Water Management : नाशिकमधील वाद-वराडी गावच्या जल व्यवस्थापनातून मिटला पाणीप्रश्‍न

Village Water Management Update : नाशिक जिल्ह्यात अवर्षणप्रवण चांदवड तालुक्यातील वाद-वराडी गावांनी उत्कृष्ट जल व्यवस्थापन केले. यात साडेआठ लाख रुपये खर्चून पावणेदोन कोटी लिटर साठवणक्षमतेचा अस्तरीकरणयुक्त तलाव उभारला. दुष्काळमुक्ती साधली. टॅंकरमुक्ती केली.
Water Management
Water ManagementAgrowon
Published on
Updated on

Nashik News : नाशिक जिल्ह्यात चांदवड तालुक्याच्या पूर्वेकडे ४० किलोमीटरवर चांदवड व मालेगाव या दोन तालुक्यांच्या शिवेवर वाद व वराडी ही छोटी गावे वसली आहेत. परिसरात नैसर्गिक जलस्रोत नाही, त्यातच गावासाठी असलेली नाग्यासाक्या पाणीपुरवठा योजना बंद असल्याने भीषण पाणीटंचाईचा सामना ग्रामस्थांना करावा लागायचा.

जानेवारीपासूनच विहिरी आटायला सुरुवात होई. जी काही पाणलोट क्षेत्र विकास कामे झाली त्यातून जानेवारीअखेर काहीसा दिलासा मिळायचा. पण फेब्रुवारीनंतर जूनअखेर दुष्काळ पाचवीला पुजलेला. या परिस्थितीवर मात करण्याचे जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी ठरविले.

प्रशिक्षण, संवाद व सभा यांच्या माध्यमातून गाव पाणीटंचाईमुक्त करण्याबाबत जनजागृती करण्यास सुरुवात केली. केंद्र शासनाचे जलजीवन मिशन व १५ व्या आर्थिक आयोगाच्या निधीतून प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

त्या दृष्टीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) रवींद्र परदेशी यांनी मार्गदर्शन केले. “आपला गाव आपला विकास” ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश पाटील यांनी पुढाकार घेतला. गावविकास आराखडा तयार करताना मार्गदर्शन केले.

या सर्व बाबींमधून मार्गदर्शन लाभल्याने वाद वराडीच्या ग्रामस्थांना आपले गाव पिण्याच्या पाण्याबाबत स्वयंपूर्ण व्हावे असे वाटू लागले.

Water Management
Dhule Water Shortage : धुळे जिल्ह्यात जलसाठा घटू लागला

थेट नळाला आले पाणी

कायमस्वरूपी ‘दुष्काळी गाव’ ही ओळख पुसण्यासाठी ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीने कंबर कसली, पाणी साठवण तळ्याचे काम कृती आराखड्यात समाविष्ट केले. जलसंधारण विभागाचे शाखा अभियंता जितेंद्र पाटील यांनी त्यासाठी वेळोवेळी तांत्रिक सहकार्य केले. त्यातूनच साडेआठ लाख रुपये खर्चून पाणी साठवण तलाव उभारण्यात आला.

त्यात पावणेदोन कोटी लिटर पाणीसाठा झाला आहे. उन्हाळ्यातही मुबलक पाणी उपलब्ध होऊ लागले आहे. तलावाला जाळीचे कुंपण केले आहे. प्लॅस्टिक कागद अस्तरीकरण केले आहे. गावातील उंच भागात तलाव असल्याने ‘ग्रॅव्हिटी’ पद्धतीने सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेद्वारे थेट घरातील नळाद्वारे ग्रामस्थांना पाणी मिळू लागले आहे.

शेतीत रुजताहेत प्रयोग

उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी वाद वराडीतील शेतकरी उन्हाळी कांदा, शेवगा व काही प्रमाणात होणाऱ्या भाजीपाला पिकांसाठी ठिबक व तुषार सिंचनाचा वापर करू लागले आहेत. गावात बाजरी, भुईमूग, मका, खरीप लाल कांदा ही पिके प्रामुख्याने घेतली जातात.

पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने फलोत्पादन क्षेत्र तुलनेने कमी आहे. शेतकरी गटशेतीची कास धरू लागला आहे. त्यातूनच वाद येथे शंभूराजे सेंद्रिय शेतकरी गटाची स्थापना झाली आहे. यात ३० शेतकरी असून, त्यांनी बाजारपेठ अभ्यासून शेवग्यातून पीक बदल साधला आहे. काहींनी पूरक म्हणून कुक्कुटपालन व्यवसाय करार पद्धतीने सुरू केला आहे.

पाण्याचा ताळेबंद

-वाद व वराडी दोन्ही गावांची मिळून ‘ग्रुप ग्रामपंचायत’. ग्रामपंचायत कार्यालय वाद गावात.

-चार हातपंप, दोन सार्वजनिक विहिरी आहेत.

- एकूण लोकसंख्या १,६१२ (२०११ च्या जनगणनेनुसार)

-दोन्ही गावांची दैनंदिन पाण्याची गरज- ८८,६६० लिटर

-टंचाईसदृश कालावधी- एप्रिल ते जून. या तीन महिन्यांसाठी दोन्ही गावांची पाण्याची गरज

एक कोटी कोटी ५९ लाख ५८ हजार ८०० लिटर

-साठववणुकीतून उपलब्ध झालेले पाणी- १ कोटी ६३ लाख ८० हजार लिटर

-पाच टक्के मृत साठा शिल्लक ठेवता तीन महिने पुरेसे पाणी उपलब्ध

(यंदा बाष्पीभवन अधिक झाल्याने जूनच्या सुरुवातीला टँकर सुरू)

-खोदकाम, प्लॅस्टिक पेपर अंथरणे, कुंपण, अन्य पाणीपुरवठा जोडणी असा एकूण खर्च

- ८ लाख ५० हजार रु.

वाद वराडी- विकास दृष्टिक्षेपात :

-संरक्षित पाणीसाठ्यासाठी ४० हून अधिक शेततळ्यांची निर्मिती

-गावाच्या हरितसंपन्नतेसाठी परिसरात वृक्ष लागवड

-८० टक्के शेतकऱ्यांकडे घरगुती पशुपालन

-बायोगॅसचा वापर करण्याकडे कल

-प्रयोगशीलतेमुळे कांदा व मका उत्पादनात गावाची ओळख

जलव्यवस्थापनामुळे वाचले लाखो रुपये :

गावाला दिवसाला सात टँकर पाण्याची गरज होती. प्रति टँकर दोन हजार असा दररोज १४ हजार रुपये खर्च होता. यानुसार दरवर्षी तीन महिन्यांसाठी १२ लाख ६० हजार रुपये खर्च असायचा. मात्र गेल्या दोन वर्षांत गावाने २५ लाख २० हजार रुपयांची बचत केली आहे.

पुढील पाच वर्षांत हीच बचत ६३ लाखांपर्यंत पोहोचणार आहे. तलावातील प्लॅस्टिक कागदाची वयोमर्यादा १० वर्षे गृहित धरली आहे. एकूण ताळेबंद पाहात दहा वर्षांत शासनाच्या सुमारे एक कोटींवर रकमेची बचत होणार आहे.

Water Management
Water Management : पाणीवापर सोसायट्या बळकट करणार
पाण्याची गरज व महत्त्व ओळखून ग्रामस्थांनी कामांमध्ये सहभाग घेतला. आता शेती सिंचन शाश्‍वत होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ‘मिशन भगीरथ’ प्रकल्प हाती घेतला आहे. नदी, नाले, ओहोळ यांतील गाळ उपसा करून पाणीसाठा वाढविण्यात येत आहे. गाव पाणीदार करण्याचा संकल्प सर्वांनी मिळून केला आहे.
प्रवीण मनोहर आहेर, सरपंच, ९४२३५७०७६८
शेतीच्या सुधारित पद्धती अभ्यासून व बाजारपेठेचा अंदाज घेऊन कमी पाण्यात येणारी आमच्या भागासाठी नवी पिके घेत आहोत. त्यातून उत्पन्न वाढविणे व शेतकऱ्यांचा सामूहिक विकास करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
रामदास शिंदे, अध्यक्ष, शंभूराजे सेंद्रिय शेतकरी गट, ८३२९०९४३५७
नैसर्गिक स्रोतांचा वापर करून ग्रामविकास करण्याकडे आमचा कल आहे. त्यातून ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावणे व त्यांच्या मुख्य समस्या सोडविण्यावर भर दिला आहे.
मल्लिकार्जुन डांगरे, ग्रामसेवक, ९४२३०११७०१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com