
Jowar Verities अकोला ः ज्वारी पिकाच्या (Jowar Crop) भारतभरात उपलब्ध २५ हजार जननद्रव्यांचा (जर्मप्लास्म- विविध गुणधर्मांचे पीकवाण वा प्रकार) संग्रह नवी दिल्ली येथील राष्ट्रीय वनस्पती जिनोम संशोधन संस्था (National Institute of Plant Genome Research-एनपीजीआर) यांच्या साह्याने ‘पंदेकृवि’च्या वाशीम (PDKV Washim) येथील कृषी संशोधन केंद्रावर उपलब्ध केला आहे. त्यांची येथे लागवड (Jowar Cultivation) केली आहे. सध्या हे सर्व वाण बहरले आहे. सोमवारी (ता. १३) या ठिकाणी शास्त्रज्ञ, शेतकऱ्यांचा मेळावा भरणार आहे.
आपल्या शेती तसेच आहारात ज्वारी, बाजरी व नाचणी ही पौष्टिक तृणधान्ये म्हणून ओळखली जातात. ही पिके विपरीत हवामान परिस्थितीतही तग धरून उत्पादन देतात. त्यांच्यातील पौष्टिक पोषण मूल्यांमुळे त्याचे आहारात विशेष स्थान आहे.
येते दशक हे पर्यावरण बदलाचे असल्यामुळे अत्यंत तातडीने या पिकांना प्राधान्य देणे आवश्यक मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर हा प्रयोग केला आहे.
पौष्टिक तृणधान्यांची पोषणमूल्ये आजवर दुर्लक्षित राहिली. त्यामुळे जगभरात आपणास ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ साजरे करण्याची वेळ आली.
केंद्र सरकारने या दृष्टीने पुढाकार घेऊन येत्या काळात आपणास पोषणयुक्त तृणधान्य कोठार असलेला देश बनविण्यासाठी हालचाली सुरू केलेल्या आहेत.
कमी खर्चाचे, मोजक्या पाऊसमानात येणारे, दुबार पिकास उत्तम असे पीक खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामासाठी उत्तम ठरत आहे.
अशा या ज्वारी पिकाच्या भारतातील सर्व उपलब्ध जननद्रव्यांचा (Germplasm) संग्रह वाशीमच्या कृषी संशोधन केंद्रात करण्यात आला आहे. सध्या हे वाण कणसाच्या अवस्थेत आहेत.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या संकल्पनेतून व संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम पूर्णत्वास जात आहे.
जननद्रव्ये (विविध गुणधर्मांचे पीकवाण वा प्रकार) ही संख्येने फार मोठी असल्यामुळे १६ एकर शेतात त्याची संवर्धित प्रणालीमध्ये लागवड केली आहे. यातील अनेक वाण अतिशय दुर्मीळ स्वरूपाची आहेत. त्यासाठी एकंदरीत पूर्ण परिसरात नऊ विभाग केले आहेत.
त्यासोबत ज्वारीचे सध्याचे सहा वैशिष्ट्यपूर्ण वाण हे नियंत्रक वाण म्हणून वापरण्यात आले आहेत. कुठल्याही पिकात एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर जननद्रव्ये चाचणीचा कार्यक्रम देशात पहिल्यांदाच होत असल्याचा दावा केला जात आहे.
हा आगळावेगळा प्रकल्प असून, राष्ट्रीय स्तरावरील जननद्रव्ये तपासणीचा विक्रमसुद्धा मानला जात आहे. या जननद्रव्यांची वेगवेगळ्या अवस्थेतील २६ गुणवैशिष्ट्ये या प्रकल्पात तपासण्यात येतील.
आतापर्यंत वेगवेगळ्या अवस्थेतील नऊ गुणवैशिष्ट्ये तपासून पूर्ण झाली आहेत. तसेच उर्वरित १७ गुणवैशिष्ट्ये ही पिकाच्या पुढील अवस्थेतील आहेत.
या जननद्रव्यांमध्ये गोड ज्वारी, एकेरी कापण्याची वैरण ज्वारी, दुहेरी कापण्याची वैरण ज्वारी, हुरड्याची ज्वारी, लाह्यांसाठीची ज्वारी, खरिपाची दुहेरी धान्य व कडब्यासाठी ज्वारी तसेच रब्बीसाठी वापरल्या जाणाऱ्या ठोकळ मोत्यासारखे दाणे असणारी ज्वारी व सोबतच वेगवेगळ्या रंगाची रंगीत ज्वारी उपलब्ध आहे.
या वाणांची पेरणी ही ८ नोव्हेंबरला केली असून, मार्च महिन्याच्या शेवटी ते काढण्यास तयार होईल. ज्वारी जननद्रव्ये तपासणी कार्यक्रम दिल्ली येथील राष्ट्रीय वनस्पती जिनोम संशोधन संस्था (एनपीजीआर) यांनी पुरस्कृत केला आहे.
त्यामध्ये भारतीय तृणधान्य संशोधन संस्था, हैदराबाद व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ हे या प्रकल्पातील मुख्य भागीदार आहेत. शास्त्रज्ञ डॉ. सुशील पांडे व डॉ. सुनील गोमासे, ‘पंदेकृवि’चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. आर. बी. घोराडे, डॉ. भरत गिते व एस. पी. गुठे यांचा या प्रकल्पाच्या अंमलबजावणीत वाटा आहे.
या जननद्रव्याच्या पैदास कार्यक्रमातील पुढील विकासासाठी व उपयोगासाठी ज्वारी शेतीदिन सोमवारी (ता. १३) वाशीम कृषी संशोधन केंद्राच्या शिवारात होईल. देशभरातील शास्त्रज्ञ या वेळी हजेरी लावतील.
सोबतच राज्यातील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी पाटील, कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे उपमहा निर्देशक डॉ. टी. आर. शर्मा, राष्ट्रीय पादप आनुवंशिक संसाधन ब्युरोचे संचालक डॉ. ज्ञानेंद्र प्रताप सिंग, भारतीय तृणधान्य संशोधन संस्थेच्या संचालिका डॉ. तारा सत्यवती उपस्थित राहतील.
‘ज्वारीतील विविधता मोठ्या गुणांचा मुक्त खजिना’
‘‘आजच्या या वातावरणातील हवामान बदलाच्या काळात आपल्या प्रमुख पिकांच्या उत्पादन वाढीची पातळी स्थिरावली आहे. जवळपास सगळ्याच महत्त्वाच्या पिकांमध्ये आनुवंशिक पाया (जेनेटिक बेस) विस्तारण्याची गरज आहे.
या काळात ज्वारीसारख्या पिकातील २५ हजार वैशिष्ट्यपूर्ण विविधता हा एक प्रकारे या पिकातील मोठ्या गुणांचा मुक्त खजिना आहे. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाच्या अनुषंगाने ज्वारी पिकातील शास्त्रज्ञांसाठी मोठी पर्वणी आहे.
या समृद्ध संपत्तीचा नियोजनबद्ध व योग्य उपयोग करून घेतल्यास महाराष्ट्रातील ज्वारी संशोधनास एक नावीन्यपूर्ण व आगळीवेगळी दिशा निश्चितपणे या प्रकल्पातून उपलब्ध होईल,’’ असे डॉ. गडाख यांनी सांगितले.
ज्वारीच्या या २५ हजार जननद्रव्यांमध्ये वैरण ज्वारी, गोड ज्वारी, हुरड्याठीची ज्वारी असे नानाविध वाण उपलब्ध आहेत. या आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाच्या निमित्ताने विद्यापीठाच्या संबंधित शास्त्रज्ञांनी अतिशय काटेकोरपणे नियोजन केलेला हा प्रकल्प येत्या काळात फायदेशीर ठरेल.
- डॉ. विलास खर्चे, संशोधन संचालक, पंदेकृवि, अकोला
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.