Jambhul Baag : जुन्नरचे सेवानिवृत्त शिक्षक विष्णू कुटे यांचे चार एकरांतील बहाडोली जांभूळवन

Jambhul Juice : सेवानिवृत्त शिक्षक विष्णू मारुती कुटे यांनी विकत घेतलेल्या डोंगराळ जमिनीपैकी चार एकरांत जांभूळवन विकसित केले आहे. सुमारे नऊ वर्षांपूर्वी लावलेली ही बहाडोली जांभूळ बाग भरभरून उत्पन्न देऊ लागली आहे. प्रतवारी, बॉक्स पॅकिंगमधील ताज्या जांभूळ विक्रीसह ज्यूस निर्मितीतूनही गुरुजींनी आर्थिक स्रोत वाढवायला सुरुवात केली आहे.
Jambhul Baag
Jambhul BaagAgrowon

Pune Success Story : सध्या जुन्नर येथे वास्तव्यास असलेले विष्णू मारुती कुटे (गुरुजी) जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. गिरवली (ता. आंबेगाव) व परिसरातील गावांमध्ये सेवा केल्यानंतर ते २०१० मध्ये सेवानिवृत्त झाले.

त्यांच्या पत्नी शालिनीदेखील शिक्षकच होत्या. त्या २०१५ मध्ये सेवानिवृत्त झाल्या. सेवानिवृत्तीनंतर आता दोघेही आपल्या शेतीत रमले आहेत.

जांभूळ बागेचे नियोजन

नोकरीत असतानाच गुरुजींनी आठ एकर डोंगराळ जमीन २०१२ मध्ये खरेदी केली होती. तेथे फळबाग लागवडीचे त्यांचे नियोजन होते. हवामान, उत्पादन खर्च, देखभाल या सर्व बाबतीत तुलनेने कमी खर्चिक, डोंगरी वातावरणाला पोषक आणि शालेय सुट्ट्यांमध्ये हंगाम सुरू होणारे पीक म्हणून जांभूळ पीक गुरुजींच्या पसंतीस आले, उतरले.

मुलगा ज्ञानेशसह सासवड, सावरगाव (ता.जुन्नर) येथील राजेंद्र तोडकरी, पाबळ (ता. शिरूर) येथील मच्छिंद्र झोडगे आदींकडील जांभूळ बागा त्यांनी पाहिल्या. त्या मार्गदर्शनातून सुरुवातीला शंभर झाडांच्या लागवडीचा निर्णय घेतला. डोंगरावर पाण्याची सोय करण्यासाठी शेतापासून तीन किलोमीटरवरील विहिरीवरून पाइपलाइन केली.

Jambhul Baag
Jambhul Farming : जांभूळ शेतीतून समृद्धीकडे वाटचाल

बागेचा विकास

प्रत्येकी चार एकरांचे दोन टप्पे करीत दहा वर्षांत आठ एकर क्षेत्र टप्प्प्याटप्‍प्याने विकसित केले. पहिल्या टप्प्प्यात पालघर जिल्ह्यातून बहाडोली जांभूळ वाणाची शंभर रोपे आणून २०१२-१३ मध्ये ३० बाय ३० फूट अंतरावर लागवड केली. पुढील वर्षी आणखी शंभर झाडे लावली.

पहिल्या लागवडीनंतर चार वर्षांनी ७० झाडे त्याच वर्गातील पण थोडी वेगळी असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे थोडी निराशा आली. पण हिंमत न हारता बहाडोलीचेच कलम करून ती झाडे वाढविली. आता त्याला फळे लगडू लागली असल्याचे समाधान मिळाले आहे.

बागेचे व्यवस्थापन

सध्या चार एकरांत मिळून दोनशे झाडे आहेत. जुले ते नोव्हेंबर हा व्यवस्थापनातील बहुतांशी काळ विश्रांतीचा (रेस्ट पीरियड) असतो. पुढील हंगामासाठी झाडे डेरेदार होतील अशा प्रकारे सप्टेंबरच्या सुमारास छाटणी केली जाते. जांभळे सहज हाताला येतील अशा प्रकारे झाडांची उंची १५ ते २० फूट ठेवली जाते.

ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये प्रत्येक झाडाला शेणखत दिले जाते. डिसेंबरच्या सुमारास मोहोर येण्यास सुरुवात होते. मेमध्ये फळ हंगाम सुरू होऊन जूनअखेर संपतो. काढणीवेळी काही वेळा स्टूलचा वापर होतो. या पद्धतीत फळांचे नुकसान कमी होऊन दर्जा कायम राहतो.

यंदा तीन टप्प्यांत हंगाम

यंदा हवामान बदलांचा फटका जांभूळबागेला बसल्याचा अनुभव कुटे गुरुजींना आला. ऑक्टोबर- नोव्हेंबरपासून अवकाळी पाऊस, थंडीचा कमी कालावधी व नंतर एप्रिल- मे मध्ये पुन्हा सततचा अवकाळी पाऊस यामुळे डिसेंबर, फेब्रुवारी आणि मार्च या तीन टप्प्यांत मोहर विभागला.

डिसेंबरमधील मोहोराचे उत्पादन १० मेच्या सुमारास सुरू झाले. फेब्रुवारीच्या मोहराचे उत्पादन १५ जूनच्या दरम्यान तर मार्चमधील मोहराचे उत्पादन ३० जूनच्या दरम्यान सुरू होईल असा अंदाज आहे.

उत्पादन व सुरुवातीची विक्री

लागवडीनंतर खऱ्या अर्थाने व्यावसायिक उत्पादन सात वर्षांनी मिळण्यास सुरुवात झाली. गुरुजींचा मुलगा ज्ञानेश जुन्नर येथे नोंदणी कार्यालयात नोकरीस आहे. तो वडिलांना विक्रीत मदत करतो.

त्यांनी मंचर, नारायणगाव, जुन्नर या स्थानिक बाजारपेठेत पाटीतून जांभळे विकण्याचे प्रयत्न केले. मात्र व्यापारी दर पाडून मागू लागले. ही अवहेलना होत असल्याचे अनुभव आल्यानंतर मार्ग बदलण्याचे ठरविले.

Jambhul Baag
Jamun Season : सिंधुदुर्गात जांभूळ हंगाम तेजीत

प्रतवारी, बॉक्स पॅकिंगमधून विक्री

वाशी बाजार समितीमधील व्यापारी व काही बागायतदारांसोबत चर्चा केली. त्यातून कुटे फार्म जांभूळ या ब्रॅण्ड व लोगोद्वारे एक किलोचे आकर्षक बॉक्स बनवले. प्रतवारी व एक किलो बॉक्स असलेला १८ किलोचा मोठा बॉक्स असे जांभळाचे मूल्यवर्धन केले.

वाशी बाजारपेठेत त्यास चांगला उठाव व दर मिळू लागला. हंगामाच्या सुरुवातीला किलोला ३०० रुपये, नंतर २५० व अखेरच्या टप्प्यात ५० ते ७० रुपयांपर्यंत दर मिळतात. प्रति झाड ३०- ४० किलोपासून ६० किलोपर्यंत फळे मिळाली आहेत. यंदाच्या हंगामात मात्र फळगळ झाली. खर्च वजा जाता काही लाख रुपयांचे उत्पन्न ही बाग देते असे कुटे गुरुजी सांगतात.

जांभळापासून ज्यूस

जांभळाचे दर घटले की कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव (ता. जुन्नर) येथून जांभळापासून ज्यूसनिर्मिती करवून घेण्यात येते. तेथेच बॉटल पॅकिंग होते. मागील वर्षी ३०० बॉटल्सची निर्मिती केली. त्यातून काही हजार रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळाले. यंदा एक हजार बॉटल्स विक्रीचे उद्दिष्ट आहे. साडेसातशे मिलि वजनाच्या बॉटलची किंमत दोनशे रुपये असून, ग्राहक घरी येऊन घेऊन जातात. जांभळा व्यतिरिक्त

विविध आंब्यांची १२५ झाडे आहेत. यात ७० हापूस, तर उर्वरितमध्ये केसर, राजापुरी, नीलम, रत्ना या वाणांच्या झाडांचा समावेश आहे. चिकू, पेरू, लिंबू, चेरी, फणस, नारळ, अंजीर, शेवगा, सुरण, सुपारी, रामफळ, ॲपलबेर, ड्रॅगन फ्रूट, तमालपत्र, काळी मिरी अशीही काही प्रमाणात विविधता आहे.

संपर्क - विष्णू कुटे, ९९७०१४०१८०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com