Maratha Protest Kolhapur : कोल्हापुरातील मराठा समाज आक्रमक, गांधी जयंतीपासून आमरण उपोषण करणार
Maratha Aarakshan News : मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे- पाटील यांनी तुर्तास आमरण उपोषण स्थगीत केले. परंतु त्यांनी सरकारला काही अटी घालत एका महिन्याची मुदत मागितली आहे. दरम्यान मनोज जरांगे यांच्यानंतर आता कोल्हापुरातील मराठा समाज आक्रमक झाला आहे.
कोल्हापूर सकल मराठा समाजातर्फे येथील विठ्ठल मंदिरात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे, तसेच सन २०११ मध्ये देशात जातनिहाय केलेल्या जनगणनेचा अहवाल जाहीर करावा, यासह विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाजातर्फे अॅड. बाबा इंदूलकर आणि दिलीप देसाई हे येथील छत्रपती शिवाजी चौकात २ ऑक्टोबर या गांधी जयंतीपासून आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा करण्यात आली.
यावेळी मराठा समाजाचे कार्यकर्ते बाबा इंदुलकर म्हणाले की, आपला देश राज्यघटनेवर चालतो. यामुळे पन्नास टक्यावरील ईडब्लूएसचे दहा टक्यांचे आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने घटनेत दुरूस्ती केली. हे आरक्षण केवळ मराठा समाजासाठी नाही. यामुळे याचा फारसा लाभ समाजाला होत नाही. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याची कुजबूज सुरू झाल्यानंतर सत्तेतील बडे राजकीय नेते ओबीसींना रस्त्यावर उतरवत आहेत.
मराठा समाजाविरोधात बोलण्यास भाग पाडत आहेत. यामुळे मराठा समाजाला एकत्र येत पुन्हा एकदा सरकारच्या खुर्चीखाली जाळ येण्यासाठी विविध मार्गाने आंदोलन करण्याची गरज आहे. म्हणूनच मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी २ ऑक्टोबरला गांधी जयंतीपासून माझ्यासह मराठा समाजाचे दिलीप देसाई उपोषणला बसणार असल्याची माहिती इंदुलकर यांनी दिली.
यावेळी शिवसेनेचे सुजीत चव्हाण म्हणाले की, कोणतेही सरकार सत्तेत आले तरी मराठा समाजावर त्यांनी अन्यायच केला आहे. आजपर्यंत आरक्षण न दिलेलेच मराठा समाजाबद्दल आता सहानुभूती दाखवली जातेय. मराठा समाज दुसऱ्याचे काढून आम्हाला आरक्षण द्या, अशी मागणी करीत नाही.
आमच्या हक्काचे आरक्षण मिळावे, अशी त्यांची मागणी आहे. आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्य, केंद्र सरकारकडे पाठपुरावा करीत आहेत. संध्याकाळपर्यंत आरक्षणप्रश्नी चांगली बातमी येईल. समाजाला रस्त्यावर उतरण्याची वेळ येणार नाही असे चव्हाण म्हणाले.
यावेळी रूपेश पाटील, अनिल घाटगे, किशोर घाटगे, सुनीता पाटील आदींची भाषणे झाली. बैठकीस ठाकरे गट शिवसेनेचे संजय पवार, सुशील भांदिगरे, बाबा पार्टे, धनंजय सावंत, अमरसिंह निंबाळकर, उदय भोसले, सुनील मोदी आदी उपस्थित होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.