
Pune News : जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे सुमारे २ लाख २ हजार ४५० टन खताची मागणी नोंदविली आहे. गेल्या वर्षीची ७७ हजार ५९८ टन खते शिल्लक आहेत. मागणी केलेल्या खतांचा कोटा मंजूर केल्यास मोठ्या प्रमाणात खते उपलब्ध होतील, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी दोन लाख ७ हजार २५० हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी दोन लाखांहून अधिक हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे. यामध्ये भाताच्या व सोयाबीनच्या क्षेत्राच्या वाढ होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे खतांच्या मागणीत वाढ होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे कृषी विभागानेही खताच्या अडचणी येऊ नये म्हणून नियोजन केले आहे. लवकरच कृषी आयुक्तालयाकडून या खतास मंजुरी मिळेल. त्यानंतर शेतकऱ्यांना या खताचा पुरवठा होईल.
यंदा सरळ खतामध्ये युरिया, अमोनिअम, एमओपी आणि एसएसपी अशा खतांचा समावेश होत आहे. यंदा युरियाची ८९ हजार ५१० टन, डीएपी १४ हजार ७६०, एमओपी ७ हजार ८६०, एसएसपी २१ हजार ९८० टन, तर संयुक्त व मिश्र खतांमध्ये ६८ हजार ३४० टन खतांची मागणी केली आहे.
गेल्या खरिपात शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे दोन लाख ९१ हजार ९०० टन खताची मागणी नोंदविली होती. त्यानंतर कृषी विभागाने कमी-अधिक प्रमाणात खताचा पुरवठा केल्याने काही वेळा टंचाई भासली. रब्बीत मोठ्या प्रमाणात खताचा पुरवठा झाल्यामुळे खते शिल्लक राहिल्याचे चित्र आहे.
गेल्या वर्षीची शिल्लक खते (टनांत) :
खतांचा प्रकार--- खरिपातील खत वापर---शिल्लक खते
युरिया ---९९०२२---३३,७१७
डीएपी---१७,५१४---७५४८
एमओपी ---११,३९४---६३७
संयुक्त, मिश्र खते---६७,६१२ ---२६,३९१
एसएसपी---२६,२८९---९३०५
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.