Horticulture : द्राक्ष, डाळिंब शेतीत शिंदे बंधूंचा लौकिक

Grape Farming : सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यातील निमगाव (टें) येथील नागनाथ आणि बंडू या शिंदे बंधूंनी द्राक्ष-डाळिंब शेतीत मास्टरी मिळवली आहे. एकरी उत्पादकतेसह गुणवत्तेतही सातत्य ठेवले आहे.
Pomegranate Farming
Pomegranate Farming Agrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story : सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यातील निमगाव (टें) हे मूळ गाव असलेल्या नागनाथ व बंडू या शिंदे बंधूंची गावापासून टेंभुर्णी-कुर्डुवाडी महामार्गावर शिराळ (मा) येथे २२ एकर शेती आहे. सुमारे १५ वर्षांपासून त्यांना शेतीचा अनुभव आहे.

वडील हरिदास शेतीत करीत. दोघा शिंदे बंधूंचे शिक्षण जेमतेम १०-१२ वीपर्यंत झाले आहे. मात्र एखाद्या उच्चशिक्षित अभ्यासू शेतकऱ्याप्रमाणे त्यांनी द्राक्ष-डाळिंब शेतीत मास्टरी संपादन केली आहे. त्यांची पूर्वीची आर्थिक परिस्थिती फारच बिकट होती.

नागनाथ यांनी १९९७ मध्ये बारावीच्या शिक्षणानंतर ‘हॉटेल’मध्ये व्यवस्थापक म्हणून नोकरी स्वीकारली. तर बंडू यांनी दहावीनंतर वडिलांसोबत शेतीला सुरुवात केली. त्या काळी या भागात पाण्याचा फारसा स्रोत नव्हता.

पुढे २००५ मध्ये सीना-माढा उपसा योजना झाली. ऊस, केळी यांसारखी पिके होऊ लागली. मग शिंदे बंधूंनी २०१७ मध्ये पैशांची जुळवाजुळव करून धाडसाने या योजनेच्या साह्याने तीन किलोमीटरवरून पाइपलाइन केली. दोन एकरांत चार कोटी लिटर क्षमतेचे शेततळे तयार केले.

Pomegranate Farming
Agriculture Success Story : नाईकनवरे बंधूंनी माळरान जमीन केली कसदार

यशाची पाठ सोडली नाही

शेततळ्यातून पाण्याचा शाश्‍वत स्रोत तयार झाला. त्यानंतर ऊस, केळीची लागवड केली. मात्र त्यातून समाधानकारक यश अद्याप मिळत नव्हते. मग कापसेवाडीचे प्रयोगशील द्राक्ष उत्पादक नितीन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली २०१८ मध्ये द्राक्षशेतीचा विचार केला. सोबतच औदुंबर कुबेर यांच्या मार्गदर्शनातून डाळिंब शेतीचा निर्णय घेतला.

पाण्याचा खात्रीचा स्रोत, अभ्यासूवृत्ती, कष्ट व योग्य पद्धतीचे व्यवस्थापन यातून द्राक्ष व डाळिंब क्षेत्रात यश मिळत गेले. आज २२ एकरांत १३ एकर द्राक्षे, तीन एकर डाळिंब आहे. अडचणी, उपाय, गुणवत्ता, ‘मार्केट’ यांचा सतत अभ्यास यातून मागील चार वर्षांत या दोन्ही पिकांत शिंदे बंधूंनी चांगला हातखंडा निर्माण केला. प्रत्येक हंगामात त्यांना यशाची चव चाखायला मिळाली आहे.

व्यवस्थापनातील ठळक बाबी

डाळिंबाचे भगवा वाण लावले आहे. मार्चमध्ये बहर धरला जातो. सप्टेंबरमध्ये काढणी पूर्ण होते, दर ऑक्टोबरमध्ये एकरी चार ट्रॅाली शेणखताचा वापर होतो. डिसेंबरपर्यंत बाग ताणावर सोडली जाते. फेब्रुवारीमध्ये बागेची पानगळ केली जाते. मार्चमध्ये पुन्हा छाटणी व बाग स्वच्छ करून बहर धरला जातो.

बहरानंतर तिसऱ्या महिन्यात (मेच्या सुमारास) फळे लिंबाच्या आकाराची झाल्यानंतर ‘प्रोटेक्शन पेपर’चा वापर होतो. त्यामुळे फळांचे उन्हापासून संरक्षण होण्याबरोबर रंग आणि चकाकीही चांगली मिळते. द्राक्षाचे थॉम्पसन वाण आहे. पाच शेड्‍स उभारून दर्जेदार बेदाणा तयार केला जातो. माती, पान, देठ यांच्या तपासणीनुसार अन्नद्रव्यांची मात्रा दिली जाते.

Pomegranate Farming
Agriculture Success Story : फळबागेने दिली आर्थिक समृद्धी...

उत्पादनात सातत्य, उत्कृष्ट दर

मागील चार वर्षांत द्राक्ष व डाळिंबाचे एकरी १० ते १५ व काही प्रसंगी त्याही पुढे उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला आहे. सन २०२२ मध्ये बेदाण्याला प्रति किलोला १७५ रुपये, तर २०२३ मध्ये एकरी साडेचार टन उत्पादित बेदाण्याला १५० रुपयांचा उल्लेखनीय दर मिळाला. यंदाही बेदाण्याचे एकरी सरासरी साडेचार टन उत्पादन घेतले असून, त्यास १५० रुपयांपर्यंत दर मिळवण्यात शिंदे बंधू यशस्वी झाले आहेत.

डाळिंबालाही सातत्याने प्रति किलो ९० ते १०० रुपये दर मिळवला आहे. यंदा (२०२४) एकरी सरासरी नऊ टन उत्पादन, तर किलोला सर्वाधिक १८० रुपये दर मिळवला आहे. फळांच्या गुणवत्तेबाबत कधीच तडजोड केली नाही. म्हणूनच डाळिंब खरेदीसाठी थेट निर्यातदार दरवर्षी शेतावर येऊन जागेवर खरेदी करतात. डाळिंब दुबईसह आखाती देशांत निर्यात होते.

एकत्रित कुटुंबाचे प्रगतीला बळ

सुमारे ११ सदस्यांचे शिंदे यांचे एकत्रित कुटुंब आहे. आपल्याला शिक्षण घेणे शक्य झाले मसले तरी मुलांना मात्र उच्चशिक्षण देण्यात शिंदे बंधूंनी कोणती कसर ठेवलेली नाही. नागनाथ यांची मोठी मुलगी निकिता कृषी पदवीधर असून स्नेहा ‘बीएएमएस’ तर मुलगा निखिल कृषी पदवीचे शिक्षण घेतो आहे. बंडू यांची मुलगी प्राजक्ता ‘बीफार्मसी’ तर मुलगा रोहन बारावीत आहे. नागनाथ यांच्या पत्नी सौ. सविता आणि बंडू यांच्या पत्नी सौ. सुनीता या दोघीही शेतीत हिरिरीने सहभाग घेतात. एकत्रित कुटुंबाची ताकद हीच शेतीतील प्रगतीचे मुख्य बळ ठरली आहे.

नागनाथ शिंदे ९४२०४९२२४४

बंडू शिंदे ९४२३०६६६८८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com