कोल्हापूर : ‘‘कृषिक्षेत्रात (Agricultural Sector) प्रभावी विपणनाचा अवलंब करून शेतकऱ्यांना लाभ द्यायचा झाल्यास शाश्वत पर्यावरणासह शाश्वत आर्थिक स्थैर्य देण्यास प्राधान्य द्यायला हवे,’’ असे प्रतिपादन केंद्रीय सचिव व ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. अशोक दलवाई यांनी येथे केले.
शिवाजी विद्यापीठाचा अर्थशास्त्र विभाग व हैदराबादच्या दि इंडियन सोसायटी ऑफ अॅग्रिकल्चरल मार्केटिंगतर्फे (आयएसएएम) ‘कृषी विपणन’ विषयावर आयोजित तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के उपस्थित होते.
डॉ. दलवाई म्हणाले, ‘‘विपणनाबरोबरच शेतकऱ्यांची आर्थिक सक्षमता वृद्धिंगत होण्यासाठी नवनवीन मार्ग शोधण्याची तसेच कृषी-अन्नप्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देऊन रोजगार संधी विकसित करण्याची गरज आहे.
नवडिजिटल तंत्रज्ञान डिसरप्टिव्ह (विध्वंसक) आहे. त्यात सेन्सर तंत्रज्ञान, रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा समावेश आहे. तथापि, संगणकाप्रमाणे हे तंत्रज्ञान नवरोजगार निर्मितीस चालना देत असेल तर लाभदायी ठरेल. उपलब्ध रोजगार त्यामुळे प्रभावित होत असतील, तर मात्र त्यांचा फेरविचार करावा लागेल.’’
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या माजी डेप्युटी गव्हर्नर उषा थोरात म्हणाल्या, ‘‘शाश्वत पर्यावरणीय विकास या बाबीला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज आहे. त्यातून शेती व शेतकऱ्याचे शाश्वत जगणे विकसित व्हायला हवे.’’
आयएसएएम’चे अध्यक्ष डॉ. एस. महेंद्र देव यांनी कृषी विपणनाच्या क्षेत्रात नवतंत्रज्ञानाच्या आधारे आधुनिकीकरण आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. ‘आयएसएएम’चे सचिव डॉ. टी. सत्यनारायणा, नाबार्डचे मुख्य सरव्यवस्थापक डॉ. सत्यसाई, जागतिक बँकेचे अर्थतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर रानडे आदी या वेळी उपस्थित होते. परिषदेचे समन्वयक डॉ. ज्ञानदेव तळुले यांनी प्रास्ताविक केले. अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विद्या कट्टी यांनी आभार मानले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.