Nashik DCC Bank नाशिक : कांद्याचे दर (Onion Rate) कोसळलेले असताना जिल्ह्याला अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) झोडपल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
अशाही परिस्थितीत जिल्हा बॅंकेकडून सुरू असलेल्या सक्तीच्या वसुलीविरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. वसुली नोटीस प्राप्त झालेल्या संतप्त शेतकऱ्यांनी गुरुवारी (ता. ९) शेतकरी- वारकरी समन्वय समितीच्या माध्यमातून जिल्हा बँकेच्या जप्तीच्या नोटिसा रामतीर्थावरील गोदावरी पात्रात बुडवून अनोखे आंदोलन केले.
सरकारकडून शेतकऱ्यांचे हाल सुरू असल्याचा आरोप या वेळी समितीने केला. जिल्हा बॅंकेने थकबाकी वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेतली आहे. यात वर्षोनुवर्षे थकबाकीदार असलेल्यांच्या जमिनींवर जप्तीची कारवाई सुरू केली आहे.
या जप्तीला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री दादा भुसे यांच्या निवासस्थानावर आंदोलन करण्यात आले होते. त्या वेळी पालकमंत्री भुसे यांनी जमिनीचे लिलाव होणार नसल्याचे आश्वासन दिले होते.
त्यानंतरही कारवाई करणारे जिल्हा बॅंकेचे प्रशासक अरुण कदम यांची तडकाफडकी बदली करून त्यांना दणका देण्यात आला.
त्यांच्या जागेवर नव्याने रुजू झालेले प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांनी बँकेला सावरण्यासाठी वसुलीवर भर देणार असल्याचे सांगितले होते.
त्यानुसार बॅंकेने जप्तीची प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे. शेतकऱ्यांना तशा नोटिसा देण्यात आल्यानंतर आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी गुरुवारी (ता. ९) हे अनोखे आंदोलन केले.
संत तुकाराम महाराजांनी बळीराजाला कर्जाच्या जाचातून मुक्त करण्यासाठी शेतकऱ्यांच्या कर्जवह्या इंद्रायणी नदीत बुडविल्या होत्या. त्याच धर्तीवर शेतकऱ्यांनी या नोटिसा गोदावरीच्या पात्रा बुडवीत असल्याचे आंदोलनकांनी सांगितले.
भगवान बोराडे, किरण गव्हाणे, खंडेराव पाटील, नारायण वाघ, संपतराव धोंगडे, दत्तात्रेय संधान, अनंत पाटील सादळे, नारायण मोरे, नारायण गायकर, मोहन काठे, नारायण वाघ आदींनी या आंदोलनात भाग घेतला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.