Nagar News : मुस्लीम धर्मातील असले तरी आयुष्यभर पंढरीच्या पांडुरंगाचे वारकरी, विठ्ठलभक्त, अध्यात्म, समाजप्रबोधन, हिंदू-मुस्लीम समाजातील एकमेकांबद्दलचा द्वेष दूर करण्याचे काम केले.
एवढेच नव्हे विठ्ठलाची महती सांगणारे चार ग्रंथ लिहले आहेत. आता ४०० वर्षांचा काळ उलटून गेला. तेव्हापासून संत शिरोमणी शेख महंमद महाराज यांच्या वाहिरा (ता. आष्टी, जि. नगर) येथील दरबारात अध्यात्माचा अविरत जागर सुरु आहे.
नगर जिल्ह्याला लागून असलेल्या वाहिरा येथील हिंदू-मुस्लीम एक्याचे प्रतीक असलेल्या या ठिकाणाहून गेल्या ३०० वर्षांपासून बंद असलेली वारी यंदा पंढरपूरसाठी सुरु सुरु झाली आहे. संत शेख महंमद महाराज यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी गुरू मानले होते.
वाहिरा हे संत शिरोमणी शेख महंमद महाराज यांचे जन्मगाव. त्यांची समाधीही येथे आहे. साधारण १५७४ ते १६७५ हा महंमद महाराजांचा कार्यकाळ. नगर, मराठवाड्यासह राज्यात महंमद महाराज यांनी कीर्तन, प्रवचन, भजने, दोहे, व हिंदी कवितांच्या माध्यमातून जनजागृती, प्रबोधन केले. तेलंगणा, हैदराबाद भागातही त्यांच्या कार्याचा उल्लेख आहे.
संत तुकाराम महाराज व त्यांची पंढरपुरात भेट व्हायची, असे सांगितले जाते. त्यांनी ‘योगसंग्राम’, निष्कलंक प्रबोध’, ‘पवनविजय’, ‘साठी संवत्सर’ हे ग्रंथ लिहिलेले आहेत. साधारण ३०० पेक्षा अधिक अभंग लिहिलेले आहेत.
श्रीगोंदा (जि. नगर) येथे त्यांचे अधिक काळ वास्तव्य होते. येथे मालोजीराजे भोसले यांनी त्यांना मोठा मठ बांधून दिला. औरंगजेबानेही वाहिरा येथे ४०० एकर जमीन बक्षीस म्हणून दिली, असे सांगितले जाते.
‘‘वाहिरा येथील किसन महाराज आटोळे यांनी शेख महंमद महाराज यांच्या जीवनावर चरित्र तसेच १०० अभंगावर विवेचन केलेले आहे. सध्याच्या धार्मिकतेच्या दूषित वातावरणात महाराजांच्या विचाराने हिंदू-मुस्लीमांतील सामाजिक ऐक्याचे दर्शन पाहायला मिळत आहे,’’ असे सिद्धनाथ मेटे महाराज म्हणाले.
दिंडीला पहिला मान
वाहिरा येथून दरवर्षी नियमितपणे कार्तिकी एकादशीला पंढरपूर, नाथषष्ठीला पैठण, संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यासाठी आळंदीला, तसेच त्र्यबकेश्वरला त्यांचे वंशज दिंडी काढतात. शेख महंमद महाराजांचा पांढरा श्वेतध्वज आहे. हा श्वेतध्वज असलेली दिसली की सर्व ठिकाणी दिंडीला पहिला मान मिळतो व स्वागत होते.
भगव्यासोबत पांढरा श्वेतध्वज
संत शिरोमणी शेख महंमद महाराज यांच्या काळात भगव्या पताकासोबत त्यांनी पांढरा श्वतेध्वज निर्मित केला. तेव्हापासून भगव्या पताकेसोबत पांढऱ्या श्वेतध्वजाचे पूजन केले जाते. मिरवणूकांतही हा ध्वज अग्रभागी असतो. खंडित झालेला दिंडी सोहळा यंदा येथील सामाजिक कार्यकर्ते सिद्धनाथ महाराज मेटे, किसन महाराज आटोळे, सोमनाथ शेलार, सदाशिव पगारे, गणेश माळशिखारे, सुदाम मेटे, विजय घोंगडे आदींनी सोहळा सुरु केला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.