
रत्नागिरी ः राज्यात मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत असताना रत्नागिरी जिल्ह्यात लम्पी स्कीनला (Lumpy Skin) अटकाव करण्यात पशुसंवर्धन विभागाला यश आले.
अधिकारी, कर्मचाऱ्यांचे संख्याबळ कमी असतानाही उत्कृष्ट नियोजनामुळे २ लाख ६५ हजार पशुंपैकी ३ हजार पशुंना लम्पी स्कीनची लागण झाली.
त्यातील ४०१ पशुंचा मृत्यू (Lumpy Death) झाला असून आतापर्यंत ७३ पशुपालकांना शासनाकडून १९ लाख ७६ हजार रुपये वितरित करण्यात आले आहेत.
चार महिन्यांपूर्वी लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव राज्यभरात सुरू झाला. या रोगाचा पहिला बाधित पशु खेड तालुक्यात (Khed Taluka) आढळला.
त्यानंतर हळूहळू जिल्ह्यातील पशुंमध्ये लम्पी स्कीन आजार पसरू लागला. याचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हाधिकारी एम. देवेंदरसिंग, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी आढावा बैठका घेऊन तत्काळ प्रतिबंधात्मक लसीकरणावर भर देण्याचा निर्णय घेतला.
तसेच परजिल्ह्यातून पशू आणण्यावर बंदी घातली. परिणामी बाधित पशू जिल्ह्यात येण्यावर निर्बंध आले. जिल्ह्यात २ लाख ६५ हजार पशुधन आहेत.
चार महिन्यांत २ लाख २७ हजार पशुंना लस देण्यात आली. आजारी असलेल्या पशुंना अन्य पशुंपासून वेगळे ठेवण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला. त्या पशुंची दिवसातून दोन वेळा तपासणी करण्याच्या सूचना पशुसंवर्धन विभागाकडून दिल्या गेल्या होत्या.
त्यादृष्टिने नियोजन करण्यात आले. वेळीच उपाययोजना केल्याने चार महिन्यांत ३ हजार पशुंनाच लागण झाली. त्यातील २ हजार पशु बरे झाले आहेत. ४०१ पशुंचा मृत्यू झाला असून उर्वरित पशुंवर उपचार सुरू आहेत. यामध्ये १८८ गायी, १५७ बैल व ५६ वासरांचा समावेश आहे.
१९ लाखांची मदत वितरित
मृत पशुंच्या पालकांना मदत जाहीर करण्यात आली. २०१ पशुपालकांचे प्रस्ताव पशुसंवर्धन विभागाला प्राप्त झाले असून ७३ पशुपालकांना १९ लाख ७६ हजारांची मदत वितरित केली आहे. २०० पशुपालकांचे परिपूर्ण प्रस्ताव बनविण्याचे काम सुरू आहे.
नियंत्रणासाठी अशी राबवली मोहीम
लम्पी स्कीन आजाराला अटकाव करण्यासाठी प्रशासनाने ‘माझा गोठा स्वच्छ गाठा’ अशी विशेष मोहीम हाती घेतली.
यामध्ये ग्रामस्थ, पशु विभाग आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील १८ हजार गोठे आणि परिसर स्वच्छ करण्यात आला.
जनवारांना वेळेत औषधोपचार, आजारी जनावरांना वेगळे ठेवणे, मुंबईतील पथकाची मदत, जनावरांच्या विक्रीचे बाजार बंद, वाहतुकीला अटकाव असे निर्णय तत्काळ घेतले गेले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.