जळगाव ः हरभऱ्याचे उत्पादन (Chana Production) यंदा काहीसे कमी येत आहे. कोरडवाहू देशी हरभऱ्याचे उत्पादन (Desi Chana production) एकरी चार ते पाच क्विंटल एवढे हाती येत आहे.
हरभरा पीक खानदेशात रब्बीमध्ये (Rabi Chana) हुकमी किंवा प्रमुख आहे. खानदेशात यंदा एकूण चार लाख हेक्टरवर रब्बी हंगामाची पेरणी (Rabi Chana Sowing) झाली आहे. यात दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात हरभऱ्याची पेरणी झाली होती.
त्यातील विविध वाणांना पेरणीसाठी शेतकरी पसंती देतात. पण देशी हरभऱ्याची पेरणी अधिक असते. यापाठोपाठ काबुली, गुलर हरभरा पेरणी केली जाते.
काबुलीमधील दोन प्रकारच्या हरभऱ्याची पेरणी केली जाते. पण किमान दीड लाख हेक्टरवर देशी किंवा पारंपरिक हरभऱ्याची पेरणी केली जाते.
पाऊसमान चांगले राहिल्याने कोरडवाहू क्षेत्रातही बऱ्यापैकी पेरणी यंदाही झाली होती. तापी, गिरणा, अनेर, पांझरा, सुसरी, गोमाई आदी नदीच्या लाभक्षेत्रात कोरडवाहू व सिंचनाची सुविधा असलेल्या हरभऱ्याची पेरणी करण्यात आली होती.
कोरडवाहू हरभऱ्याची पेरणी दिवाळीनंतर झाली. ओलावा चांगला राहिल्याने काळ्या कसदार क्षेत्रात पीक जोमात होते.
परंतु या हरभऱ्याला फुलोरा व घाटे लागण्याच्या वेळेस ढगाळ, पावसाळी वातावरण होते. नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये अनेक दिवस किमान तापमान १५ अंश सेल्सिअसवर होते.
डिसेंबरमध्ये तर किमान तापमान १८ अंश सेल्सिअसवरही काही दिवस राहीले होते. तसेच दिवसा उकाडा व रात्री आर्द्रतायुक्त वातावरण अशी स्थिती होती.
हरभऱ्याला नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये कमाल दिवस कोरड्या, थंड, निरभ्र वातावरणाची गरज असते. परंतु या काळात वातावरण प्रतिकूल राहिल्याने घाटे, दाणे पक्व होणे यासंबंधी अडचणी आल्या.
तसेच बुरशीजन्य रोगही होते. काही शेतकऱ्यांना तीन वेळेस फवारणी घ्यावी लागली. यात उत्पादन खर्च वाढला.
तसेच उत्पादनही कमी आले आहे. मागील हंगामात कोरडवाहू क्षेत्रातील देशी हरभऱ्याचे एकरी सात ते आठ क्विंटल एवढे उत्पादन हाती आले होते. यंदा मात्र चार ते पाच क्विंटल एवढे उत्पादन हाती येत आहे.
उत्पादन कमी; खर्च जास्त
उत्पादन कमी असल्याने शेतकऱ्यांचा नफा कमी झाला आहे. तसेच मजुरी, निविष्ठांचे दरही २५ टक्के अधिक आहेत. यामुळे हा खर्चही वाढला आहे.
मळणीसाठी प्रतिक्विंटल २०० रुपये मोजावे लागत आहेत. हरभऱ्याची कापणी, तो कापणीनंतर गोळा करण्यासाठी एकरी तीन हजार रुपये खर्च येत आहे. हरभऱ्याचे दर टिकून असल्याने तेवढा दिलासा मात्र मिळत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.