
आटपाडी, जि. सांगली ः तीस वर्षांच्या सातत्यपूर्ण संघर्षानंतर टेंभू योजनेतून (TEMBU Yojana) लाभक्षेत्रातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शिवाराला बंदिस्त वाहिनीने मोजून पाणी (Water Supply) देणारा देशातील पहिला ऐतिहासिक महत्त्वाकांक्षी प्रकल्प सहा महिन्यांत पूर्ण होणार आहे.
पाणी चळवळीपासून त्या-त्या वेळी राज्यात सत्तेवर असलेली सरकारे ते लोकप्रतिनिधींपासून गावगाड्यातील शेतकऱ्यांपर्यंत सर्वांचे मोठे योगदान राहिले आहे. या प्रकल्पाची जागतिक स्तरावर नोंद घेतली जाणार आहे.
टेंभू योजना राज्यातीलच नव्हे, तर देशपातळीवरचा आदर्शवत प्रकल्प म्हणून उभा राहतो आहे. तीन ठिकाणी पाणी उचलून आटपाडी, सांगोला आणि तासगाव तालुक्यांत शेतकऱ्यांच्या शिवारापर्यंत आणून दिले जाणार आहे.
त्याची सुरुवात आटपाडी तालुक्यातून केली आहे. यासाठी क्लस्टर नऊ आणि दहाची निवड केली आहे. त्यासाठी शेतकऱ्याला शिवारात बंदिस्त वाहिनीने पाणी आणून मोजून देणारी यंत्रणा उभारणी वेगाने सुरू आहे. मुख्य बंद वाहिनीची कामे झाली असून, पुढची वेगात सुरू आहेत. अशा पद्धतीचा शेतीला पाणी देणारा देशातील पहिला प्रकल्प आहे.
‘टेंभू’चा प्रवास रोचक आहे. १९९२ मध्ये क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी आणि त्यांचे सहकारी डॉ. भारत पाटणकर यांनी पाण्यासाठी रणशिंग फुंकले. अनेक आंदोलने केली. सत्तेतील नेतेमंडळींनीही अनमोल योगदान दिले.
आमदार, खासदार, मंत्री ते मुख्यमंत्री यांचा यात वाटा राहिला. १९९३ मध्ये युतीच्या सरकारने कृष्णा खोरे महामंडळाची स्थापना करून धडाक्यात काम सुरू केले. २००५ मध्ये तत्कालीन आघाडी सरकारने समन्यायी पाणी वाटपाला मंजुरी दिली; तर २०१६ मध्ये तत्कालीन भाजप-शिवसेनेने बंदिस्त वाहिनीने पाणी देण्यासाठी मंजुरी दिली होती. ‘कृष्णे’चे अतिरिक्त आठ टीएमसी पाणी देण्याचा निर्णयही झाला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.