Agriculture Minister : नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादात सापडणारे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. त्यांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचे उघड झाले असून त्यांच्यावर खटला चालवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानसभा निवडणूक २०१४ आणि २०१९ मध्ये निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये संपत्तीबाबत अपुरी माहिती दिल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी सिल्लोड येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मीनाक्षी एम. धनराज यांनी सीआरपीसी २०४ अन्वये कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. सत्तार यांच्या विरोधात लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१च्या कलम ‘१२५ अ’नुसार या न्यायालयात खटला चालवण्याचे निर्देश दिले आहेत.
अब्दुल सत्तार यांनी 2014 आणि 2019 मध्ये निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रात मालमत्तेसंबंधी माहितीत तफावत असल्याची याचिका सिल्लोड येथील सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्ली यांनी दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने याप्रकरणी पोलिसांना चौकशीचे आदेश दिले होते. त्यामध्ये पोलिसांना मालमत्तांसंदर्भात देण्यात आलेल्या माहितीत तफावत असल्याचे दिसून आले.
त्यानंतर सिल्लोडच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मीनाक्षी धनराज यांनी सत्तारांविरुद्ध प्रथमदर्शनी पुरावे असल्याचं मान्य करत फौजदारी खटला चालवण्याचे आदेश दिले आहे.
राज्यात मंत्रिमंडळ विस्तारची चर्चा आहे. शिवसेनेच्या आमदारांमध्ये मंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू आहे. त्यात राज्य सरकारमधील वादग्रस्त मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाणार असल्याची चर्चा आहे. वारंवार वादग्रस्त विधान आणि प्रकरणांमुळे चर्चेत असणारे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे मंत्रिमंडळातून काढण्याची शक्यता आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.