
Yaval Market Yard: यावल, जि. जळगाव : केळी व्यापाऱ्यासोबत दुय्यम प्रतीचे केळी घड (Banana)
देण्याबाबतचा सौदा केला. मात्र व्यापाऱ्याने केळी बागेतील उच्च प्रतीची
केळी कापून तालुक्यातील डांभूर्णी येथील केळी उत्पादकाची फसवणूक करण्याचा
प्रयत्न केला.
याबाबत उत्पादकाने तत्काळ यावल बाजार समितीकडे (Yaval Market Committee) तक्रार
केली. त्याची दखल घेऊन बाजार समितीने निरीक्षणाअंती व्यापाऱ्यास २१ हजार
रुपयांचा दंड आकारत उत्पादकास उच्च मालाच्या फरकातील ९ हजार ६१२ रुपये
देण्याचे आदेश दिले. बाजार समितीने तत्काळ केलेल्या कारवाईबाबत
शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
डांभूर्णी (ता. यावल) येथील केळी उत्पादक पुरूजीत चौधरी यांनी धरणगाव
येथील जावेद रहीम बागवान या व्यापाऱ्यासोबत केळी बागेतील दुय्यम
प्रतीच्या केळीचे घड देण्याबाबतचा सौदा केला होता. मात्र व्यापाऱ्याने
बागेतील उच्च प्रतीचे घड कापले.
त्याचबरोबर दुय्यम प्रतीच्या, केळी
घडांच्या रकमेनुसार २४ हजार ७८८ रुपयाचे बिल तयार केले. केळी उत्पादक
चौधरी यांनी तत्काळ बाजार समितीकडे तक्रार दिली. त्यानंतर बाजार
समितीच्या निरीक्षकांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी तक्रारीत
तथ्य आढळून आले. त्यानुसार बाजार समितीने कारवाई केली आहे.
व्यापाऱ्याचा माफिनामा
व्यापाऱ्यांनी कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी फरकाची रक्कम व दंडाची रक्कम
भरण्याचे मान्य करत बाजार समितीला यापुढे अशी चूक करणार नसल्याचे नमूद
करत माफिनामा लिहून दिला.
बाजार समितीच्या या कारवाईने शेतकऱ्याचे होणारे
दहा हजार रुपयांचे नुकसान टळले आहे. बाजार समितीच्या या कारवाईने
तालुक्यातील केळी उत्पादकात समाधान व्यक्त केले जात आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.