APMC Election : साडेचार हजार जागांसाठी ३२ हजार अर्ज; चुरस वाढली

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांना रंग भरू लागला असून साडेचार हजार जागांसाठी ३२ हजारांहून अधिक अर्ज आल्यामुळे चुरस वाढली आहे.
apmc election
apmc electionAgrowon

Pune News : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांना (APMC Election) रंग भरू लागला असून साडेचार हजार जागांसाठी ३२ हजारांहून अधिक अर्ज आल्यामुळे चुरस वाढली आहे. दरम्यान, निधी नसल्यामुळे दहा बाजार समित्यांच्या निवडणुका घेण्यात अडचणी आल्या आहेत, अशी माहिती सहकार विभागाच्या सूत्रांनी दिली. (Latest Agriculture News)

महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार, राज्यात ३०६ बाजार समित्या असल्या तरी निवडणूक घेण्यास पात्र समित्यांची संख्या २८१ आहे.

त्यातील चार समित्यांच्या निवडणुका तत्काळ घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यामुळे चार समित्यांची निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. दोन बाजार समित्यांचे एकत्रीकरण झाले आहे. त्यामुळे त्या आता निवडणूक पात्र गटात नाहीत.

apmc election
Kolhapur Apmc Election : कोल्हापूर बाजार समितीत पॅनेलबाबत नेत्यांचा सावध पवित्रा

१७ बाजार समित्यांकडे निवडणूक निधी नसल्यामुळे प्रक्रिया रखडलेली आहे. मात्र, त्यातील सात निवडणुकांचे निवडणूक कामकाज आता चालू झाले आहे. परंतु, उर्वरित १० समित्यांची समस्या अद्याप कायम आहे.

वार्षिक अंदाजपत्रक तयार करताना समित्यांनी निवडणूक निधीसाठी तरतूद करणे अपेक्षित असते. परंतु, काही समित्यांकडे दुर्लक्ष करतात. तसेच, जिल्हा उपनिबंधकदेखील वेळीच तंबी देत नाहीत. त्यामुळे अशा समित्यांच्या निवडणुका घेण्यात अडचणी तयार होतात.

दरम्यान, बाजार समित्यांच्या ग्रामपंचायत गटांत अर्ज भरलेल्या शेकडो सदस्यांचे अर्ज बाद ठरले आहेत. या सदस्यांनी शेतकरी दाखला न दिल्यामुळे अर्ज बाद करण्यात आले आहेत. ग्रामपंचायत सदस्यांना या निवडणुकांसाठी रहिवासी व शेतकरी दाखले देण्याची जबाबदारी तलाठ्यांची होती. बहुतेक ठिकाणी तलाठ्यांनी दाखले दिलेच नाही.

apmc election
Apmc Election Update : बाजार समिती निवडणुकीत शेतकरी उपेक्षितच

निवडणूक प्राधिकरणाने याबाबत दोनवेळा जिल्हाधिकाऱ्यांना पत्रे लिहिली. तहसीलदारांनी दाखले दिल्यास ग्राह्य धरले जातील, अशीदेखील भूमिका प्राधिकरणाने घेतली.

मात्र, महसूल विभागाने अजिबात दाद दिली नाही. त्यामुळे शेकडो सदस्यांना निवडणूक प्रक्रियेत भाग घेता आलेला नाही.

प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, आता छाननीची तारीख उलटून गेली आहे. त्यामुळे हा विषय आता आमच्यापुरता संपला आहे. जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यास मात्र १२ महिन्यांची मुदत दिली गेली आहे.

निवडणुकांसाठी राज्यभर विविध पक्ष व गटातटांनी मोर्चेबांधणी सुरू आहे. एका बाजार समितीच्या सचिवाने दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक घेताना मतदारसंघ तालुक्याच्या ठेवण्याची सक्ती निवडणूक यंत्रणा करीत आहे. त्यामुळे मतदानावर विपरीत परिणाम होईल.

बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी पूर्वीसारखीच ठराविक ४-५ किलोमीटर अंतरावर मतदान केंद्रे उभारल्यास मतांचा टक्का चांगला राहील. अन्यथा, काही बाजार समित्यांमध्ये अत्यल्प मतदान होण्याची शक्यता आहे.

apmc election
Sangli Apmc Election : सांगली बाजार समितीच्या माजी संचालकांच्या अपात्रतेवर उद्या सुनावणी

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३० एप्रिलपर्यंत निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याचे नियोजन आम्ही केले आहे. राज्यातील १७ बाजार समित्यांकडे निवडणूक घेण्यासाठी निधी नाही. त्यापैकी ७ समित्यांनी निधी जमा केला आहे. परंतु, उर्वरित दहा समित्यांबाबत तोडगा निघालेला नाही.

- डॉ. पी. एल. खंडागळे, सचिव, महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण

२५५ बाजार समित्यांमधील निवडणुकीचे चित्र असे

मतदार संघ --- रिक्त जागा---प्राप्त उमेदवारी अर्ज

सहकारी संस्थांचा मतदार संघ---२८०५---१९५१८

ग्रामपंचायत मतदार संघ---१०२०---९१८९

व्यापारी,आडते मतदार संघ---५१०---२५६६

हमाल,तोलारी मतदार संघ---२५५---१२८६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com