सूर्यकांत नेटके
Womens Growth : आढळगाव (ता. श्रीगोंदा, जि. नगर) येथील शेतकरी महिलांनी एकत्र येऊन पाच वर्षांपूर्वी सुरभी महिला बचत गटाची स्थापना केली. यास महिला आर्थिक विकास महामंडळाने पाठबळ दिले. महिलांनी शेतीसाठी काम सुरू केले, यातून रोजगार मिळाला. शेती समृद्ध झाली. आढळगावात एकोणीस महिला बचत गट असल्याने येथील महिला संघटनासाठी चांगला फायदा होत आहे.
नगर जिल्ह्यातील आढळगाव (ता. श्रीगोंदा) येथील शेतकरी महिलांनी बचत गटातून प्रगती साधली आहे. शेतकरी महिलांनी एकत्र आल्या. यातून पाच वर्षांपूर्वी सुवर्णा संतोष बोळगे यांच्या अध्यक्षतेखाली रूपाली सागर वाकडे, वैशाली प्रशांत ससाणे, संगीता राजेश वाकडे, सुनीता गणेश शिंदे, संगीता संजय बोळगे, कमल प्रभाकर शिंदे, रूपाली शरद शिंदे, सविता रामदास शिंदे, अलका बाळासाहेब शिंदे, चंद्रकला देविदास शिंदे, सोनाली संदीप वाकडे यांनी एकत्र येऊन महिला आर्थिक विकास महामंडळाच्या मदतीने ‘सुरभी महिला बचत गट’ स्थापन केला. या महिला बचत गटाला बचतीसोबत बॅंककडून कर्ज मिळण्यासह अन्य बाबींसाठी महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक संजय गर्जे, क्रांती ज्योत लोकसंचलीत साधन केंद्राच्या तालुका व्यवस्थापिका कांता सुपेकर, उपजीविका सहयोगिनी वंदना भागवत, उपजीविका सल्लागार शुभांगी सूर्यवंशी यांनी मदत केली. केवळ बचत गटाच्या जोरावर येथील महिलांनी प्रगती साधली आहे.
तयार झाल्या रोजगाराच्या संधी ः
सुरभी महिला बचत गटातील महिलांनी सुरवातीला शंभर रुपये आणि आता दोनशे रुपयांची दर महा बचत सुरू केली. पहिल्या सहा महिन्यांतील बचतीतून अंतर्गत देवाणघेवाण केली. बॅंकेकडून मिळालेल्या कर्जाच्या मदतीने महिलांना सक्षम होण्याला मदत झाली. अध्यक्षा सुवर्णा बोळगे यांनी पीठ गिरणी, मिरची कांडप व्यवसाय सुरू केला. हळद पावडर, धने पावडर आणि अन्य बाबींसाठी जिल्हा नियोजनमधून दोन महिला बचत गटांना पल्वरायझर यंत्र मिळाले. रूपाली वाकडे यांनी पार्लर सुरू केले. संगीता वाकडे यांनी किराणा दुकान, शांताबाई वाकडे यांनी कपड्याचे दुकान, रूपाली शिंदे यांनी पीठ गिरणी सुरू केली. वैशाली ससाणे यांनी शिवणकाम सुरू केले. संगीता बोळगे, कमल शिंदे, सविता शिंदे, अलका शिंदे, चंद्रकला शिंदे यांनी सेंद्रिय शेतीला प्राधान्य दिले आहे. या महिला सेंद्रिय खत तयार करतात. भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. सेंद्रिय शेतीमुळे जमिनीतील कर्ब वाढ झाली. रासायनिक खतांचा खर्च कमी होऊन उत्पादनात वाढ झाल्याचा महिलांचा अनुभव आहे.
सेंद्रिय खताची विक्री ः
श्रीगोंदा तालुक्यात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून महिला बचत गटातील शेतकरी महिलांना शेती सुधारणेसाठी ‘जीआयझेड’ कंपनीकडून सेंद्रिय खताचे मोफत वाटप करण्यात आले होते. यास महिला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आढळगावातील सुरभी महिला बचत गटाच्या माध्यमातून सेंद्रिय खत विक्री केली जाते. लोकसंचलित साधन केंद्राने ययाती शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केलेली असून, यामध्ये तालुक्यातील बचत गटाच्या ५०० शेतकरी महिला कंपनीच्या सभासद आहेत. सभासद महिला शेतकऱ्यांना १५० रुपये आणि जे शेअर होल्डर नाहीत, परंतु माविम गटात ज्या महिला शेतकरी आहेत, त्यांना २०० रुपये सवलतीच्या दराने सेंद्रिय खत विक्री होते.
बॅंकेची मिळाली साथ ः
आढळगावातील सुरभी महिला गटाने चार वर्षांत चांगल्या प्रकारे आर्थिक व्यवहार केले. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या मदतीने गट सुरू केल्यानंतर वर्षभरात दीड लाखांचे कर्ज मिळाले. त्याची वेळेत परतफेड केल्यानंतर अडीच लाख आणि चार लाख असे दोन वेळा आणि आता पाच लाखांचे कर्ज बॅंकेने दिले. कर्ज घेतल्यापासून एकही हप्ता गटाकडून टळला नाही. वेळेत कर्जफेड केल्याने या गटाला बॅंकेकडून प्राधान्य दिले जाते. वेळेत कर्जफेड
केल्यामुळे बॅंकेत पत तयार झाली. केंद्र सरकारकडून कर्जाचा व्याज परतावा मिळाला आहे.
साहित्य विक्रीसाठी स्टॉल ः
महिला गटातील सदस्यांना रोजगार मिळावा यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून महिला आर्थिक विकास महामंडळाने साहित्य विक्रीचे स्टॉल दिले आहेत. आढळगावात सुरभी आणि गौरी महिला बचत गटाला प्रत्येकी एक स्टॉल मिळाला आहे. सुरभी गटाच्या स्टॉलची जबाबदारी रूपाली वाकडे यांच्याकडे आहे.
अवजारे बॅंकेचा फायदा ः
समाजकल्याण विभागाकडून श्रीसाई महिला गटाला शेती अवजारे बॅंक मिळाली आहे. या बॅंकेतून महिलांना आर्थिक फायदा आणि शेती विकासाला मदत होते. या बॅंकेमध्ये पेरणी यंत्र, फवारणी यंत्र, टोकण यंत्र, नांगर, पीठ गिरणी, शिडी, कडबाकुट्टी यंत्र, शेतीसाठी लागणारे लहान-मोठी यंत्रे,अवजारे उपलब्ध आहेत. गटातील महिलांना अल्प दरात व अन्य शेतकऱ्यांना गरजेनुसार अवजारे भाडेतत्त्वावर दिली जातात. त्यातून गटाला आर्थिक लाभ होतो. तसेच मजूर टंचाईवर मात करता येत असल्याचा महिलांचा अनुभव आहे.
महिला बचत गटांचे गाव
श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव आणि त्याअंतर्गत येणाऱ्या डोकेवाडी, गव्हाणेवाडी परिसरात हंगामी शेती, फळबागा आहेत. या भागात लिंबू लागवड मोठ्या प्रमाणात आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या मदतीने वीस वर्षांपूर्वी या गावात पहिला महिला बचत गट स्थापन झाला. त्यानंतर या गटातील महिलांना होणारे फायदे पाहून अन्य महिला जोडल्या जाऊ लागल्या. आतापर्यंत ४९ महिला गट कार्यरत असून, त्या माध्यमातून सहाशेपेक्षा जास्त महिला एकत्र आल्या आहेत. दर महिन्याला शंभर ते दोनशे रुपयांच्या बचतीतून पंचवीस लाखांपेक्षा अधिक बचत झाली आहे. त्यातून महिला सक्षम होण्यास मदत झाली आहे.
संपर्क ः रूपाली वाकडे ः ७७०९५५५७५७
वंदना भागवत ः ९८५०८७०६३२
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.