शेती केवळ टिकवलीच नाही, तर आधुनिक केली

वडिलांच्या इच्छेखातर शेतीमध्ये उतरलेल्या सुधीर वसंतराव निगडे यांची मुलगी व मुलगा दोघांनीही कृषी शिक्षण निवडले. त्यातही मुलगी सुचिताने वडिलांना हरितगृह उभारणीसाठी आग्रह धरला. आणि संरक्षित पद्धतीने कार्नेशन फूलशेतीला (Carnation Flower Farming) सुरुवात झाली. आता संपूर्ण कुटुंबच शेतीमध्ये रमून गेले आहे.
Flower Farming
Flower FarmingAgrowon

पुणे जिल्ह्यातील गुळुंचे (ता. पुरंदर) येथे पाण्याची कमतरता कायमची. येथील वसंतराव निगडे यांची दोन्ही मुले उच्च शिक्षणानंतर नोकरीनिमित्त पुणे, मुंबई येथे स्थायिक झाली. त्यातील सुधीर एम. एस्सी (पॉलिमर) नंतर स्वतःच्या प्लॅस्टिक उद्योगामध्ये रमले होते. त्याच वेळी आपली दोन्ही मुले शेतीपासून (Agriculture) दुरावली, आपल्यानंतर शेती विकली जाईल, याची धास्ती वसंतरावांना सतत वाटे. त्यांनी ती मुलांपाशी बोलून दाखवली. मग सुधीर निगडे यांनी शेतीमध्ये लक्ष घालण्यास सुरुवात केली. डाळिंब बाग (Pomegranate) ९ वर्षे जोपासली. मात्र तेलकट डाग व अन्य रोगामुळे दर्जेदार उत्पादन (Pomegranate Production) घेण्यामध्ये अडचणी येऊ लागल्याने पर्यायी पिकाचा शोध सुरू केला. दरम्यान त्यांची मुलगी सुचिता ही बी. एस्सी (कृषी व्‍यवसाय व्यवस्थापन) अभ्यासक्रम करत होती. तिनेच आग्रह करून आधुनिक शेतीबाबत वडिलांचे मन वळवले.

कार्नेशन शेतीचा निर्णय

सुचिताला नोकरीमध्ये फारसा रस नाही. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होताच तिने वडिलांसह परिसरातील वाघापूर, मावळ येथील विविध पॉलीहाऊसला भेटी देत माहिती मिळवली. चर्चेतून कार्नेशनचे क्षेत्र गुलाब आणि जरबेराच्या तुलनेत कमी असून, चांगली मागणी असल्याचे समजले. मग सुचिताने पुणे, मुंबई, बंगलोर आणि हैदराबाद येथील फूल बाजारांना भेटी दिल्या. बाजारपेठांचे सर्वेक्षण व व्यापाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर एक एकरवर हरितगृह उभारणी व कार्नेशन लागवडीचा निर्णय घेण्यात आला. सुचिताने आपली आई मनिषा यांच्यासह कृषी विज्ञान केंद्रामध्ये आधुनिक फूलशेतीसंदर्भात प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणामुळे आईलाही फुलशेतीमध्ये रस निर्माण झाला असून, तिची पॉलीहाऊसच्या दैनंदिन व्यवस्थापनामध्ये मदत होत असल्याचे सुचिता सांगतात.

Flower Farming
आधुनिक फुलशेती संशोधन, निर्यात केंद्राची गरज

उभारणी व नियोजन ः

१) पॉलिहाऊसची उभारणी खडकाळ माळरानावर केली असून, वेल्हे (जि. पुणे) येथून सुमारे ४०० ब्रास लाल माती मागवून वापरण्यात आली. त्यासाठी ९ लाख रुपये खर्च आला.

२) पॉलिहाऊसच्या खते व पाणी यांच्या नियोजनासाठी स्वयंचलित यंत्रणा उभारणी आहे. त्यामुळे यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आल्याने कमी मजुरांमध्ये पॉलिहाऊस व्यवस्थापन केले जात आहे. सध्या केवळ दोन कुटुंबे (चार व्यक्ती) पॉलिहाऊसचे व्यवस्थापन पाहत आहेत.

३) कार्नेशन हे तापमानासाठी संवेदनशील पीक असल्याने तापमान नियंत्रण केले जाते. हवा खेळती राहण्यासाठी आतमध्ये फॅन लावण्यात आले आहे. तसेच आर्द्रता स्थिर ठेवण्यासाठी फॉगर वापरले जातात. पॉलिहाऊसच्या बाजूने मका आणि अन्य झाडांची लागवड केली आहे.

Flower Farming
Floriculture : शेतकरी नियोजन - फुलशेती

४) पॉलिहाऊसमधील सेंद्रिय कर्ब आणि उपयुक्त जिवाणूंचे प्रमाण वाढवण्यासाठी फिल्टर केलेल्या शेणस्लरीचा वापर ठिबकद्वारे केला जातो. यासाठी बेडवर दोन ऐवजी तीन ठिबक लॅटरल वापरल्या आहेत. ही अतिरिक्त लॅटरल बेडवरील तापमान नियंत्रणासाठीही उपयुक्त ठरते.

५) सामान्यतः एकरी ७० हजार कार्नेशन रोपे लावली जातात. मात्र अंतर व्यवस्थित ठेवताना संख्या वाढवण्यासाठी झिगझॅग पद्धतीने लागवड केली. परिणामी ९० हजार रोपांची लागवड केली आहे.

६) मागणीनुसार पांढरा, फिकट गुलाबी (लाइट पिंक), गडद गुलाबी (डार्क पिंक), लाल, पिवळा, केशरी अशा पाच रंगाच्या फुलांची लागवड केली. त्यातही पांढऱ्या व गुलाबी रंगाच्या फुलांना विशेष मागणी असून, अन्य रंगाच्या तुलनेमध्ये १० ते २० टक्क्‍यांनी जास्त मिळत असल्याचे निगडे यांनी सांगितले.

७) एकूण प्रकल्पासाठी ६६ लाख रु. चा खर्च झाला असून, त्यातील ५० लाख रु. बॅंकेकडून कर्ज घेतले. नॅशनल हॉर्टीकल्चर बोर्डाकडून

२८ लाख रुपये अनुदान उपलब्ध झाले. आजवर दीड वर्षामध्ये ८० टक्क्यांइतकी कर्जफेड करण्यातही यश आल्याने आत्मविश्वास दुणावला आहे.

कोरोनाचा झाला फायदा

पॉलिहाऊस उभारल्यानंतर कोरोना महामारीचे संकट आले. मात्र नुकतीच लागवड झालेली होती व अजून पूर्ण क्षमतेने उत्पादन सुरू झाले नव्हते. कोरोनामध्ये फुलशेतीला सर्वाधिक फटका बसल्याने अनेक शेतकऱ्यांनी फूल उत्पादनाकडे दुर्लक्ष केले. परिणामी लॉकडाऊन शिथिल होऊ लागल्यानंतर नेमकी कट फ्लॉवर आणि विशेषतः कार्नेशनच्या फुलांचा मोठा तुटवडा पुणे, मुंबई आणि हैदराबाद बाजारपेठेमध्ये जाणवत होता. नेमकी त्याच वेळी आमचे उत्पादन सुरू झाले. लोकांना भीतीने ग्रासलेले असताना या काळात आम्हाला सर्वाधिक २० रुपये दर मिळाला, असे सुधीर निगडे यांनी सांगितले.

खर्च आणि उत्पन्नाचा ताळेबंद

आतापर्यंत साडे सात लाख फुलांचे उत्पादन मिळाले असून, फुलांना वर्षभरात सरासरी ८ ते ९ रुपये प्रति फूल दर मिळाल्याचे निगडे सांगतात. सध्या रोज साडे तीन ते चार हजार फुलांची काढणी, प्रतवारी व पॅकींग केले जाते. एका फुलाचा उत्पादन खर्च साधारण अडीच ते तीन रुपये राहतो. पुढील एका वर्षात सरासरी १० लाख फुलांचे उत्पादन आणि विक्रीचे ध्येय ठेवले आहे.

ऋषभ वळला कृषी शिक्षणाकडे

पारंपारिक शेतीला आधुनिकतेकडे वळल्यामुळे आता मुलगा ऋषभही बी. टेक (ॲग्री इंजिनिअरिंग) करत आहे. माझ्या वडिलांमुळे शेतीकडे वळलो. आता आमची पुढची पिढी भविष्यात संरक्षित आणि आधुनिक शेती पुढे नेतील, अशा आशाही सुधीर निगडे व्यक्त करतात.

प्रेरणा आणि प्रोत्साहन

- कृषी शिक्षणानंतर स्वतःचा शेती व्यवसाय आधुनिक पद्धतीने करणाऱ्या सुचिताचा २०२१-२२ मध्ये ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप’ ने सन्मान करण्यात आला.

- सुचिताने परिसरातील १०० महिलांच्या सहभागातून पुरंदर कृषी कन्या फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली आहे. त्यात विशेषतः फुलशेतीसह अंजीर फळबाग असणाऱ्या महिलांचा समावेश आहे.

संपर्क -

सुधीर वसंतराव निगडे, ७४४७३१७००७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com