
Shevgaon News : एप्रिल महिन्यामध्ये तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले. सर्व भागात नुकसानीचे पंचनामे झालेले असताना शेवगावातील सामनगाव व मळेगाव येथील बहुतांश शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामेच केले नसल्याचा आरोप करत त्याबाबत मळेगाव येथील माजी सरपंच शिवाजी भिसे यांनी तक्रार केली आहे.
केवळ हलगर्जीपणामुळे पंचनामे झाले नसल्याने दोन्ही गांतील शेकडो शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहावे लागणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. नगर जिल्ह्यातील अनेक भागात एप्रिल महिन्यात अतिवृष्टी, गारपिटीने पिकांचे नुकसान झाले. त्यानंतर लोकप्रतिनिधींनी बांधावर जाऊन पाहणी करत नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले.
शेवगाव तालुक्यातील मळेगाव व सामनगाव येथील अनेक शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामेच केले नसल्याचा आरोप जात आहे. महसूल विभागाने तलाठी, ग्रामसेवक व कृषी साहाय्यक यांच्या पथकाची गावनिहाय नेमणूक केली.
मात्र सामनगाव व मळेगाव येथील तलाठी, ग्रामसेवक, कृषी विभागाचे कर्मचारी यांच्यात पंचनामे करण्यासाठी समन्वय झाला नसल्यानेच पंचनामे केले नाहीत असा आरोपही केला आहे.
शेवगाव तालुक्यातील इतर गावांचे रीतसर पंचनामे होऊन त्याबाबतचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठवण्यात आला आहे. मात्र या दोन गावांतील पंचनामे न झालेले शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत.
याबाबत मळेगाव येथील माजी सरपंच शिवाजी भिसे यांनी तक्रार करून पाठपुरावा सुरू ठेवला आहे. शेवगावातील आढावा बैठकीसह तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्या तक्रारी मांडल्या, मात्र तक्रारीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा त्यांचा आरोप आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.