Agriculture Electricity सोलापूर : मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांकडे असलेल्या थकीत शेतीपंपाच्या (Agriculture Pump) वीजबिल वसुलीसाठी (Electricity Bill Recovery) महावितरणने गेल्या आठवड्यापासून वीज कनेक्शन तोडण्याची (Power Cut) मोहीम तीव्र केली असून, दीड हजार ट्रान्सफॉर्मरवरील शेतकऱ्यांची सात हजार ९०० कनेक्शन्स तोडली आहेत.
यामुळे शेतात उभी असलेली पिके जळू लागली आहेत, तर माणसांसह जनावरांनाही पिण्याच्या पाण्याची अडचण झाली आहे.
तोडलेली कनेक्शन्स लवकरात लवकर पुन्हा जोडावी, अन्यथा येत्या १४ फेब्रुवारीपासून महावितरणच्या मोहोळ येथील कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
सध्या गेल्या आठवड्यापासून उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे. विहिरीची पाणी पातळीही खोलवर गेली आहे. सध्या चारा टंचाईही जाणवू लागली आहे. साखर कारखान्यांच्या माध्यमातून मिळणारे हिरवे वाडेही बंद झाले आहेत.
वैरणीसाठी शेतकऱ्यांनी मका लागवड केली आहे, तीही पाण्याअभावी जळू लागली आहे. गहू कापणीच्या रंगात आला आहे, त्यालाही पाण्याची गरज आहे.
रात्री लागणाऱ्या वैरणीची कुट्टीही करता येईना. त्यामुळे शेतकऱ्यांना महावितरणने अडचणीत आणले आहे. वाड्या- वस्त्यांवरही अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. मोहोळ तालुक्यात एकूण तीन हजार ३६५ ट्रान्सफॉर्मर आहेत.
सर्वात जादा कनेक्शन्स पेनूर, बेगमपूर, नरखेड, पोखरापूर, कोळेगाव या परिसरातील तोडली आहेत.
दरम्यान, वीजबिल वसुली सुरू केल्यापासून १६ लाख रुपयांची वसुली झाली असल्याचेही महावितरणचे मोहोळ येथील सहायक अभियंता वनारसे यांनी सांगितले.
दरम्यान, अनेक शेतकरी वीजबिल भरू लागले आहेत. कोणी ऑनलाइन भरतो तर कोणी ऑफलाइन. कुरुल रस्त्यावरील महावितरणच्या कार्यालयासमोर सध्या एकच वीजबिल भरणा केंद्र आहे. त्या ठिकाणी गर्दी होताना दिसत आहे.
त्यासाठी प्रत्येक विद्युत उपकेंद्रावर वीजबिल भरून घेऊन शेतकऱ्यांना अधिकृत पावती देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ व खर्च वाचणार आहे.
सध्या आष्टी उपसा सिंचन योजनेच्या कालव्याला पाणी सुटले आहे, तो भरून चालला आहे, परंतु त्याच्याकडे बघण्यापलीकडे शेतकरी काहीही करू शकत नाहीत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.