Himachal Pradesh Rain : मुसळधार पाऊस आणि पुरामुळे हिमाचल प्रदेशात १७ जणांचा मृत्यू झाला आहे तसेच रस्ते, पॉवर ट्रान्सफॉर्मर, विद्युत उपकेंद्र आणि असंख्य पाणीपुरवठा योजनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सामान्य जनजीवन विस्कळित झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार ३,००० ते ४००० कोटी रुपयांपर्यंतचे नुकसान झाले आहे.
गेल्या दोन दिवसांत हिमचल प्रदेशात पावसाशी संबंधित घटनांमध्ये सुमारे १७ जणांचा मृत्यू झाला. चांदेरताल येथे आणि लाहौल आणि स्पितीमधील पागल आणि तेलगी नाल्यादरम्यान अडकलेल्या ४०० पर्यटक आणि स्थानिकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, हिमाचल प्रदेशात गेल्या ५० वर्षांत इतका व्यापक मुसळधार पाऊस झालेला नाही आणि या पावसाळ्यात आतापर्यंत राज्याचे सुमारे ३००० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, असे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी सोमवारी (ता. १०) सांगितले.
हिमाचल प्रदेशची राजधानी सिमला शहरावर गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे पुरवठा योजनांचे नुकसान झाले आणि जलस्रोतांमध्ये गाळ निर्माण झाला आहे.
दरम्यान, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी हिमाचल प्रदेशातील पूरस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. हिमाचल प्रदेशातील मुसळधार मॉन्सूनच्या पावसाच्या विनाशकारी परिणामाबद्दल चिंतित आहे.
राज्यातून येणारी दृश्ये अस्वस्थ करणारी आहेत. माझे विचार पीडित लोक आणि कुटुंबांसोबत आहेत. मी मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांना आमच्या पूर्ण समर्थनाची आणि मदतीची खात्री देतो. तामिळनाडू हिमाचल प्रदेशातील आमच्या बंधू-भगिनींसोबत एकजुटीने उभे आहे, असे स्टॅलिन यांनी म्हटले आहे. दिल्ली शहरातही मुसळधार पाऊस सुरूच असून पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक विस्कळित झाली आहे.
जम्मूत पुरातून चौघांची सुटका
जम्मू ः जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यामध्ये रावी नदीत मासेमारी करण्यासाठी गेलेल्या चौघा मच्छीमारांची सोमवारी (ता. १०) नदीला आलेल्या पुरातून सुटका करण्यात आल्याची माहिती स्थानिक प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. राज्य आपत्ती निवारण पथकाच्या जवानांनी या चौघांची सुटका केली. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या वतीने रविवारी (ता. ९) विविध घटनांत पुरात अडकलेल्या ५८ जणांची सुटका केली.
उत्तर प्रदेशात नद्यांच्या पाणीपातळीत वाढ
लखनौ ः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन राज्यातील पावसाच्या परिस्थिचा आढावा घेतला. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात झालेल्या मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेशातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, योगी आदित्यनाथांना संबंधित अधिकाऱ्यांना सावध राहण्याच्या सुचना दिल्या आहेत.
त्याचप्रमाणे राष्ट्रीय आपत्ती प्रतिससाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्यांना, राज्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास बचावकार्यासाठी तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच अतिवृष्टीचा आणि पूराचा फटका बसलेल्या भागात मदत पोहोचविण्यात अजिबात दिरंगाई होता कामा नये असेही त्यांनी अधिकाऱ्यांना बजावले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.