
ॲग्रोवन वृत्तसेवा
Majhi Mati Maja Desh Campaign : मुंबई : ‘देशासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या त्याग आणि बलिदानामुळे आजचे स्वातंत्र्याचे अमृतक्षण आपण अनुभवतो आहोत. ‘माझी माती माझा देश’ अभियानातून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करीत आपण हा ऐतिहासिक वारसा जोपासण्याचे काम करीत आहोत. स्वराज्याचा हुंकार या महाराष्ट्राच्या मातीतून उमटला, त्याचा अभिमान प्रत्येकाने बाळगला पाहिजे,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
ऑगस्ट क्रांती मैदान येथे केंद्र शासनाच्या ‘आझादी का अमृत महोत्सव’ सांगतेच्या निमित्ताने ‘मेरी माटी-मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’अभियानाअंतर्गत देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांच्या नावाच्या शिलाफलकाचे अनावरण आणि ऑगस्ट क्रांती मैदानातील पुरातन वास्तूजतनाच्या विविध कामांचे लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनोज सौनिक, मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आदी या वेळी उपस्थित होते. यांच्यासह अन्य नेते, वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘महात्मा गांधींनी ब्रिटिशांना ‘चले जाव’चा नारा येथूनच दिला आणि तरुणांमध्ये चेतना जागविली.
ब्रिटिशांच्या अन्यायाविरुद्ध लढण्याची हिंमत आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी दाखविली. अशा अगणीत हुतात्म्यांच्या त्यागाने, बलिदानाने आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. महाराष्ट्राला शिवछत्रपतींचा वारसा आहे. त्यासोबत, संतांची, समाजसुधारकांची आणि क्रांतिकारांची मोठी फळी या महाराष्ट्राने देशाला दिली. केवळ त्यांच्या बलिदानाचे स्मरण करून नव्हे तर त्यांची निष्ठा तरुणांपर्यंत पोहोचवली पाहिजे, याच उद्देशाने हे अभियान देशभरात राबविले जात आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.