
बुलडाणा : जिल्ह्यात नुकतीच २७९ ग्रामपंचायतींसाठी (Grampanchyat) निवडणुकीची प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या ठिकाणी सरपंच व सदस्यांची निवड झाली असून, आता उपसरपंच निश्चित करण्यासाठी ६ जानेवारीला निवडणूक सभा होणार आहे. तसेच याच दिवशी ग्रामपंचायतीची पहिली सभाही घेतली जाणार आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना निर्देश दिले आहेत.
ग्रामपंचायतींच्या पहिल्या सभेत उपसरपंचपदाची निवडणूक केली जाणार आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील २७९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत थेट सरपंचपदांसह सदस्यपदांची निवडणूक झाली आहे. या निवडणुकीचे निकाल २० डिसेंबरला जाहीर झाले. त्याठिकाणी सरपंच पदारूढ झाले. आता उपसरपंच निवडीकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. ६ जानेवारीला सरपंचांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतींची पहिली सभा घेतली जाणार आहे.
याच सभेत उपसरपंच पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया राबवली जाईल. सरपंचदाचे निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता ग्रामपंचायतींच्या पहिल्या सभेत उपसरपंचपदांची निवडणूक घेण्यात येणार असल्याने पुन्हा उपसरपंचपदाच्या निवडणुकीने राजकारण तापणार आहे. उपसरपंचपदांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील तहसीलदारांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. उपसरपंचपदाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले आहेत.
सरपंचाला मतदानाचा अधिकार
जनतेतून थेट सरपंच निवडून आलेला आहे. काही ठिकाणी दोन्ही गटांचे समान सदस्य विजयी झालेले आहेत. अशा गावांमध्ये आता उपसरपंचपदाच्या निवडीची खरी चुरस आहे. सरपंच ज्या गटाच्या उमेदवाराला उपसरपंचपदासाठी मतदान करेल, तो विजयी होईल. यामुळे जेथे समसमान सदस्य निवडून आलेले आहे तेथे आता सरपंचाचे मतही महत्त्वाचे ठरणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.