Agriculture Technology : दुर्गम दगडधानोऱ्यात कृषी तंत्रज्ञानाचा जागर

Agrowon Diwali Ank : यवतमाळ जिल्हा मुख्यालयापासून तब्बल १३५ किलोमीटर दुर्गम डोंगरात वसलेले दगडधानोरा हे गाव. गावची लोकसंख्या १२०० च्या घरात. सर्वांचे उदरनिर्वाहाचे एकमेव साधन म्हणजे शेती.
Agriculture Technology
Agriculture TechnologyAgrowon
Published on
Updated on

पांडुरंग देशमुख

जगाच्या नकाशावर आत्महत्याग्रस्त अशी आमच्या यवतमाळ जिल्ह्याची ओळख. पारंपरिक पिकांवरील अवलंबित्व, सिंचनाचा अभाव, शेतीतील माहिती आणि तंत्रज्ञान बांधापर्यंत न पोहोचणे अशी अनेक कारणे त्यासाठी देता येतील. फवारणीमधून विषबाधांच्या वाढलेल्या संख्येतही यवतमाळने घेतलेली आघाडी हे साधी साधी माहिती आणि तंत्रज्ञानही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचीच खूण.

असे सारे काळोखलेले वातावरण असताना माझ्या जीवनात झळाळत्या सूर्यप्रकाशासारखा ‘ॲग्रोवन’ आला. माझे सारे जीवन उजळून गेले. माझ्यासारख्या अनेक सामान्य शेतकऱ्यांच्या आयुष्यात तंत्रज्ञानाचा जागर करणाऱ्या ॲग्रोवनचे नाव माझ्या शिवाराला दिले. - हे शेत म्हणजे ‘ॲग्रोवन फार्म’!

यवतमाळ जिल्हा मुख्यालयापासून तब्बल १३५ किलोमीटर दुर्गम डोंगरात वसलेले दगडधानोरा हे गाव. विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर विदर्भाच्या हद्दीतील हे शेवटचेच गाव. गावची लोकसंख्या १२०० च्या घरात. सर्वांचे उदरनिर्वाहाचे एकमेव साधन म्हणजे शेती. इसापूर प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे पाणी शिवाराला मिळते. त्यामुळे व्यावसायिक पिके फेरपालटी घेतल्यास गावात बऱ्यापैकी संपन्नता आहे.

मात्र दुर्गम भाग असल्याने कृषी विभागाचे लोक अपेक्षेप्रमाणे इथे पोहोचत नाहीत. परिणामी, शेती विषयाची माहिती, नवे तंत्रज्ञान आमच्यापर्यंत पोहोचतच नव्हते. परंपरेप्रमाणे, एकमेकांचे पाहत शेती करण्याकडे कल असल्याने अपेक्षित उत्पादकता कधी साधतच नव्हती. आमच्यापैकी अनेकांना शेतीचे एक शास्त्र असते, हेच माहिती नव्हते. मग त्यात काही बदल आणि सुधारणा दूरच राहिल्या. उत्पादन वाढले पाहिजे, ही कळकळ प्रत्येकाचीच असली, तरी त्या दिशेने कसे जायचे याचा काही उपायच सापडत नव्हता.

Agriculture Technology
‘त्या’ विमाधारकांना अखेर मिळाले परतावे

एकत्रित कुटुंबाचा आदर्श

आजही आमचे सर्व घर एकत्र राहते. या एकत्र कुटुंबामध्ये माझी आई कौशल्या, भाऊ पुंजाजी, त्यांची पत्नी सीमा, त्यांची मुले वैष्णव आणि योगिता, तर मी पांडुरंग, पत्नी संगीता, आमची मुले कुणाल, किरण, ऋतुजा अशा दहा जणांचा समावेश आहे. कुटुंबाची जेमतेम तीन एकर शेती. माझे वडील गोविंदराव देशमुख हे कपाशीचे पीक घेत. मुळात कमी असलेल्या आणि पारंपरिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या या शेतातून फारसे काही हाती येत नसे.

मग इतर शेतकऱ्यांची शेती बटई करून प्रचंड कष्ट करावे लागत. त्यातून कसेबसे पोट भागले जाई. हातात पैसाच शिल्लक राहत नसे. इच्छा असूनही आम्हाला शिक्षणही पूर्ण करता आले नाही. कसेबसे बारावीपर्यंत शिकून आम्हीही शेतीत वडिलांच्या बरोबरीने राबू लागलो. घरातील प्रत्येक माणूस काम करत असल्याने थोडा फार पैसा हाती येऊ लागला. आज आमचे एकत्रित कुटुंबातील बहुतांश सर्व माणसे शेतात राबतात.

‘ॲग्रोवन’शी जुळले नाते

साधारण २००४-०५ मध्ये आम्ही दोघे भाऊ शेतीतील छोट्या-मोठ्या जबाबदाऱ्या घेऊ लागलो होतो. सगळा परंपरेने चालू असलेला कारभार आम्ही पुढे रेटत होते. वडिलांप्रमाणेच सुरुवातीला कपाशी पीक घ्यायचो. नवे काहीतरी करावे वाटत असले, तरी जवळपास तसे सांगणारे कोणी नव्हते. तारुण्याची उर्मी आणि जिद्द असली, तरी वाटाड्या नसल्यामुळे मार्गच दिसत नव्हता.

त्यातच त्या काळी आजच्या इतकी फोनसारखी संपर्काची साधने नव्हती. कृषी विभाग, विद्यापीठाशी संपर्क वगैरे तर बात दूरच. प्रत्येक वेळी प्रवास करत तालुक्याचे कृषी विभागाचे ऑफिस किंवा विद्यापीठ गाठायचे. एकतर वाहतुकीसाठी एसटी, खासगी गाड्या वेळेवर नव्हत्या. बरे त्यासाठी दरवेळी खर्च करण्याइतकी ऐपतही नव्हती.

Agriculture Technology
Laxman Kirloskar: सत्य नाकारण्याची सराईत बेईमानी अंगी आलीच!

त्या वेळी आम्हाला गावासाठी एक कृषी सहायक असतो आणि तो कधी येतो, हेही माहीत नसायचे. नवे काही करायची धडाडी असली, तरी अडथळ्यांच्या शर्यतीमुळे जेरीला येत होतो. त्याच वेळी २००५ मध्ये ‘ॲग्रोवन’ सुरू झाला. एकदा आमच्या गावालगत शेंबाळपिंपरी या मोठ्या गावात तो एका ठिकाणी वाचायला मिळाला. त्यात शेतीची आणि पिकाची भरपूर माहिती असल्याने तिथेच बसून वाचून काढला. हे काहीतरी वेगळे आहे,

आपल्या शेतकऱ्यांच्या फार कामाचे आहे, एवढे नक्की कळले. हा पेपर रोज येत असल्याचे कळाल्यावर तर हरखून गेलो. पण आमच्या गावात तो पेपर येत नव्हता. शेंबाळपिंपरीमध्ये ॲग्रोवनचा अंक मिळे. मग तो मिळविण्यासाठी धडपड सुरू झाली. कारण शेतीसंबंधीची तांत्रिक माहिती लगेच वापरता येत होती. सोबतच राज्य, देश आणि जागतिक पातळीवरचे तंत्रज्ञान, बाजारपेठ, प्रयोगशील शेतकऱ्यांचे प्रयोग या बाबी वाचनाचा लळाच लागला.

तरी नियमित अंक मिळत नसल्याने महिनेवारी बुकिंग केले. त्यातील तज्ज्ञांच्या लेखांच्या वाचनातून शेतीची समज वाढत चालली. हळूहळू सुधारणा करू लागलो. त्यामुळे ॲग्रोवन म्हणजे आमच्या बांधावर पोहोचणारा एक चांगला मार्गदर्शकच ठरला. आमच्यासाठी ॲग्रोवन हेच पहिले विद्यापीठ आणि कृषी विभाग ठरला.

(सविस्तर वाचा अॅग्रोवनच्या दिवाळी अंकात)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com