Solapur APMC Election जिल्ह्यातील ११ पैकी आठ बाजार समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी नुकतीच पार पाडली आहे. आता सोलापूर, बार्शी आणि करमाळा या तीन बाजार समित्यांच्या निवडणूका (APMC Election) बाकी आहेत.
बार्शी आणि सोलापूर बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत येत्या जुलैमध्ये तर करमाळा बाजार समितीची मुदत येत्या ऑक्टोबरमध्ये पूर्ण होत आहे.
बार्शी आणि सोलापूर बाजार समित्यांच्या संचालकांना मुदतवाढ मिळणार की संचालक मंडळाची निवडणूक होणार? याबद्दल दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या अर्थकारणात व सोलापूर परिसराच्या राजकारणात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे महत्त्व अधिक आहेत.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने बाजार समित्यांसाठी शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार दिल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर, बार्शी व करमाळा या तीन समित्यांच्या निवडणुका शेतकऱ्यांच्या मतदानाद्वारे झाल्या होत्या.
सोलापूर बाजार समितीच्या संचालकांची मुदत १५ जुलै २०२३ रोजी पूर्ण होत आहे. बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांची मुदत २३ जुलै २०२३ रोजी पूर्ण होत आहे.
त्यामुळे या बाजार समित्यांच्या बाबतीत निवडणूक की मुदतवाढ? नक्की काय निर्णय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख हे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत. त्यांच्या माध्यमातून या समितीत सर्वपक्षीय नेते सत्ताधारी आहेत. बार्शी बाजार समितीवर भाजप सहयोगी आमदार राजेंद्र राऊत यांचे चिरंजीव रणवीर राऊत हे सभापती आहेत. पणन कायद्यातील तरतुदीनुसार, बाजार समितीच्या संचालकांची मुदत संपल्यानंतर सहा-सहा महिन्यांच्या दोन मुदतवाढ घेता येतात.
नुकत्याच निवडणुका झालेल्या आठ बाजार समित्यांपैकी बहुतांश समित्यांना या पद्धतीने मुदतवाढ मिळालेली आहे. मुदतवाढ देण्याचा निर्णय सहकार मंत्र्यांच्या पातळीवर केला जातो.
राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार आहे. बार्शी व सोलापूर बाजार समिती आमदार देशमुख व आमदार राऊत यांच्या माध्यमातून भाजपच्या ताब्यात आहेत.
त्यामुळे या दोन्ही बाजार समित्यांना मुदतवाढ मिळेल, अशीच शक्यता व्यक्त केली जात आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लावण्यासंदर्भातील काही शक्तींकडून खास खलबते सुरु आहेत.
करमाळा बाजार समितीची मुदत ऑक्टोबरपर्यंत
करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या ताब्यात असलेल्या करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची मुदत २ ऑक्टोंबर २०२३ रोजी संपत आहे.करमाळा तालुक्यातील बदललेली राजकीय समीकरणे, राज्यातील सत्ताधारी या गोष्टी आता महत्त्वाच्या आहेत. बार्शी व सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा निर्णय झाल्यानंतर करमाळा बाजार समितीचा विषय समोर येण्याची शक्यता आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.