
मुंबई : राज्यातील पौष्टिक तृणधान्य उत्पादन (Millet Production) क्षेत्रवाढीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे आणि त्या उत्पादनांना योग्य हमीभाव (MSP) मिळेल, यासाठी राज्य शासन आग्रही आहे.
त्यामुळे महाराष्ट्र मिलेट मिशनसाठी (Maharashtra Millet Mission) २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हे मिशन शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात महाराष्ट्र मिलेट मिशनच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कृषिमंत्री अब्दुल सत्तार, उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले प्रमुख उपस्थित होते.
या वेळी मंत्रालयात शेतकरी उत्पादक कंपन्यांनी तयार केलेल्या भरडधान्यांच्या उपपदार्थांची दालने उभारण्यात आली असून येथे विविध पदार्थांची विक्रीही केली जात आहे.
आज (ता. १) या प्रदर्शनाचा समारोप होणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते तृणधान्य पूजन आणि तृणधान्य पासून बनवलेला केक कापून या मिलेट मिशनचा प्रारंभ करण्यात आला.
या वेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, कुटकी ही पिके घेतली जातात.
या पिकांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील मान्यता मिळवून देण्यास यंदा संयुक्त राष्ट्रसंघातर्फे साजरे होणारे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष उपयुक्त ठरेल.
महाराष्ट्र मिलेट मिशनमुळे नवी पिढी जंकफूडकडून पारंपरिक तृणधान्याद्वारे बनविलेल्या पदार्थांकडे निश्चितपणे वळेल. शेतकऱ्यांच्या उत्पादनालाही चांगला भाव मिळेल.
स्मार्ट या प्रकल्पांतर्गत सोलापूर येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट, हैदराबादच्या सहकार्याने ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ची स्थापनाही करण्यात येणार आहे.
कृषिमंत्री सत्तार म्हणाले, ‘‘या वर्षात व्यापक अशी योजना यासाठी बनवली आहे. पौष्टिक तृणधान्य उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.’
या वेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते शेतकरी मासिक पौष्टिक तृणधान्य विशेषांक, महाराष्ट्र मिलेट मिशन पुस्तिका आणि महाराष्ट्र मिलेट मिशन पोस्टरचे प्रकाशन तसेच महाराष्ट्र मिलेट मिशन वेबसाइटचे अनावरण करण्यात आले.
प्रास्ताविक प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी केले. कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी आभार मानले. या वेळी आमदार भरत गोगावले, आशिष जयस्वाल, प्रकाश सुर्वे, अण्णा बनसोडे उपस्थित होते.
आजच्या या कार्यक्रमा वेळी प्रांगणात ज्वारी, बाजरी, नाचणी यासह विविध तृणधान्यापासून बनवलेल्या पदार्थांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. मंत्रालयातील कर्मचारी, आलेले नागरिकांनी या पदार्थांची खरेदी केली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.