Diversity of Animals : खामगावच्या बाजारात जातिवंत जनावरांची विविधता

Khamgaon Animal Market : बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील दर गुरुवारी भरणारा जनावरांचा बाजार सर्वदूर प्रसिद्ध आहे. जातिवंत म्हशी, बैल तसेच जातींची विविधता येथे पाहण्यास मिळते.
Animal
AnimalAgrowon
Published on
Updated on

Animal Market : बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही पश्‍चिम विदर्भातील प्रमुख बाजार समित्यांपैकी एक आहे. दररोज हजारो क्विंटल धान्याची येथे उलाढाल होते. या बाजार समितीतर्फे दर गुरुवारी भरविला जाणारा जनावरांचा बाजारही प्रसिद्ध आहे. सन १९७०-७१ मध्ये त्यास प्रारंभ झाल्याचे सांगण्यात येते.

तेव्हापासून आजवर या बाजाराने शेतकऱ्यांना अधिकाधिक पसंतीची जातिवंत जनावरे उपलब्ध करून दिली आहेत. अकोला मार्गावरील विलासराव देशमुख कृषी संकुल परिसरात हा बाजार भरतो.

बाजार समितीचे सभापती सुभाष पेसोडे असून, प्रभारी सचिव म्हणून गिरीश सुरेशराव सातव यांच्याकडे जबाबदारी आहे. पिण्याचे पाणी, पाण्याचा हौद, खाद्यांचे स्‍टॉल्‍स, शिदोरी गृह अशा सुविधा आहेत. जमुना येथे उपबाजार असून, त्या ठिकाणी शेळीमेंढींचा स्वतंत्र बाजार भरतो.
गांडूळ खत निर्मितीचा प्रकल्पही येथे कार्यान्वित केला आहे.

...असा आहे जनावरांचा बाजार

कोरोना काळात जनावरांचा बाजार काही दिवस बंद होता. गेल्या वर्षात लम्पी स्कीन रोगाच्या प्रादुर्भावामुळेही शासनाच्या निर्देशानुसार काही दिवसांसाठी बाजार भरवणे थांबले होते. आता सर्व निर्बंध मुक्त झाल्याने नियमितपणे हा बाजार दर गुरुवारी भरतो.

संपूर्ण दिवसभर बाजार चालतो. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश येथूनही व्यापारी येतात. मध्यरात्रीपासून जनावरे येथे आणण्यास सुरुवात होते. आज बैलजोड्यांचा वापर कमी होतो असे म्हटले जाते. मात्र खामगाव बाजारात येणाऱ्या बैलजोड्यांची संख्या व असलेली मागणी पाहिली तर समाधानकारक परिस्थिती दिसते.

Animal
Animal Market : जातिवंत पहाडी बैलांसाठी चला चांदूर बाजारला

जनावरांची विविधता

बाजारात मुऱ्हा जातीच्या म्हशींची खरेदी-विक्री अधिक होते. हरियाना किंवा उत्तरेकडील राज्यांतून येथे ती आणली जाते. वजन पाचशे किलोपेक्षा जास्त राहते. एका वेतात अडीच ते तीन हजार लिटरपर्यंत दूध मिळत असल्याने दुग्धोत्पादन तिला अधिक पसंती देतात. किमान ८० हजारांपासून ते दीड लाखांपर्यंत दर राहतो.

गुजरातहून जाफराबादी म्हैसही येते. दिवसाला १४ लिटरपर्यंत दूध देते. तिची शिंगे जाड असून माथा मोठा असतो. गायींमध्ये गीर व साहिवाल या देशी जातींना मागणी असते. शेळ्यांमध्ये बेरारी, उस्मानाबादी, जमनापरी आदींची विविधता असते.

पेरणीपूर्वी दीड महिन्यातील बाजार बैलांच्या उलाढालीचे राहतात. स्थानिक देशी गोवंशाचे बैल विक्रीस आणले जातात. खरेदी-विक्री करताना बैलजोडी फिरवून शिंगे, शेपटी, दात, वय पाहिले जाते. चालताना बैलांचे पाय एकमेकांना लागतात काय हे पाहण्यावर कटाक्ष असतो.

Animal
Animal Selection : जातिवंत जनावरांच्या निवडीचे निकष

मागणी, विक्री, उलाढाल

प्रति म्हशीला ४० हजारांपासून ते सव्वा लाखापर्यंत, तर बैलजोडीला ३० ते ४० हजारांपासून दीड लाखापर्यंत दर मिळतो. तीन वर्षांचा आढावा घ्यायचा, तर २०२०-२१ मध्ये बाजारात ३८०० बैलांची
आवक व सहा कोटी ६० लाखांची उलाढाल झाली.

सन २०२१-२२ मध्ये ही आवक ६४८८ बैल, तर वार्षिक उलाढाल १६ कोटी २२ लाखांवर पोहोचली. सन २०२२-२३ मध्ये जनावरांची संख्या आठ हजारांच्या आसपास पोहोचली. बैलांचा सरासरी दर २७ हजार ५०० रुपये होता. तर २२ कोटी २५ लाखांची उलाढाल झाली.

म्हशींच्या बाबत प्रातिनिधिक सांगायचे, तर २०२२-२३ मध्ये ७११६ म्हशींची विक्री, सरासरी दर ५४ हजार ९९९ रुपये, तर उलाढाल सुमारे ३९ कोटी १३ लाखांची झाली. प्रति शेकडा बाजार शुल्क ७५ पैसे, देखरेख शुल्क १० पैसे, तर साक्षांकन शुल्क प्रति दाखला
एक रुपया आकारण्यात येतो.

संपर्क : गिरीश सातव, ९४२१४९५०२८
(प्रभारी सचिव)

पूर्वी गाय, बैल, शेळी-मेंढी असा एकत्रित बाजार भरायचा. आता स्वतंत्र बाजार तयार केले आहेत. शेतकरी, स्थानिकसह परराज्यांतील व्यापाऱ्यांनाही बाजार समितीचे सहकार्य राहते.सर्वांच्या सूचनांनुसार सातत्याने सुधारणा करण्यास आमचे प्राधान्य आहे.
सुभाष पेसोडे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, खामगाव

म्हैस खरेदीबाबत तज्ज्ञांचा सल्ला

-शक्यतो नुकतीच व्यालेली तसेच सकाळचे व संध्याकाळचे दूध उत्पादन पाहून खात्री करून घ्यावी.
-काही व्यापारी म्हशीचे दूध राखून कास मोठी दाखवून विक्री करतात. त्याबद्दल जागरूकता हवी.
-ज्या पशुपालकाकडे प्रजनन, दूध उत्पादन आदी निगडित सर्व ‘रेकॉर्ड’ आहेत, अशांकडून खरेदी करणे उत्तम.
-खरेदीपूर्वी रक्त नमुन्याद्वारे सांसर्गिक गर्भपात रोगनिदानाची चाचणी करून घ्यावी.
-ज्या प्रदेशातील मालकाकडून खरेदी करणार तेथील खाद्य, चारा व संगोपन याबद्दल माहिती जाणून घ्यावी.


-म्हैस शक्यतो दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेतातील असावी. त्वचा मऊ चमकदार, डोळे सतेज व पाणीदार असावेत. नाकपुडीवरील भाग ओलसर असावा. पाठीचा कणा सरळ असावा.
-कास आकाराने मोठी, सड लांब समान व फुगीर असावेत. पोटाकडून कासेकडे येणारी रक्तवाहिनी टवटवीत, फुगलेली व मोठी असावी. कासेजवळ अनेक फाटे असावेत.
-पुढील दोन पायांतील अंतर जास्त असावे. यामुळे छाती विस्तारण्यास वाव असतो. कमरेवरील हाडे अधिक दूर असावीत, यामुळे पोटाच्या विस्तारास अधिक वाव मिळतो.
-शेपटीजवळील हाडे व कास यामधील अंतर अधिक असावे.

डॉ. महेशकुमार इंगवले, ९४०५३७२१४२
(सहायक प्राध्यापक, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com