Agriculture Department : जैविक मिशनच्या प्रकल्प उपसंचालकांची बदली

Agriculture Department Transfer : प्रकल्प राज्यभर राबविण्याचा निर्णय घेताच बदलीचा निर्णय
Department Of Agriculture
Department Of AgricultureAgrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Akola Agriculture Department News : विषमुक्त अन्ननिर्मितीसाठी विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांमध्ये जैविक शेती मिशन (Organic Farming Mission) राबविण्यात येत आहे. आता या मिशनला मुदतवाढ देत संपूर्ण राज्यात राबविण्याचे धोरण स्वीकारण्यात आले आहे.

या बाबत मंगळवारी (ता. ३०) झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले आहे. तर, दुसरीकडे या प्रकल्पाच्या पायाभरणीत मोठा वाटा राहिलेले प्रकल्प उपसंचालक आरिफ शाह यांच्या बदलीचा आदेश याच दिवशी निघाल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जाऊ लागले आहे.

आता या प्रकल्पाच्या रिक्त पदावर कोणाची वर्णी लावली जाते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सध्या विषमुक्त अन्न ही काळाची गरज बनली आहे. यासाठी शासनाने चार वर्षांपूर्वी डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनची स्थापना केली होती.

यासाठी राज्य पुरस्कृत सेंद्रिय शेती/विषमुक्त शेती ही योजना पहिल्या टप्प्यात विदर्भातील आत्महत्याग्रस्त बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांत राबविण्यात आला.

याअंतर्गत गट, कंपनी निर्मितीला प्रोत्साहन दिले गेले. शिवाय सेंद्रिय उत्पादक शेतकऱ्यांचा महासंघ तयार करण्यात आला.

Department Of Agriculture
Agriculture Department : चार वर्षांनंतर ‘आत्मा’ला मिळाले पूर्णवेळ प्रकल्प संचालक

वास्तविक या मिशनची स्थापना ऑक्टोबर २०१८ मध्ये झाली होती. त्यानंतर प्रत्यक्षातील काम जानेवारी २०२० पासून सुरू झाले. दरम्यान, कोरोना काळ सुरू झाल्याने कामकाजाची घडी बसण्यात अडथळे आले.

तरीही हे काम पुढे नेण्यासाठी प्रयत्न झाले. त्यामुळेच सध्या या प्रकल्पाशी सुमारे साडेआठ हजार शेतकरी थेट जोडले गेले आहेत. ३२ हजार एकरांवर विषमुक्त अन्न पिकविण्याचे काम होत आहे.

४३५ शेतकरी गट तयार झाले असून, या गटांच्या ४३ शेतकरी कंपन्याही स्थापन झाल्या. या कंपन्यांचा महासंघ बनला. ११ समूह संकलन केंद्राचे काम सुरू आहे.

Department Of Agriculture
Agriculture Inputs : कृषिकन्यांमार्फत जैविक कृषी निविष्ठा वाटप

शेतकरी कंपन्यांचे ११ विक्री केंद्रसुद्धा स्थापन झाले. मिशनमधील शेतकऱ्यांनी सुमारे पावणेतीन कोटींचे शेअर कॅपिटलही तयार केले आहे. तर या मिशनमुळे सुमारे २०० जणांना थेट रोजगार मिळाला. आता या मिशनचे काम राज्यभर विस्तारत असतानाच सुरुवातीपासून काम केलेल्या उपसंचालकांची बदली करण्यात आली.

प्रकल्पात सध्या प्रकल्प संचालक म्हणून संतोष आळसे हे कार्यरत आहेत. ते पुढील वर्षी फेब्रुवारीत सेवानिवृत्त होत आहेत. अशा स्थितीत या मिशनचे काम पुढे नेण्यासाठी चांगल्या अधिकाऱ्याची नियुक्ती होणे गरजेचे असल्याचे शेतकरी बोलत आहेत.

३५ कंपन्यांचे सर्टिफिकेशन
विषमुक्त अन्न निर्मितीला चालना देण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांना यश मिळू लागले. मिशनमधील ३५ कंपन्यांचे सर्टिफिकेशन झाले आहे.

यंदाचा हंगाम हा दुसऱ्या वर्षाचा राहणार आहे. या प्रकल्पातील १६ शेतकरी कंपन्या तर केंद्र शासनाच्या दहा हजार शेतकरी उत्पादक योजनेत सहभागी झालेल्या आहेत.

यंत्रणांनाच माहिती नाही पदे
जैविक मिशनमध्ये कुठली पदे आहेत याची माहिती मुंबईतील यंत्रणांनाच नसल्याचे दिसून येते. प्रकल्प उपसंचालक आरिफ शाह यांच्या बदली आदेशात प्रकल्प व्यवस्थापक असा उल्लेख करण्यात आला आहे.

शाह यांना थेट चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड उपविभागीय कृषी अधिकारी म्हणून नियुक्ती दिली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com