Silk Farming : रेशीम उद्योगाने साधली कुटुंबाची आर्थिक प्रगती

पुणे जिल्ह्यातील काळूस येथील खैरे कुटुंबाची साडेतीन एकर शेती आहे. मात्र केवळ पिकांवर अवलंबून राहून आर्थिक सक्षमता मिळवणे अवघड जात होते.
Slik Farming
Slik FarmingAgrowon

पुणे जिल्ह्यातील काळूस (Kalus) येथील खैरे कुटुंबाची साडेतीन एकर शेती आहे. मात्र केवळ पिकांवर अवलंबून राहून आर्थिक सक्षमता मिळवणे अवघड जात होते. त्यामुळे या कुटुंबाने रेशीम शेती (Silk Farming) सुरू केली. वर्षाला सुमारे सात बॅचेस, घरच्या सर्व सदस्यांचा हातभार व जागेवरच ‘मार्केट’ मिळवणे याद्वारे या व्यवसायातून खैरे यांनी आर्थिक प्रगती साधली आहे.

Slik Farming
शेतकरी नियोजन ः रेशीम शेती

पुणे जिल्ह्यात राजगुरुनगर तालुक्यात काळूस गाव आहे. येथील अनेक शेतकऱ्यांनी आर्थिक सक्षमतेसाठी पारंपरिक पिकांना जोड म्हणून रेशीम व्यवसायाचा पर्याय उभा केला आहे. गावातील ३० ते ४० शेतकरी सध्या या व्यवसायाकडे वळले आहेत. खैरे कुटुंब त्यापैकीच एक आहे. त्यांची सुमारे साडेतीन एकर शेती आहे. कुटुंबातील युवा पिढीचे सुमीत यांच्याकडे सध्या व्यवसायाची जबाबदारी आहे. पूर्वी हे कुटुंब कांदा, बटाटा, ऊस अशी पिके घ्यायचे. आता रेशीम शेती व तुती लागवडीखाली त्यातील अधिक क्षेत्र आणले आहे.

Slik Farming
शेतकरी नियोजन : रेशीम शेती

व्यवसायातील प्रयत्न

गावातील रेशीम शेतीची प्रेरणा खैरे यांना मिळाली हे खरे. पण त्यात अधिक प्रगती करण्यासाठी
अनुभवी, जुन्या- जाणत्या रेशीम उत्पादकांकडे त्यांनी प्रत्यक्ष भेटी दिल्या. अर्थकारण समजून घेतले. तीन ते चार महिने काही जणांकडे कामाचा अनुभव घेतला. त्यातून आत्मविश्‍वास वाढला.
जिल्हा रेशीम उद्योग केंद्राच्या माध्यमातून व्यवसायाची उभारणी सुरू केली. सन २०१७ मध्ये तुतीची एक एकरांवर लागवड केली. शेताजवळच ६० बाय २५ फूट आकाराचे शेड उभारले. यासाठी सुमारे तीन ते साडेतीन लाख रुपयांचा खर्च आला.

Slik Farming
Cashew Processing: शून्यातून उभारलेला काजू प्रक्रिया उद्योग पोहोचला एक कोटीपर्यंत...

व्यवस्थापन व उत्पादन

सुमारे सहा महिन्यांनंतर तुतीचा पाला उपलब्ध होऊ लागला. प्रति २०० अंडीपुजांची पहिली बॅच घेतली.
गावालगत वाकी बुद्रुक येथे विजय गारगोटे यांनी चार वर्षांपासून चॉकी सेंटर उभारले आहे. त्यांना सात वर्षांपासून रेशीम शेतीचा अनुभव आहे. त्यांच्याकडून चॉकी घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे प्रति बॅचचा अवधी सुमारे दहा ते १२ दिवसांनी कमी झाला. वर्षाला बॅचेसची संख्या वाढवता आली.
वर्षाला खैरे कुटुंब सुमारे सात व काही प्रसंगी आठपर्यंत बॅचेस घेते. अळ्यांना संसर्गापासून रोखण्यासाठी शेडमध्ये स्वच्छता महत्त्वाची असते. अळ्यांना सर्वांत मोठा धोका उंदीर, मुंगूस आणि मुंग्यांपासूनही असतो. त्यामुळे प्रत्येक बॅच संपल्यानंतर शेडचे निर्जंतुकीकरण केले जाते. अळ्यांच्या प्रत्येक अवस्थेत पुरेसे ‘स्पेसिंग’ ठेवावे लागते. उत्पादनवाढीत ही बाब महत्त्वाची असल्याचे खैरे आवर्जून सांगतात.
कोष तयार होण्यास सुरुवात झाल्यानंतर अळ्यांवर चंद्रिका जाळी टाकण्यात येते. त्यानंतर जाळीवरील कोष काढणी सुरू होते. त्यासाठी महिला मजुरांची मदत घेतली जाते. त्यासाठी प्रतिदिन १५० ते २०० रुपये मजुरी देण्यात येते. जवळच भीमा व भामा नद्यांचा संगम झाला आहे. त्यामुळे पाण्याची कमतरता भासत नाही.

किफायतशीर अर्थकारण

प्रति बॅच १५० ते २०० अंडीपुंजांची असते. प्रति १०० अंडीपुंजांपासून ८० ते ९० किलो रेशीम कोष उत्पादन मिळते. गेल्या तीन वर्षांचा विचार केल्यास सरासरी ४०० ते ५०० रुपयांपर्यंत प्रति किलो दर मिळतो. कमाल दर ७५० रुपयांपर्यंतही मिळाला आहे. प्रति बॅच
खर्च १५ हजार रुपयांपर्यंत येतो. एकूण बॅचेसचा विचार केल्यास वर्षाला अडीच लाख रुपये किंवा त्याहून अधिक उत्पन्न मिळते.
घरातील सर्व सदस्य कार्यरत असल्याने श्रम व पैशांचीही बचत करता आली आहे. पारंपरिक पिकांपेक्षा या व्यवसायातून शाश्‍वत व समाधानकारक उत्पन्न मिळते आहे. त्यामुळेच चारचाकी घेता आली. ट्रॅक्टर घेतला. मिळालेल्या आत्मविश्‍वासाच्या जोरावर यंदा आणखी एक एकरावर तुती लागवड करण्याचे नियोजन आहे. यामुळे आगामी काळात अधिक अंडीपुजांच्या बॅचसाठी पुरेसा पाला उपलब्ध होणार असून, उत्पन्नातही वाढ होईल.

आरोग्याबाबत जागरूकता

अलीकडील काळात आरोग्य टिकवणे सर्वात महत्त्वाचे झाले आहे. त्यावर मोठा खर्च होत असतो. त्या दृष्टीने जागरूक राहून खैरे यांनी कुटुंबातील सर्व सदस्यांचा आरोग्य विमा काढला आहे. त्यासाठी ठरावीक रक्कम निश्‍चित कालावधीसाठी वेगळी काढली जाते. दरवर्षी हा खर्च होत असला तरी कुटुंबात अचानक उद्‌भावणाऱ्या आजारांची चिंता राहत नाही. चांगले उपचार मिळू शकतात. रेशीम शेतीतील उत्पन्नाचा मोठा आधार या आर्थिक तरतुदीसाठी झाला आहे.

कोषांची जागेवरच विक्री

सुरुवातीला पुण्यातील काही व्यापारी रेशीम कोषांची खरेदी करून ते बंगळूरला पाठवीत होते. आता बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने खरेदी सुविधा सुरू केली. जालना बाजारपेठेचा पर्याय आहे. त्याचबरोबर सोलापूर, बंगळूर येथील व्यापारीही कोष खरेदीसाठी येतात. अलीकडील काळात व्यापारी जागेवर येऊन खरेदी करू लागल्याने खैरे यांची चांगली सोय झाली आहे.

ज्ञानवृद्धी

पुणे जिल्हा रेशीम कार्यालयाच्या विभागीय रेशीम सहाय्यक संचालक डॉ. कविता देशपांडे, संजय फुले, प्रमोद शिरसाट यांचा मार्गदर्शन मिळते. कृषी- आत्मा विभाग, कृषी विज्ञान केंद्र आदींच्या माध्यमातून आयोजित केलेल्या प्रशिक्षण व अभ्यास दौऱ्यांमध्ये खैरे यांचा नेहमी सहभाग असतो. गेल्या वर्षी बारामती केव्हीके येथे प्रदर्शनातही ते सहभागी झाले होते. ‘ॲग्रोवन’चे ते नियमित वाचक आहेत.
ॲग्रोवनमध्ये वेळोवेळी प्रसिद्ध होणारे रेशीम लेख, यशकथा त्यांना उपयुक्त ठरतात. अंकातील विविध विषयांची स्वतंत्र कात्रणे काढून त्याचा संग्रह केला आहे.

सुमीत खैरे ८८०५५५७६३१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com