
ॲग्रोवन वृत्तसेवा
नाशिक/पिंपळगाव बसवंत, ता. निफाड : अवकाळी पावसाच्या संकटातून वाचविलेल्या प्रामुख्याने रंगीत वाणांच्या द्राक्ष बागा (Grape Vineyard) आता एका नव्या संकटात सापडल्या आहेत. या ठिकाणी मोठ्या संख्येने येणाऱ्या वटवाघळांच्या (Bat) झुंडीकडून काढणीयोग्य होत असलेल्या द्राक्षबागेतील साखर उतरून द्राक्ष परिपक्व द्राक्ष घडांना वटवाघळांनी लक्ष्य केले आहे. यामुळे वटवाघळांच्या झुंडीनी द्राक्ष उत्पादक (Grape Grower) शेतकऱ्यांची झोपच उडविली आहे.
निफाड चांदवड व दिंडोरी परिसरातील काही शेतकऱ्यांनी वाहनात बदल करून फ्लेम, नानासाहेब पर्पल, मामा जम्बो, शरद सीडलेस अशा रंगीत वाणांचे उत्पादन घेतले जात आहे. मात्र तयार होत असलेल्या घडाला अवघ्या काही तासांतच वटवाघूळ यांच्याकडून फस्त केले जात आहे. त्यामुळे हे नुकसान टाळण्यासाठी व वटवाघळांचा उपद्रव रोखण्यासाठी बागेवर जाळी टाकण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढवली आहे. वटवाघळांच्या हल्ल्याने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे.
निफाड, दिंडोरी तालुक्यात अधिक क्षेत्र असून, सध्या बागांमधील द्राक्षघड परिपक्व होण्याच्या स्थिती आहे. अतिवृष्टीतपण मोठ्या जिद्दीने यंदा द्राक्ष उत्पादकांनी बागा तयार केल्या आहे. अगोदरच पीकसंरक्षण खर्च वाढला असताना निर्यातक्षम माल तयार केला आहे. पण रसाळ, टपोरी द्राक्ष घडांना वटवाघळांची दृष्ट लागली आहे. पिंपळगाव बसवंत येथील एका शेतकऱ्याच्या बागेतील सत्तर टक्के द्राक्षघड वटवाघूळ यांनी फस्त केल्याने वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फिरले गेले.
एकरी दहा हजार खर्च
वटवाघळांच्या संकटाला तोंड देण्यासाठी द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना आर्थिक झळ बसत आहे. वटवाघळांपासून संरक्षण करण्यासाठी बागेवर जाळी टाकावी लागत आहे. एकदा वापरली जाणाऱ्या जाळीला एकरी दहा हजार रुपये खर्च येतोय. त्यामुळे वटवाघळांचा बागेतील शिरकाव रोखला जात आहे. जाळी शिवाय काही ठिकाणी रात्रीच्या वेळी बागेत फटाके फोडले जात आहे. तर कुठे हॅलोजन सोडून लख्ख प्रकाश केला जातो आहे.
नुकसानीनंतर मदतीची हमी नाहीच...
वटवाघळामुळे नुकसानग्रस्त बागेचे तलाठ्यामार्फत पंचनामे झाले. पण या संकटाला कशात मोजायचे याचे परिमाण नाही. त्यामुळे पंचनामे करूनही शासनस्तरावरून भरपाई मिळेलच याची खात्री नाही. पुढील हंगामापासून विमा काढताना वटवाघळांकडून होणाऱ्या नुकसानीचा समावेश करण्याची मागणी आता होत आहे.
वटवाघळांकडून होत असलेल्या नुकसानीने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. माझ्या बागेत दोन दिवसांपासून वटवाघळे घिरट्या मारत आहे. त्यावर उपाय म्हणून पाच एकर क्षेत्रावर जाळी पसरविली आहे.
- सुधाकर मेंगाणे, द्राक्ष उत्पादक, पिंपळगाव बसवंत
रंगीत वाणांचे द्राक्ष घड प्रामुख्याने फस्त करतात. यापूर्वी ११० रुपये किलोने सौदे झाले होते. त्यानंतर काढणी होण्यापूर्वीच माल फस्त केल्याचे प्रकार घडलेले आहेत. त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी जाळीचा वापर केला जात आहे.
- बाबाजी सलादे, द्राक्ष उत्पादक शेतकरी, वडनेरभैरव, ता. चांदवड
पिंपळगाव बसवंत, ता. निफाड : परिसरात रंगीत वाणांच्या द्राक्ष बागांवर वटवाघळांच्या झुंडीचा हल्ला केल्याने द्राक्ष घडांचे झालेले नुकसान तर दुसऱ्या छायाचित्रात शेतकऱ्यांना बागा वाचविण्यासाठी लावलेली जाळी.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.