स्वप्नांच्या शिखरावर : अरुणिमा सिन्हा

भीषण अपघातात पाय गमावलेली एक युवती जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर करते आणि एव्हरेस्टवर पोहोचणारी पहिली भारतीय दिव्यांग महिला बनते, ही घटना मानवजातीला आशेचा किरण दाखवणारी आहे.
माउंट एव्हरेस्ट
माउंट एव्हरेस्टAgrowon
Published on
Updated on

भीषण अपघातात पाय गमावलेली एक युवती जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर करते आणि एव्हरेस्टवर पोहोचणारी पहिली भारतीय दिव्यांग महिला बनते, ही घटना मानवजातीला आशेचा किरण दाखवणारी आहे. मरगळलेल्या आणि मृतप्राय मनांमध्ये चैतन्य भरण्याचं सामर्थ्य तिच्या चरित्रामध्ये आहे.

अरुणिमा सिन्हा यांचा जन्म उत्तर प्रदेशमधील आंबेडकर नगरचा. तिला लहानपणापासूनच खेळांची आवड. अरुणिमा सिन्हा भारताच्या व्हॉलीबॉल संघातील एक उत्तम खेळाडू होती.१२ एप्रिल २०११ या दिवशी तिच्या आयुष्याला वेगळं वळण लावणारी एक घटना घडली.

सी. आय. एस. एफ. च्या परीक्षेसाठी ती लखनऊहून दिल्लीला जायला निघाली होती. अरुणिमा रेल्वेच्या डब्यात बसलेली असताना काही गुंडांचं टोळकं आत शिरलं. त्यांनी लोकांना धमकावून लूटमार सुरू केली. लोक घाबरून शांत उभे होते, पण अरुणिमा कसली घाबरते? भीती तिला माहितीच नव्हती. तिच्या गळ्यातली सोन्याची चेन खेचणाऱ्या गुंडांचा तिने यथाशक्ती प्रतिकार केला.

गुंडांनी तिला बेदम मारहाण करून रेल्वेबाहेर फेकून दिले. अरुणिमा दुसऱ्या रेल्वे रुळावर पडली. त्याचवेळी रेल्वेचं एक अजस्र धूड वेगाने तिच्या पायावरून पुढे गेलं आणि तिच्या त्या पायाची चाळण झाली. रात्रभर अरुणिमा त्या ट्रॅकवर जखमी अवस्थेत पडून होती. दुसऱ्या दिवशी बरेली इथल्या सरकारी रुग्णालयात तिला हालवलं गेलं. पण दुर्दैवाने तिथे पुरेशा सुविधा उपलब्ध नव्हत्या.

माउंट एव्हरेस्ट
Crop Damage : यवतमाळ जिल्ह्यात वीस हजार हेक्टर क्षेत्र बाधित

भूल न देताच तिचा जखमी पाय कापून काढावा लागला. तिला एम्स रुग्णालयात पुढील उपचारांसाठी दाखल केलं गेलं. नंतर तिला कृत्रिम पाय बसवण्यात आला. या शारीरिक दुखण्यासोबत एक मोठा मनस्ताप तिच्या वाट्याला आला. या अपघातासाठी पोलिसांनी अरुणिमालाच जबाबदार ठरवलं.

त्याविरुद्ध तिला अलाहाबाद उच्च न्यायालयात लढा द्यावा लागला. पाय गमावल्यामुळे तिची व्हॉलिबॉलमधली कारकीर्दही संपुष्टात आली. सातत्याने निराशाजनक गोष्टी घडत असताना देखील अरुणिमाने आपली जगण्याची उमेद हरवू दिली नव्हती. या सगळ्या प्रवासात तिचे कुटुंबीय भक्कमपणे तिच्या पाठीशी उभे होते.

थोडीशी बरी झाल्यानंतर तिने माउंट एव्हरेस्टच्या मोहिमेवर जाण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी तिच्या या निर्णयाची अनेकांनी थट्टा केली. दोन्ही पायांनी खचलेल्या अवस्थेत कोणी अशी अवघड मोहीम करू शकतं यावर कुणाचाच विश्‍वास नव्हता. ते साहजिकही होतं. कारण तोपर्यंत तरी कुणी अशा अवस्थेत ही कामगिरी केलेली नव्हती.

अरुणिमा माउंट एव्हरेस्ट शिखर सर केलेल्या पहिल्या भारतीय महिला बच्छेंद्री पाल यांना भेटायला गेली. त्यांनी मात्र तिला अत्यंत सकारात्मक मार्गदर्शन केलं. एका मुलाखतीत त्या म्हणतात, ‘‘मी अरुणिमाला सांगितलं, की लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नकोस, तू एक शिखर आधीच पार करून आलेली आहेस, तुझ्या मनातल्या अडथळ्यांचं माउंट एव्हरेस्ट! आता तू प्रत्यक्षातला माउंट एव्हरेस्ट चढायचाय तो केवळ स्वतःला सिद्ध करण्यासाठी.’’ या शब्दांनी अरुणिमाला फारच उभारी मिळाली.

नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग इथे रीतसर प्रशिक्षण घेतल्यानंतर ती एव्हरेस्ट मोहिमेसाठी सज्ज झाली. कमरेखालून एक संपूर्ण पाय तिने गमावला होता, त्याजागी कृत्रिम पाय बसवण्यात आला होता, तरीही तिने या साहसी मोहिमेचा हट्ट धरला होता.

माउंट एव्हरेस्ट
Crop Management : आंतरपीक, मिश्र व बहुविध पीकपद्धतीतून समृद्धी

एका दिव्यांग मुलीचा गाइड म्हणून आपल्याला एव्हरेस्टवर जायचं आहे हे ऐकून तर तिचा शेरपा पारच गळपटून गेला. मोठ्या मुश्किलीने त्याची समजूत घालून त्याला तयार करण्यात आलं.धडधाकट माणसांना धडकी भरवणारी हिमालयाची उंच शिखरं आणि हाडं गोठवणारी कडाक्याची थंडी यांना न जुमानता अरुणिमाने आपला प्रवास सुरू ठेवला.

पाठीवर मोठं ओझं आणि कमरेखालचा सतत निसटू पाहणारा कृत्रिम पाय सांभाळत चढाई करणं ही कसरत मोठीच अवघड होती. पण तिची जिद्द एवढी प्रचंड होती, की कॅम्पमधल्या सर्व सहकाऱ्यांपेक्षा ती वेगाने पुढे जात होती. शेवटच्या टप्प्यात तर तिचा ऑक्सिजनसुद्धा संपायला आला होता. कोणत्याही क्षणी मागे फिरावं लागेल अशी परिस्थिती होती.

पण अखेर तो सोन्याचा दिवस उगवलाच! २१ मे २०१३ रोजी सकाळचे दहा वाजून पंचावन्न मिनिटं होताहेत आणि इथे... जगातल्या सर्वांत उंच शिखरावर अरुणिमा सिन्हा ही दिव्यांग तरुणी भारताचा ध्वज फडकावून अभिमानाने उभी आहे. केवळ अशक्य वाटावा असा चमत्कार अरुणिमाने आपल्या जिद्दीच्या जोरावर घडवून आणला होता.

लहानसहान आघातांनी खचून जाऊन जगण्याची आशा सोडून देणाऱ्या सर्वांसाठी अरुणिमा सिन्हा हे एक लखलखतं उदाहरण आहे. एवढंच करून ती थांबली नाही तर त्यानंतरही जगभरातल्या अशा अनेक अवघड गिर्यारोहण मोहिमा तिने पार पाडल्या.

माउंट एव्हरेस्ट
Crop Damage : अतिवृष्टीच्या नुकसानीसाठी पन्नास कोटींची मागणी

यासाठी तिला पद्मश्री, तेनसिंग नोर्गे यांसारख्या महत्त्वाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. या पुरस्कारांची रक्कम तिने सामाजिक कार्याला मदत म्हणून दिली आहे. इच्छाशक्ती प्रबळ असेल आणि तिला योग्य कृतीची जोड असेल तर जीवनात अशक्य असं काहीच नाही हे अरुणिमा सिन्हा यांच्याकडे पाहून उमगतं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com