
Nanded Rain Update नांदेड जिल्ह्यात गुरुवारी (ता. १६) सायंकाळी पाचच्या सुमारास तुफान वादळ वाऱ्यासह गारपिटीमुळे (Nanded Hailstorm) केळी बागा उद्ध्वस्त (Banana Orchard Damage) झाल्या आहेत.
यासोबतच रब्बी पिकांचेही (Rabi Crop Damage) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अनेक घरांवरील पत्रे उडून गेले आहेत. या सोबतच वीज पडून नागरिक जखमी झाले आहेत.
तर जनावरेही दगावले (Animal Died) आहेत. प्रशासनाने पंचनाम्याचे आदेश दिल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली
जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. गुरुवारपासून जिल्ह्यात अतिवृष्टी पावसासह गारपीट होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला होता.
यानुसार गुरुवारी (ता. १६) तीनच्या सुमारास तुफान वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. या वेळी वाऱ्यासह गारांचे प्रमाण अधिक असल्याने नुकसानीचे प्रमाण अधिक आहे.
मुदखेड तालुक्यातील बारड, निवघा, पाटनूर, खांबाळा, जवरा मुरार, चोरंबा, नागेली, पाथरड, बोरगाव, नाद्री, मुगट, आमदुरा, शंखतीर्थ, चीतगिरी, शेम्बोली, पांढरवाडी, वैजापूर, पार्डी, गोबरा तांडा, तिरकसवाडी आदी गावांसह परिसरात नुकसान झाले.
अनेक गावांत गारांचा पाऊस झाल्यामुळे घरावरील पत्रे पत्रे उडून गेली. झाडे कोलमडून पडली. यामुळे अनेकांचा संसार उघड्यावर पडला आहे. या वातावरणात नागरिकांना जीव मुठीत धरून आसरा घ्यावा लागला.
अवकाळी पावसादरम्यान गारांचा मारा सुरू झाल्याने रब्यातील गहू, हरभरा पिकाचा चिखल झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिरावल्याने मोठे संकट उभे राहिले आहे.
तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या केळी पिकाचे नुकसान पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले आहेत. या अस्मानी संकटात वेलवर्गीय पीक टरबूज, खरबूज, काकडीसह टमाटर, स्ट्रॉबेरी आदी पिकांची प्रचंड नासाडी झाली आहे.
वादळाचा तडाखा चिकू, आंबा, संत्रा, मोसंबी या फळपिकांना बसला. झाडाखाली फळांचा सडा पडला होता. विद्युत प्रवाहाचा मुख्य तारा खांब कोलमडून पडल्यामुळे विद्युत प्रवाह बंद झाला आहे. यामुळे महावितरणचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पंचनाम्याचे आदेश
अवकाळी पावसासह गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी यंत्रणेला दिले आहेत. यासोबतच विमाधारक शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत शेतकऱ्यांना नुकसानीची पूर्वकल्पना द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
वीज पडून दोन जखमी
नांदेड जिल्ह्यातील कोडगाव (ता. लोहा) येथे दुपारी चारच्या सुमारास वीज पडून गोविंद अर्जुन दर्शने (वय ६०) व शिवाजी रामा भरकडे (वय ३८) या दोन व्यक्ती जखमी झाल्याची घटना घडली आहे.
जनावरांचा मृत्यू
मुखेड तालुक्यातील लादगा येथील शेतकरी अंतेश्वर केशव जाधव यांची शेळी वीज पडून दगावली आहे. बाऱ्हाळी येथील शेतकरी कांशीराम संभा अस्वले यांची म्हैस वीज पडून मृत झाली आहे. मारजवाडी येथे व्यंकट मारोती कोंडेवाड यांच्या शेतात वीज पडून बैल दगावला आहे. तर काकांडी (ता. नांदेड) येथील राजेश शंकर पांचाळ यांची म्हैस दगावली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.