
Balasaheb Thorat News : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्कवाढ केल्याने राज्यातील कांद्याचे दर उतरले आहेत. दरम्यान सरकारच्या या धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाला आहे. मागच्या दोन दिवसांपासून बाजार समित्या बेमुदत बंद करण्यात आल्या आहेत. यावर राज्यातील विरोधकांनी आवाज उठवण्यास सुरूवात केली आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्कवाढीचे केंद्र सरकारचे धोरण शेतकरी विरोधी आहे. तसेच टोमॅटोचे दर वाढल्यानंतर नेपाळहून टोमॅटोची आयात केली. आता कांद्याचे चांगले दर शेतकऱ्यांना मिळत असताना कांद्याच्या निर्यात शुल्कात वाढ केली. शेतकऱ्यांना मारून स्वस्ताई आणण्याचा केंद्राचा हा प्रयत्न निषेधार्ह असल्याची जोरदार टीका बाळासाहेब थोरात यांनी केली.
नाशिक दौऱ्यावर आलेल्या थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी कांदा प्रश्नावरून त्यांनी केंद्राच्या शेतकरीविरोधी धोरणावर टीकास्त्र डागले. केंद्राने लावलेले शुल्क अन्यायी आहे. शेतकऱ्याला आता कुठे चार पैसे अधिक मिळत होते.
त्यामुळे शुल्क वाढवून शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण घालण्याचा प्रयत्न केला गेला. केंद्राचे हे धोरण शेतकऱ्यांसाठी मारक आहे. केंद्र सरकारला ग्राहकांचे हित जपायचे असल्यास, अनुदानातून ग्राहकाला दिलासा देण्याची गरज होती.
परंतु, त्याऐवजी केंद्र सरकार शेतकऱ्यांवरच अन्याय करत असल्याचा आरोपही थोरात यांनी केला. केंद्राने जाहीर केलेला २४१० रुपयांचा भाव कमी आहे. यातून शेतकऱ्याचा उत्पादन खर्चही निघणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
नाशकात काँग्रेसमध्ये कुठेही गटबाजी नसून हा मनाचा खेळ आहे. आमच्या पक्षात लोकशाही अधिक असल्यामुळे गटबाजी दिसते. परंतु,आम्ही एकत्र राहू आणि विरोधकांच्या विरोधात लढू, असा दावाही थोरात यांनी केला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.