
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या उत्तर कोल्हापूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या (Congress) उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव (Jayshree Jadhav) यांनी तब्बल १८ हजार ९०१ मताधिक्याने विजय मिळविला आहे. या पोटनिवडणुकीत जयश्री जाधव यांना एकूण ९६ हजार २२६ मते मिळाली तर भाजपचे (BJP) उमेदवार सत्यजित कदम (Satyajeet Kadam) यांना ७७ हजार ४२६ मते मिळाली आहेत.
कोल्हापुरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी जयश्री जाधव यांच्या विजयासाठी मेहनत घेतली. पाटील यांच्या प्रयत्नामुळे भाजपला पराभव पत्करावा लागला आहे. पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने एकत्रित येत भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांचा मोठा पराभव केला आहे. निकालानंतर विजयी उमेदवार जयश्री जाधव यांचे अभिनंदन करण्यात येत असून समर्थक व कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत, फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला आहे.
जयश्री जाधव यांनी या विजयाचे संपूर्ण श्रेय सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि कोल्हापुरच्या सर्व जनतेला दिले आहे. आपापसातील मतभेद विसरून महाविकास आघाडीतील सहभागी नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी प्रचार केल्यामुळेच आपला विजय झाल्याचे जाधव म्हणाल्या आहेत.
पोट निवडणुकीत भाजपच्या चंद्रकांत पाटलांनी मनाचा मोठेपणा दाखवायला हवा होता. पण त्यांनी तसे केले नाही. कोल्हापूरची जनता स्वाभिमानी असून, आण्णांच्या माघारी त्यांनी आपले कर्तव्य पार पाडले. त्यामुळेच आण्णांनी जे पेरले तेच उगवले असल्याचे जाधव म्हणाल्या आहेत.
या पोटनिवडणुकीसाठी राज्य पातळीवरील नेते आणि कार्यकर्त्यांची जोरदार प्रचार फौज उतरली होती. आरोप-प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापले होते. अशात पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेचा मुद्दा बनली होती.
या निवडणुकीसाठी मंगळवारी (१२ एप्रिल) चुरशीने जवळपास ६१ टक्के मतदान झाले होते. एकूण २ लाख ९१ हजार ९७८ मतदारांपैकी एक लाख ७८ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या मतांची मोजणी राजाराम तलाव परिसरातील शासकीय गोदामात मोजणी करण्यात आली. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरूवात झाली होती. २६ टेबलांवरती २६ फेऱ्यांत ३५७ केंद्रावरील मतमोजणी करण्यात आली. यात अगदी पोस्टल मतांच्या फेरीपासूनच जयश्री जाधव यांनी आघाडी घेतली होती. ती त्यांनी अखेरच्या फेरीपर्यंत कायम ठेवली आणि विजयावर शिक्कामोर्तब केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.