Silk Production : महाराष्ट्र- तेलंगण राज्यसीमेजवळ आदमपूर (ता. बिलोली) गाव आहे. येथील युवा शेतकरी विनोद रमेशराव पेंटे यांची सात एकर शेती आहे. त्यांनी डेअरी विषयात पदविका प्राप्त केलीआहे. वीस वर्षांपासून शेती कसण्याबरोबर ते जनावरे व्यवस्थापनाविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात.
त्यातून पंचवीस खेड्यांमधील पशुपालक त्यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळेच आपले उत्पन्नस्रोत वाढविण्यासाठी विनोद यांना रेशीम शेतीचा नवा पर्याय मिळाला. या क्षेत्रातील यशस्वी, अयशस्वी अशा शेतकऱ्यांचे अनुभव त्यांनी अभ्यासले. त्यातून २०१७ मध्ये एक एकर तुती लागवडीपासून रेशीम शेतीला सुरुवात केली.
रेशीम शेती तंत्रातील सुधारणा
कोणत्याही गोष्टीचा सविस्तर अभ्यास करणे, त्यातील शास्त्र, तंत्रज्ञान जाणून घेणे व आपल्या स्थानिक व भौगोलिक बाबी लक्षात घेऊन तंत्रात सुधारणा करून वापर करणे ही विनोद यांची खासियत आहे. त्यांची शेती नदीजवळ असल्याने पावसाळ्यातील तीन महिने पाणी शेतात भरपूर पाणी साचते. काही वेळा ते कमरेपर्यंत असते. यामुळे खरीप हातातून निघून जाई. रेशीम शेती करताना तुतीच्या रोपांचे देखील तसेच नुकसान होण्याचा धोका होता.
अशावेळी विनोद यांनी शक्कल लढवली. ते म्हणाले, की तुतीची लागवड शेतकरी ६ बाय ३, ४ बाय ४ फूट वा जोडओळ पद्धतीने करतात. मी तुतीचे संरक्षण करण्यासाठी लागवड पद्धतीत बदल करण्याचे ठरविले. त्यानुसार दहा बाय आठ फूट अंतरावर लागवड केली. त्याची व्यवस्थित छाटणी केली. त्याला फांद्या, उपफांद्या आल्या. छत्रीसारखे त्याला वळण दिले. झाडे उंच झाली. पालाही भरपूर येऊ लागला. उंच झाड तयार झाल्याने त्याचे खोड टणक झाले. त्यामुळे पाण्यात रोपे सडण्याचा धोका व नुकसान जवळपास थांबले.
शेड रचनेत बदल
विनोद सांगतात, की उन्हाळ्यात आमच्या भागात उन्हाचा पारा ४५ अंशांपर्यंत जातो. अशावेळी कोष उत्पादन घेता येत नाही. त्यावर उपाय शोधताना शेडच्या रचनेत बदल करायचे ठरवले. रेशीम विभागाने ५० फूट लांब, २२ फूट रुंद व १३ फूट उंच अशी शेडची रचना सांगितली आहे. मात्र तापमान नियंत्रणासाठी लांबी ११६ फूट, रुंदी २८ फूट व उंची १६ फूट असे सुधारित पद्धतीचे शेड बांधले.
त्यावर सिमेंटचे पत्रे टाकले. वायुविजन करणारे फॅनही लावले. या सुधारणांमुळे शेडमध्ये तापमानाचे नियंत्रण झाले. हवा खेळू लागली. गारवा जाणवू लागला. उन्हाळ्यातही बॅच घेणे शक्य झाले. शेडसमोर पाला साठवणुकीसाठी दहा बाय आठ फूट आकाराची खोलीही तयार केली.
चाकाच्या ट्रॉलीद्वारे पाला
विनोद यांनी रेशीम कीटकांना पाला देण्याच्या पद्धतीतही तंत्र निर्मिती केली. एरवी हा पाला देण्यासाठी मजुरांची आवश्यकता असते. सध्या त्यांची टंचाई आहे. अशावेळी पाच रॅक पद्धतीच्या शेडमध्ये रेल्वे ट्रॅकप्रमाणे चालणारी ट्रॉली तयार केली आहे. त्याचा सांगाडा लोखंडी असून त्याला चार चाके आहेत. पहिल्या व दुसऱ्या रॅकमध्ये उभे राहून पाला देता येतो.
तर तिसऱ्या रॅकमध्ये ट्रॉलीवर बसून पाला देता येतो. यात दोन व्यक्ती ट्रॉलीवर बसू शकतात. सुमारे दोन क्विंटल पाला ठेवण्यासाठी पुरेशी जागाही तेथे केली आहे. तिसऱ्या रॅकमध्ये उभारून चौथ्या व पाचव्या रॅकमध्ये पाला देता येतो. या यंत्रणेमुळे पाला देण्यासाठीचे श्रम, मजुरी व वेळ यात बचत झाली आहे.
रेशीम कोषांचे उत्पादन
प्रयोग, तंत्रनिर्मिती व एकूणच व्यवस्थापनातून विनोद दर्जेदार रेशीम कोष निर्मिती करू लागले आहेत. त्यांच्या या व्यवस्थापनातील ठळक बाबी अशा.
वर्षभरात पाच ते सहा बॅचेस. बायव्होल्टाइन कीटकाचा वापर.
प्रति बॅच ४०० ते ५०० अंडीपुंजांची. प्रति १०० अंडीपुंजांपासून ९० किलोपर्यंत कोष उत्पादन.
एका बॅचमध्ये पाचशे अंडीपुंजांपासून पाच क्विंटल ६५ किलोपर्यंत घेतले उत्पादन.
प्रति बॅच सुमारे तीस हजार रुपयांपर्यंत खर्च.
रामनगर (कर्नाटक) येथे कोषांची विक्री. प्रति किलो ५०० रुपयांपासून ते ८०० रुपयांपर्यंत दर.
शेतकऱ्यांचे नेटवर्क
विनोद यांनी सोशल मीडिया व अन्य स्रोतांमधून हजारो शेतकऱ्यांचे नेटवर्क तयार केले आहे. आपल्या रेशीम शेतीचे व्हिडिओ ते शेतकऱ्यांना शेअर करीत असतात. नागपूर येथील रेशीम संचालनालयाचे उपसंचालक महेंद्र ढवळे, तत्कालीन रेशीम विकास अधिकारी नृसिंहबावगे, प्रक्षेत्र सहायक अभय कुलकर्णी, प्रगतिशील शेतकरी हणमंत शिंदे आदींनी अलीकडेच त्यांच्या रेशीम शेतीला भेट देत कौतुक केले आहे.
वेळ वाचविण्यासाठी विमान प्रवास
कोषांच्या विक्रीसाठी विनोद यांना रामनगर- कर्नाटक येथे रेल्वेने जावे लागते. जाण्यासाठी चोवीस तासांचा व तिकडून येण्यासाठी देखील तेवढाच कालावधी लागतो. मात्र किमान परत येण्याचा चोवीस तासाचा वेळ वाचावा, त्याचा विनियोग शेतीकामांत करावा असे विनोद यांनी ठरवले आहे. त्यासाठी अलीकडेच त्यांनी बंगळूर ते नांदेड असा विमान प्रवास केला. त्यासाठी केवळ एक तास लागला. यापुढेही विमान प्रवासच करायचे असे त्यांनी ठरवले आहे. त्याचे भाडेशुल्क पाच हजार रुपयांपर्यंत आहे. पण वेळेपुढे पैशांची किंमत कमी असल्याची त्यांची धारणा आहे.
पुरस्काराने सन्मानित
सन २०२३ मध्ये रेशीम संचालनालयाकडून विनोद यांना रेशीम रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सन २०१८-१९ मध्ये ९०० अंडीपुंजांपासून ८६८ किलो उत्पादन घेऊन चार लाख ४३ हजार ९१७ रुपयांच्या कोषांची विक्री त्यांनी केली होती. पुरस्कारामध्ये या कामाची दखल घेण्यात आली होती.
विनोद पेंटे, ९५११८४८४७९, ९४२०८४८२१२
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.