्यापारी-अडते मतदार गटातून २ जागांसाठी १२ उमेदवार, हमाल-तोलणार गटातून १ जागेसाठी ५ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत.
निवडणुकीत उमेदवारांनी प्रत्यक्षात प्रचाराला सुरुवात केली असून, मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. चिन्हवाटप केल्यानंतर प्रचाराचा आणखी जोर वाढणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.