Agri Success: सोयाबीन बीजोत्पादनामध्ये सासुरे (ता. बार्शी, जि. सोलापूर) येथील ‘होलोसेन ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी’ने अल्पावधीतच नावलौकिक मिळवला आहे. तसेच ‘चंद्रभागा’ नावाने सोयाबीन बियाण्याचा ब्रॅण्ड तयार केला आहे. काटेकोर पीक व्यवस्थापनातून खात्रीशीर बियाणे निर्मिती करून कंपनीने शेतकऱ्यांमध्ये आपली विश्वासार्हता निर्माण केली आहे..सोलापूर-बार्शी महामार्गावर सासुरे हद्दीत ‘होलोसेन ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी’ कार्यरत आहे. कलाशिक्षक असणारे रवींद्र खटाळ यांच्या पुढाकारातून २०२० मध्ये ही कंपनी सुरू झाली. रवींद्र खटाळ हे शेतकरी कुटुंबातील असून कलाशिक्षक आहेत. पण नोकरीपेक्षा त्यांची ओढ कायम शेतीकडे होती. साकत हे त्यांचे मूळगाव. घरच्या वडिलोपार्जित शेतीमध्ये सोयाबीनसह पारंपरिक पिके घेतली जातात..त्यामुळे लहानपणापासूनच त्यांनी शेती पाहिली आणि वडिलांबरोबर शेतीत राबून अनुभवलीही. अनेक वेळा दर्जेदार बियाण्यांचा अभाव, बाजारातील शेतकऱ्यांची होणारी लूट आणि त्यातून होणारे आर्थिक नुकसान हे त्यांनी जवळून पाहिले होते. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी काही तरी करायचं, हे त्यांच्या मनात पक्क होतं. त्यातूनच २०२० मध्ये गावातील सहकारी बालाजी मोरे यांना सोबत घेऊन त्यांनी ‘होलोसेन ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला..त्या माध्यमातून सोयाबीनचे दर्जेदार बियाणे तयार करण्याचा संकल्प केला. सुरुवातीला अनेक अडचणी आल्या, पण त्यावर मात करत त्यांनी मार्ग शोधलाच. आज सोयाबीन बीजोत्पादनातील सोलापूर जिल्ह्यातील एकमेव कंपनी म्हणून कंपनीने नावलौकिक मिळविला आहे. कंपनीचा विस्तार सोलापूरसह शेजारील धाराशिव, लातूर आदी जिल्ह्यांपर्यंत पोहोचला आहे. आज कंपनीचे अध्यक्ष म्हणून स्वतः रवींद्र खटाळ हे काम पाहत असून, सचिव म्हणून बालाजी मोरे यांच्याकडे जबाबदारी आहे. त्याशिवाय स्नेहा गायकवाड (वैराग), शिवाजी मोरे (बावी), प्रियांका मोरे (बावी) हे संचालक पदाची धुरा सांभाळत आहेत..Agriculture Success Story: असंख्य संकटातूनही फुलविले डाळिंबाचे स्वप्न.सोयाबीन बीजोत्पादनात पाऊलबार्शी तालुक्यात सर्वाधिक सोयाबीन लागवड असते. बार्शीसह शेजारील मोहोळ, माढा, उत्तर सोलापुरातही खरिपामध्ये सोयाबीनचे मोठे क्षेत्र असते. हीच बाब ध्यानात घेऊन आपल्या भागातील सोयाबीनचे क्षेत्र, बियाणांची गुणवत्ता, बियाणांची गरज आदी बाबींचा विचार करून कंपनीने सोयाबीन बीजोत्पादनात पाऊल ठेवले. हळूहळू काम सुरू झाल्यानंतर बार्शीसह शेजारील तालुक्यातील शेतकऱ्यांपर्यंत कंपनीचे काम पोचले. त्यातूनच आज कंपनीचे ११५० इतके सभासद झाले. शिवाय आज कंपनीकडे २० कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांनाही या माध्यमातून रोजगार मिळाला आहे..थेट बांधावर मार्गदर्शनबीजोत्पादनासाठी प्लॉट निश्चित केल्यानंतर शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे पुरविले जाते. साधारण जून-जुलैमध्ये सोयाबीनची पेरणी होते. बीजोत्पादनासाठी घेतलेल्या पिकामध्ये लागवडपूर्व कामांपासून ते काढणीपर्यंत व्यवस्थापनाविषयी शेतकऱ्यांना वेळोवेळी तांत्रिक माहिती दिली जाते. त्यामध्ये बीजप्रक्रिया करण्याची शास्त्रीय पद्धती, पेरणी पद्धत, सिंचन नियोजन यासह संपूर्ण पीक कालावधीतील व्यवस्थापनाबाबत तांत्रिक माहिती पुरवली जाते. शेतकरी कंपनीचे प्रतिनिधी वेळोवेळी शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करतात, सूचना देतात. प्रत्येक शेतकऱ्याकडील बीजोत्पादनाच्या प्लॉटसह पिकाच्या नोंदीची माहिती घेतली जाते..सोयाबीन बीजोत्पादनातील बाबीऑक्टोबरमध्ये सोयाबीनची काढणी करून पुढे नोव्हेंबरपासून खरेदी सुरू होते.शेतकऱ्यांनी कंपनीत सोयाबीन आणल्यानंतर पहिल्यांदा त्याचे वजन करून त्यानंतर क्लिनिंग, ग्रेडिंग केले जाते.प्रत्येक शेतकऱ्याला देण्यात आलेल्या वाणाचे बियाणे, त्याचा लॉट क्रमांक वगैरे नोंदी कंपनीकडे आधीपासूनच उपलब्ध असतात.त्या लॉटनुसार शासकीय प्रयोगशाळेत बियाण्याच्या तपासणीसाठी तो लॉट पाठवला जातो. तत्पूर्वी कंपनीद्वारे स्वतः वेगवेगळ्या पातळ्यांवर सोयाबीनच्या लॉटची पडताळणी केली जाते..त्यानंतर हे बियाणे शासकीय प्रयोगशाळेच्या चाचणीत ७० टक्क्यांपर्यंत उगवणशक्तीला पात्र ठरले, तर संबंधित शेतकऱ्याला अतिरिक्त दर दिला जातो.सोयाबीनची काढणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याकडून लॉटनुसार कंपनीच्या गोदामात सोयाबीनची साठवणूक केली जाते.पुढे हे सोयाबीन कंपनीकडून बियाणे म्हणून पॅकिंग, ब्रॅण्डिंग करून विक्रीसाठी बाजारात पाठविले जाते..बीजोत्पादनाचा चढता आलेखसोयाबीन बीजोत्पादनाला कंपनीने प्रत्यक्षात २०२३ मध्ये सुरुवात केली. पहिल्या वर्षी शेतकऱ्यांना बीजोत्पादनासाठी तयार करणे, योग्य व्यवस्थापन करून उत्तम प्रतीचे बियाणे मिळवणे, हे मोठे आव्हान होते. मात्र तरीही पहिल्या वर्षी २०२३ मध्ये ६ टन बियाणे तयार करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या वर्षी तब्बल ८ पटीने अधिक म्हणजे ५० टन बियाणे तयार केले. या वर्षी २०२५ मध्ये तब्बल ३०० टन बियाणे कंपनीने तयार केले आहे..Farmer Producer Company: शेतकरी कंपन्यांना कृषी उद्योगाची साथ .सोयाबीन खरेदी केंद्रसोयाबीन बीजोत्पादनात नावलौकिक मिळविल्यामुळे यंदा कंपनीला शासकीय मान्यताप्राप्त हमीभाव खरेदी केंद्र म्हणूनही शासनाची मान्यता मिळाली आहे. सध्या सोयाबीनची खरेदी सुरू असून आतापर्यंत १ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. तर ३००० क्विंटल सोयाबीनची खरेदी कंपनीच्या केंद्रावरून झाली आहे..शेतकरी कंपनीची वैशिष्ट्येशेतकरी कंपनीच्या सभासदांना बियाणांमध्ये सवलत.विधवा महिला शेतकऱ्यांना ५० टक्के सवलतीत बियाणे.शेतकऱ्यांना सोयाबीन उत्पादनाविषयी वेळोवेळी मार्गदर्शन.खरेदीसाठी मोफत नोंदणीची सुविधा..बीजोत्पादनासाठी कृषी विद्यापीठाचे मूलभूत बियाणेकंपनीच्या संचालक मंडळातील सर्व जण स्वतः सोयाबीन उत्पादक असल्याने त्यांना सोयाबीनच्या उत्पादनाची चांगली माहिती आहे. त्याचा सोयाबीन बीजोत्पादनात मोठा फायदा झाला. त्यानंतर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांच्याकडील सोयाबीनच्या एमओयूएस ६१२, एमओयूएस १६२ आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्याकडील केडीएस ९९२, केडीएस ७५३, केडीएस ७२६ या वाणाच्या सोयाबीनचे मूलभूत बियाणे मिळवून त्या आधारे त्यांनी बीजोत्पादनाला सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात सध्या बार्शीसह परिसरातील ५० शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बीजोत्पादनाचे प्लॉट करण्यात आले आहे..एकरी २० किलो बियाणे पुरेसेसोयाबीन असो किंवा अन्य कोणत्याही पिकात बियाण्यांच्या गुणवत्तेला अनन्यसाधारण महत्त्व असते. त्यामुळे बियाणे उत्तम असेल आणि योग्य पद्धतीने व्यवस्थापन केल्यास उत्पादन आणि उत्पन्नवाढ ही मिळतेच, असे कंपनीचे अध्यक्ष रवींद्र खटाळ म्हणतात. त्याबाबत सांगताना ते म्हणतात, की पेरणीसाठी सहसा शेतकरी एकरी ३० किलो बियाणे वापरतात, खासगी कंपन्यांही ३० किलोचीच शिफारस करतात. याच पद्धतीने बियाण्यांची पाकिटेही बाजारात मिळतात, पण आम्ही एकरी २० किलो बियाणे पुरेसे आहे, असे सांगतो, तशीच शिफारस करतो. कारण बियाण्यांचा दर्जा, उगवणक्षमता चांगली असल्यास विनाकारण जादा बियाण्याचा वापर आणि त्यासाठी अतिरिक्त खर्च करण्याची गरज नाही, असे ते म्हणाले..सोयाबीनशिवाय आता उडीद आणि कांदा बीजोत्पादनातही आम्ही उतरत आहोत. भविष्यात वायदेबाजाराच्या क्षेत्रात पाऊल ठेवण्याचे नियोजन आहे. सध्या हळद आणि धने यावर आमचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांना शेतमालाचा योग्य दर मिळावा, त्यांच्या कष्टाला किंमत मिळावी, हाच त्यामागील उद्देश आहे.रवींद्र खटाळ, ९७६७३५३५३४ अध्यक्ष, होलोसेन ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी.मी यंदा ६ एकर सोयाबीन केले होते. होलोसेन कंपनीचे चंद्रभागा ब्रॅण्डखालील सोयाबीन बियाणे एकरी २० किलो वापरले. योग्य पद्धतीने व्यवस्थापनातून यंदा मला एकरी १० क्विंटलचा उतारा मिळाला, जो पूर्वी ५-६ क्विंटलपर्यंत होता. शिवराज निचळ, शेतकरी, राळेरास, ता. बार्शी, जि. सोलापूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.