
ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे ः ‘‘ग्रामीण भाग हा देशाचा आणि राज्याचा आधार असून ग्रामीण भागाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. ग्रामीण भागाच्या विकासासोबत त्याभागातील संस्कृती टिकणेही आवश्यक आहे,’’ असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले.
पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या आदर्श अंगणवाडी सेविका, मदतनीस, शरद आदर्श कृषीग्राम, कृषिनिष्ठ शेतकरी, आदर्श गोपालक, उत्कृष्ट पशुवैद्यकीय अधिकारी आदी विविध पुरस्कारांसह शिक्षण विभागातील विजेते स्पर्धकांना गौरविण्यात आले.
या वेळी जिल्हा परिषदेचे प्रशासक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक शालिनी कडू, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, निर्मला पानसरे, कृषी व पशुसंवर्धन विभागाचे माजी सभापती बाबूराव वायकर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य काळूराम विधाते आदी उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘‘आपली संस्कृती म्हणजेच जीवन व्यवहार गावामध्ये पाहावयास मिळतो. गावांच्या उन्नतीसाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत.
मात्र त्यासोबतच गावातील शेती, जोडधंदे वाढले पाहिजेत. महिला व मुलांसाठी सोयीसुविधा उपलब्ध व्हायला हव्यात.’’
जिल्ह्याच्या वार्षिक आराखड्यात १५० कोटी रुपयांची वाढ करण्यात आली असून, ग्रामीण भागाच्या विकासासाठी देखील प्रयत्न करण्यात येत आहेत.
येत्या एप्रिलपासून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जाऊन तेथील अधिकारी, सरपंच, उपसरपंच यांच्यासमवेत विकासकामांबाबत आढावा बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आयुष प्रसाद म्हणाले, ‘‘जिल्ह्यात शेती उत्पादन वाढले, भूजल पातळीतही वाढ झाली, कुपोषित मुलांची संख्या कमी झाली आहे. निपुण भारत अभियानांतर्गत विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारली आहे.
लम्पी स्कीन रोग नियंत्रणात आणण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने फिरते दवाखाने चालवून चांगले कार्य केले आहे. १ हजार २०० शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली आहे. आदर्श अंगणवाड्यांमधील सुविधांसाठी २ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.’’
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.