
Nagar News : महाराष्ट्रात सोयाबीन पिकानंतर हरभरा पिकाखालील क्षेत्र वाढत आहे. सध्या बदलत्या हवामानात तग धरुन राहणारे, अधिक उत्पादन देणारे, यंत्राच्या सहाय्याने काढता येणारे वाण या बाबींवर संशोधनाची दिशा निश्चित व्हावी.
स्पीड ब्रिडिंग, अधिक पोषणमूल्य असलेले वाण यावरही संशोधन असावे. त्यामुळे कडधान्य व तेलबिया पिकांमधील संशोधनासाठी विशेष ‘रोडमॅप’ तयार करण्याची गरज आहे,’’ असे मत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी व्यक्त केले.
राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठात कडधान्य सुधार प्रकल्प आणि भारतीय कडधान्य संशोधन संस्था, कानपूर (भाकृअप) यांचे संयुक्त विद्यमाने २८ व्या वार्षिक रब्बी कडधान्य बैठकीला शुक्रवारी (ता. १) प्रारंभ झाला.
नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेचे सहाय्यक महासंचालक डॉ. संजीव गुप्ता, कानपूर येथील भारतीय कडधान्य संशोधन संस्थेचे संचालक डॉ. जी. पी. दीक्षित, कानपूर येथील अखिल भारतीय रब्बी कडधान्य संशोधन प्रकल्पाचे प्रकल्प समन्वयक डॉ. शैलेश त्रिपाठी, संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी. एस. पाटील, वनस्पतिशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजू अमोलिक, कडधान्य सुधार प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार कुटे, मोरोक्को देशातील इकार्डा संस्थेचे उपमहासंचालक डॉ. मायकेल बूम, कुलसचिव डॉ. विठ्ठल शिर्के आदी उपस्थित होते.
डॉ. गुप्ता म्हणाले, ‘‘कडधान्याच्या उत्पादकतेमध्ये वाढ करण्यासाठी उच्च तापमानात टिकू शकणारे वाण विकसित करावे लागतील. तापमानात एक डिग्रीचीही वाढ झाल्यास प्रतिहेक्टरी १४ किलो उत्पादनात घट येऊ शकते. झिंक, सल्फर, मॉलीब्डेनम इ. सूक्ष्मअन्नद्रव्य कमतरता असणाऱ्या जमिनीत हरभरा पिकाचे उत्पादन घटू शकते. यातील संशोधनामध्ये कृत्रिम बुद्धीमत्ता, ड्रोनसारखे तंत्रज्ञान वापरून ऑटोमायझेशनचा वापर व जिनोमिक इडिटिंगचा वापर करावा लागेल.’’
डॉ. दीक्षित यांनी देशातील कडधान्य व तेलबिया पिकांच्या संशोधन व प्रगतीचा आढावा सादर केला. यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कडधान्य सुधार प्रकल्पाला उत्कृष्ट संशोधन केंद्राचा पुरस्कार तर आंध्र प्रदेशातील आरएआरएस, नंदयाल या केंद्रास हरभरा पिकाच्या संशोधनात उत्कृष्ट काम केल्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला.
बैठकीचा आज समारोप
या वार्षिक रब्बी कडधान्य बैठकीचा आज (ता. ३) समारोप होईल. कडधान्य पिकांवर संशोधन करणाऱ्या विविध राज्यांतील जवळपास १५० शास्त्रज्ञांसह विद्यापीठातील शास्त्रज्ञ, प्राध्यापक बैठकीत सहभागी झाले आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.