अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी मिळणार १३६०० रुपये

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सहा हजार ८०० रुपये आणि दोन हेक्टरपर्यंत मर्यादा होती. ती एक हेक्टरने वाढविण्याचा निर्णय विस्तारित मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत घेण्यात आला.
Heavy Rain
Heavy RainAgrowon

मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीपोटी हेक्टरी १३ हजार ६०० रुपये मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टर मर्यादेत मदत देण्यात येणार आहे.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सहा हजार ८०० रुपये आणि दोन हेक्टरपर्यंत मर्यादा होती. ती एक हेक्टरने वाढविण्याचा निर्णय विस्तारित मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत घेण्यात आला. गेल्या दोन महिन्यात राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

त्यामुळे विदर्भ, मराठवाडा आण पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातील अंदाजे १५ लाख हेक्टर शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली होती. मात्र, सरकारच्या पातळीवर चाचपणी सुरू होती. अखेर मंत्रिमंडळ विस्तार केल्यानंतर पहिल्याच बैठकीत शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला.

‘गांभीर्यपूर्वक जबाबदारी पार पाडा’

मंगळवारी मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर नवीन मंत्र्यांनी बुधवारी (ता. १०) मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थिती लावली. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनियुक्त मंत्र्यांचे स्वागत केले. या वेळी मुख्यमंत्र्यांनी ‘आपले मंत्रिमंडळ हे लोकांच्या हितासाठी आणि अगदी शेवटच्या घटकापर्यंत केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ पोचविण्यासाठी प्रयत्न करेल, असे सांगून मंत्र्यांनी आपापली जबाबदारी गांभीर्यपूर्वक पार पाडावी आणि महाराष्ट्राचा देशात नावलौकिक वाढवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

रत्नागिरीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यास मान्यता

रत्नागिरी येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि महाविद्यालयास संलग्नित जिल्हा सामान्य रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून ४३० रुग्णखाटांचे जिल्हा रुग्णालय स्थापन करण्यासही मान्यता देण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्याचा बराचसा भाग ग्रामीण आहे. त्यांना या रूग्णालयाचा लाभ होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com