सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात लम्पी स्कीनचा (Lumpy Skin ) प्रादुर्भाव वरचेवर वाढतच आहे. गेल्या तीन महिन्यात एक हजार ४४५ जनावरांचा मृत्यू झाला आहे. प्रामुख्याने करमाळा, माळशिरस, पंढरपूर, माढा तालुक्याला त्याची सर्वाधिक झळ बसली आहे. मोठ्या जनावरांपेक्षाही मृत जनावरांमध्ये वासरांचा सर्वाधिक समावेश आहे.
जिल्ह्यातील सात लाख ४५ हजार ३२४ गायवर्गीय पशुधनापैकी सात लाख ४० हजार ८७२ पशुधनाला लम्पी स्कीन प्रतिबंधक लस देण्यात आली होती. पण, मृत जनावरांची संख्या कमी झालेली नाही. जिल्ह्यातील गायवर्गीय जनावरे लम्पीच्या विळख्यात अडकल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात पहिल्यांदा सप्टेंबरमध्ये शिंगोर्णी (ता. सांगोला) येथे पहिले लम्पीबाधित जनावर आढळले होते. गेल्या काही दिवसांपासून वातावरणातही मोठा बदल झाला आहे. अचानक वाढणारी थंडी अन् उन्हाची तीव्रता या हवामानातील बदलांसह वासरांमधील रोगप्रतीकारक शक्ती कमी झाल्याने त्यांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याचे सांगण्यात येते. त्यातच सध्या साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरु आहे.
अनेक साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी ऊस तोडणी कामगारांकडील गाय व बैलांना लसीकरण बंधनकारक केले होते. पण अनेक ठिकाणी विस्कळीतपणा दिसत आहे. त्याचाही परिणाम लम्पीचा प्रादुर्भाव वाढण्यास कारणीभूत आहे. प्रामुख्याने करमाळा, माळशिरस, सांगोला, पंढरपूर या तालुक्यात लम्पीग्रस्त जनावरे अधिक आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
क्वारंटाईन सेंटरची कार्यवाही नाही
केंद्रीय पथकाने सावडी (ता. करमाळा) येथे काही दिवसापूर्वी जनावरांची पाहणी केली. तसेच जनावरांचे मृत्यू रोखण्यावर उपाययोजना करण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या. त्याशिवाय सांगोला, करमाळा तालुक्यातूनही लम्पीग्रस्त जनावरांसाठी क्वारंटाईन सेंटरची मागणी करण्यात आली. पण अद्याप त्यावर काहीच कार्यवाही झाल्याचे दिसत नाही.
माळशिरसमध्ये मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक
जिल्ह्यात माळशिरस तालुक्यात बाधित जनावरांची संख्या ६९९७ इतकी आहे. परिणामी आतापर्यंत जिल्ह्यात सर्वाधिक ५३४ जनावरांचा मृत्यू एकट्या माळशिरस तालुक्यात झाले आहेत. तर एकूण बाधित आणि मृत्यूच्या संख्येत दक्षिण सोलापूर तालुक्यात सर्वात कमी संख्या आहे. दक्षिण सोलापुरात आतापर्यंत १५५ बाधित तर १४ जनावरे लम्पीने दगावली आहेत. बाकी अन्य बाधितांत माळशिरसशिवाय करमाळा आणि सांगोल्याचा समावेश आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.