
Akola News स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्याच्या सहकार क्षेत्राचे राजकारण कमालीचे ढवळून निघाले आहे. जवळपास सर्वच राजकीय पक्षांमध्ये विभागल्या गेलेल्या दोन पॕनेलमध्ये ही लढत सरळ अपेक्षित आहे. व्यापारी अडते मतदार संघातून दोन्ही उमेदवार बिनविरोध विजयी झाल्यामुळे शेतकरी सहकार पॕनेलने विजयी सलामी दिली आहे.
जिल्ह्याच्याच नव्हे तर एकूणच राज्याच्या सहकार क्षेत्रात आदराने घेतल्या जाणारे नाव म्हणजे माजी आमदार ॲड. भय्यासाहेब तिडके. त्यांच्या नेतृत्वातील शेतकरी सहकार पॕनेलची या बाजार समितीवर गेली ३० वर्षे एक हाती सत्ता आहे.
त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना बाजार समितीत राबविण्यास कायम प्राधान्य दिले. सहकार क्षेत्रातील सर्वोच्च राज्य सहकारी संघाचे अध्यक्षपद त्यांनी तब्बल पाच वेळा भूषविले आहे.
मात्र, यावेळी त्यांच्या विरोधात बाजार समितीत सत्ता परिवर्तन घडवून आणण्याचा निर्धार करीत वंचित बहुजन आघाडीसह विविध राजकीय पक्षांचे नेते शेतकरी परिवर्तन पॕनेलच्या झेंड्याखाली एकत्र आले आहेत.
शेतकऱ्यांचे हित आजवर जोपासले गेले नाही, त्यामुळे परिवर्तन घडवून आणणे गरजेचे असल्याचा त्यांच्याकडून प्रचार केला जात आहे. इतरही काही मंडळी रिंगणात आहेत. परंतु खरी लढत या दोन पॕनेल दरम्यान अपेक्षित आहे.
या निवडणुकीत सेवा सहकारी संस्था मतदार संघात ११ उमेदवारांना ८८६ मतदार निवडून देतील. ग्रामपंचायतीतून ७३७ मतदार चार उमेदवार निवडतील. हमाल मापारी संघातून ३७१ मतदारांना एक उमेदवार निवडून द्यायचा आहे.
सेवा सहकारी संस्था मतदार संघात शेतकरी सहकार पॕनलचे ॲड. भय्यासाहेब तिडके, प्रशांत कांबे, दिवाकर गावंडे, डॉ. अमित कावरे, साहेबराव ढाकरे, आनंद पाचडे, अरुण सरोदे, शोभाताई तिडके,
चित्राताई सरोदे, गणेशराव महल्ले, विष्णू चुडे यांच्याशी शेतकरी परिवर्तन पॕनेलचे अप्पू तिडके, सुरेश ठोकळ, देवाशिष भटकर, योगेश काटे, विनायक खंडारे, महेंद्र गुल्हाने, अर्पण जायले, पुष्पाताई गावंडे, आरतीताई पोळकट,
आनंदराव डाखोरे, डॉ. वसंतराव मुरळ लढत देतील. ग्रामपंचायत मतदार संघात शेतकरी परिवर्तन पॕनेलचे मोहन गावंडे, नारायण भटकर, पौर्णिमा खंडारे व विनोद देशमुख यांच्याशी शेतकरी सहकार पॕनेलचे अमोल गढवे, प्रदीप ठाकरे, दादाराव किर्दक व अक्षय राऊत यांची लढत होईल.
आजवर ॲड. भय्यासाहेब तिडके यांनी शेतकरी हिताला प्राधान्य दिले. सर्व प्रकारच्या सुविधा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या आणि पुढेही देतच राहणार. गावागावांत दौरा करून त्यांनी शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळविला आहे. सत्ता कायम राहील.
-दिवाकर गावंडे, शेतकरी सहकार पॕनेल
बाजार समितीत आजमितीला प्रचंड समस्या आहेत. शेतकरी हित जोपासले जात नाही. त्यामुळे परिवर्तन घडवून आणायचे आहे. निश्चितपणे सत्ताबदल होईल.
- मोहन गावंडे, शेतकरी परिवर्तन पॕनेल
सेवा सहकारी मतदार संघातील ८८६, ग्राम पंचायत मतदार संघातील ७३७ व हमाल मापारी मतदार संघातील ३७१ मतदार रविवारी (ता. ३०) सकाळी ८ ते संध्याकाळी ४ वाजेदरम्यान मतदानाचा हक्क बजावतील. त्याच दिवशी ५ वाजता मतमोजणीस प्रारंभ होईल.
- योगेश लोटे, सहायक निबंधक, मूर्तिजापूर, जि. अकोला
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.