Rural Business Development: जालना जिल्ह्यातील मठ पिंपळगाव (ता अंबड ) येथील शर्मिला व शिवाजीराव जिगे दांपत्याने आपल्या १४ एकर शेतीला प्रक्रिया उद्योगाची महत्त्वाची जोड दिली आहे. घरच्या बागेतील लिंबाच्या लोणच्यासह आंबा, आवळा, मिरची आदींपासून बनवलेल्या अनुज ब्रॅंडच्या लोणच्यांना कायमचे ग्राहक तयार झाले आहेत. महिला बचत गटाच्या माध्यमातूनही पापड, कुरड्या, दिवाळीचा फराळ, डाळनिर्मिती अशा विविघतेतून जिगे यांचा प्रक्रिया उद्योग विस्तारला आहे. शेती व घरचे अर्थकारण भक्कम झाले आहे. .जालना जिल्ह्यातील मठ पिंपळगाव (ता अंबड) येथील शर्मिला व शिवाजीराव या जिगे दांपत्याची सुमारे १४ एकर शेती आहे. पूर्वी एकत्रित कुटुंब पद्धतीच्या शेतात दहा हजारांपर्यंत झाडांची लिंबू बाग होती. विभक्त झाल्यानंतरही जिगे दांपत्याने पाच एकरांत लिंबाचे उत्पादन सुरूच ठेवले. अन्य क्षेत्रात ऊस, भाजीपाला, झेंडू, खरीप व रब्बची हंगामी पिके अशी त्यांची शेती पद्धती आहे. लिंबू बागेत भाजीपाला पिकांचे आंतरपीक ते घेतात. काही वर्षांपूर्वी जिगे दांपत्याने शेळीपालनाचा उद्योगही केला. तीन शेळ्यांपासून सुमारे २०० पर्यंत संख्या वाढवली. मात्र तांत्रिक कारणांमुळे हा व्यवसाय बंद करावा लागला..प्रक्रिया उद्योगाची धरली वाटपूर्वी शिवाजीराव विविध ठिकाणच्या बाजारपेठांचा आढावा घेऊन लिंबांची विक्रीच करायचे. परंतु अनेक वेळा दरांमध्ये मोठी घसरण होई. हाती काहीच उत्पन्न लागायचे नाही. अशावेळी लिंबाच्या मूल्यवर्धनासाठी काही करता येईल का याचा विचार जिगे दांपत्य करायचे. त्यातूनच लोणचे निर्मितीचा विचार पुढे आला. या विचारांना प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रसंग लवकरच आला. सन २००२ मध्ये दर पडले त्या वेळी दहा किलो लिंबांवर प्रक्रिया करून त्याचे लोणचे तयार केले. जालना व परिसरात त्याची विक्री करण्याचा प्रयत्न केला. प्रक्रिया उद्योगाकडे वळण्याची हीच पहिली पायरी ठरली..Sugarcane Farmer Success Story: ‘एआय’च्या बळावर ऊस शेतीत नवा शतकवीर!.प्रशिक्षणातून प्रक्रियेचे मिळवले कौशल्यघरगुती पद्धतीने लोणचे तयार करून त्याला बाजारपेठ देण्याचा प्रयत्न दोन-तीन वर्षे सातत्याने सुरू होता. दरम्यान शर्मिला यांचा संपर्क जालना- खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राशी आला. त्यातून दहा दिवसांचे फळ प्रक्रिया उत्पादन व मार्केटिंग या विषयाचे प्रशिक्षण त्यांनी घेतले. केवळ एकाच प्रकारच्या लोणच्यावर किंवा उत्पादनावर अवलंबून न राहाता प्रकारांमध्ये विविधता कशी आणता येतील याचेही धडे प्रशिक्षणात मिळाले. त्यातून उद्योजक होण्याचा आत्मविश्वास आला..त्याआधी साध्या पॅकिंगमधून विकले जाणारे लोणचे आता व्यावसायिक पॅकिंगमधून, लेबलिंग करून अनुज ब्रँड्सने विकले जाऊ लागले. या सर्व प्रयत्नांना, वाटचालीला जवळपास दहा वर्षांचा कालावधी जावा लागला. अलीकडील पाच वर्षांत प्रक्रिया उद्योगाला चांगलीच गती मिळाल्याचे शर्मिला सांगतात..प्रक्रिया उद्योग स्थिरावलासुरुवात लिंबू लोणच्यापासून करणाऱ्या शर्मिला आज आंब्याचे दोन प्रकारचे, आवळा, मिरची मिक्स अशा एकूण पाच प्रकारची लोणची तयार करतात. लिंबाची सुमारे दीड हजार झाडे असल्याने हा कच्चा माल घरून उपलब्ध होतो. बाकीचा कच्चा शेतीमाल भागातील शेतकऱ्यांकडून खरेदी केला जातो. लिंबू वर्षभरातील हंगामात सातत्याने उपलब्ध होत असल्याने टप्प्याटप्प्याने दहा-दहा क्विंटल किंवा मागणीनुसार लोणचे तयार करण्याची धोरण अवलंबिले आहे. उत्पादनात थोडी थोडी वाढ करत यंदा ५० क्विंटलपर्यंत आंब्याचे लोणचे तयार केले असून, त्यापैकी सुमारे २० क्विंटलची विक्री आतापर्यंत झाली आहे..हॉटेल व तूपनिर्मितीची जोडजालना-अंबड रोड लगत असलेल्या आपल्या शेताच्या सान्निध्यात जिगे दांपत्याने चहा-नाश्त्याचे छोटेसे हॉटेल सुरू केले आहे. या रूपाने आपल्या लोणची उत्पादनांना देखील त्यांनी बाजारपेठ देण्याचा प्रयत्न केला आहे. चहासाठी लागणाऱ्या दुधाची दूध उत्पादकांकडून खरेदी होते. म्हशीच्या या दुधापासून तूप तयार करून प्रति किलो एक हजार रुपये दराने विक्री होते. आजवर जोडलेले लोणच्याचे ग्राहक तुपाचीही मागणी करतात. अशा रीतीने उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यावर दांपत्याने भर दिला आहे. सर्व लोणची विक्रीतून वर्षाला दहा ते बारा लाखांची उलाढाल होते. तीनशेहून अधिक ग्राहक या दांपत्याने जोडले आहेत. होणाऱ्या उलाढालीतून २५ टक्के निव्वळ नफा पदरात पडत असल्याचे शर्मिला सांगतात. शेती व प्रक्रिया अशा दोन्ही आघाड्यांवर शिवाजीराव व शर्मिला राबतात. उद्योगाच्या माध्यमातून दहा महिलांना आठ महिने रोजगारही त्यांनी दिला आहे..Farmer Success Story: एकेकाळचे ट्रकचालक झाले प्रगतिशील शेतकरी.बचत गटाच्या माध्यमातून बाजारपेठशर्मिला उमेद अंतर्गत भगिनी निवेदिता गटाच्या अध्यक्षा आहेत. या गटात दहा सदस्य आहेत. सहा वर्षांपासून शर्मिला व महिला सदस्यांनी मिळून प्रक्रिया उद्योगात आणखी पदार्थांची भर घातली आहे. डाळ मिल घेऊन हंगामात शेतकऱ्यांना तूर, हरभरा, मूग, उडीद आदींच्या डाळी तयार करून देण्यात येतात. हे काम करत असतानाच पापड उद्योगात असलेली संधी दिसली. त्यातूनच तांदूळ, नाचणी, उडीद, मूग यांचे बीट, पालक, टोमॅटो यांचा स्वाद असलेले पापड तयार करण्यास सुरुवात केली आहे..साहित्य दिल्यास त्यानुसार शंभर रुपये प्रति किलो दराने पापड देखील तयार करून देण्यात येतात. कुरडईदेखील तयार करण्यास सुरुवात केली आहे. हंगामा दररोज दोन हजार ते तीन हजार रुपयांच्या पापडांची विक्री होते. डाळ उद्योगामुळे पापड विक्रीला व पापड उद्योगामुळे डाळ विक्रीला चालना मिळाली. सुमारे २०० ते २५० च्या संख्येने पक्के ग्राहक तयार करण्यास या महिला गटाला यश आले आहे..संस्थांचा आधारउत्पादनांच्या प्रचार- प्रसारासाठी उमेद व महिला आर्थिक विकास महामंडळ यांचा मोठा आधार मिळाला आहे. त्यांच्या माध्यमातून दरवर्षी पुणे येथील भीमथडीची जत्रा व मॉल, मुंबई येथील महालक्ष्मी सरस प्रदर्शन अशा राज्यातील विविध ठिकाणच्या प्रदर्शनांमध्ये उत्पादने सादर करण्याची संधी मिळाली आहे. येथील ग्राहकच पुढे जोडण्याचे व जपण्याचे काम शर्मिला यांनी केले आहे..दिवाळी फराळालाही मोठी पसंतीशर्मिला दिवाळी काळात फराळ निर्मितीही करतात. भाजणी व पालक स्वादाच्या चकल्या, पाच प्रकारचे शंकरपाळे, करंजी, दोन प्रकारच्या शेव अशी विविधता त्यांनी ठेवली आहे. घरगुती ग्राहकांसोबतच मिठाई व्यावसायिकांकडूनही त्यांच्या पदार्थांना मागणी असते. दिवाळी काळात ८० हजार ते एक लाखांपर्यंत उलाढाल होते.शर्मिला जिगे ९४२३७४६८२४.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.