
शेगाव, जि. बुलडाणा ः जिल्ह्यात दाखल झालेल्या भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) पुढील प्रवास शनिवारी (ता.१९) सकाळी सुरू होईल. या दिवशी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi)यांची जयंती असल्याने भारत जोडो यात्रेत ९० टक्के महिलांचा सहभाग राहणार आहे. यादृष्टीने आयोजकांनी नियोजन केले आहे.
महिलांचे राजकारणातील प्रतिनिधित्व वाढवण्याचा निर्णय इंदिरा गांधी व राजीव गांधी घेतला. यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देशभर महिलांचे प्रतिनिधित्व वाढलेले आहे. या नारीशक्तीचे भव्य दर्शन शनिवारी भारत जोडो यात्रेत दिसेल, असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे प्रमुख जयराम रमेश यांनी स्पष्ट केले. येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
‘महाविकास आघाडीवर कुठलाही परिणाम नाही’
भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रातील जनतेने मोठे प्रतिसाद व प्रेम दिले. हे काही लोकांच्या पचनी पडलेले दिसत नाही. राहुल गांधी यांनी एका सभेत बिरसा मुंडा ब्रिटिशांसमोर झुकले नाहीत हे सांगताना त्यांची तुलना सावरकरांशी केली. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेची व काँग्रेसची सावरकरांबाबत वेगवेगळी मते आहेत.
त्याचा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही, असे जयराम रमेश म्हणाले. सावरकरांच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील काही पक्ष व संघटना नाहक वातावरण तापवत आहेत. सावरकरांच्या बाबतीत जे ऐतिहासिक सत्य आहे ते कसे नाकारता, असा सवाल उपस्थित केला. द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत सावरकर यांनी मांडला.
१९४२ च्या भारत छोडो, चले जावच्या चळवळीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विरोध केला होता. जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी हे बंगालच्या फाळणीचे कट्टर समर्थक होते व मुस्लीम लिगशी त्यांनी युती करून सरकारही स्थापन केले होते हे ऐतिहासिक सत्य आहे, असेही रमेश म्हणाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.