डॉ.रामेश्वर भोसले
एकात्मिक मत्स्यपालन हे जलसंवर्धनासाठी उपयुक्त आहे. मासे, पिके आणि जनावरांचे एकत्रित संवर्धन केले जाते. एकात्मिक मत्स्यपालनामध्ये शाश्वत पद्धतींचा वापर करून आर्थिक उत्पन्न वाढविता येणे शक्य आहे. ही पद्धती पर्यावरणीय संतुलन नियंत्रणात ठेवते.
विविध पशुधन आधारित संवर्धनापैकी, मासे व बदक एकत्रीकरण संवर्धन ही पद्धत सर्वात लोकप्रिय म्हणून ओळखली जाते. एकात्मिक मत्स्य शेती हे शेती किंवा इतर कोणत्याही पशुपक्षी एकत्रीकरण करून संवर्धन केले जाते. एकात्मिक मत्स्यपालन हे मिश्र शेतीचे उत्तम उदाहरण आहे. मुख्यतः पूर्व आणि दक्षिण पूर्व आशियायी देशांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात या प्रकारच्या शेती पद्धती हे एक महत्त्वाचे पर्यावरणीय संतुलित शाश्वत तंत्रज्ञान आहे.
('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
शेतातील कचऱ्याच्या पुनर्वापरावर, एकात्मिक मत्स्यशेतीचा एक महत्त्वाचा घटक शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे कारण यामुळे उत्पादनाची अर्थव्यवस्था सुधारते आणि शेतीचा प्रतिकूल पर्यावरणीय परिणाम कमी होतो.एकात्मिक मत्स्यशेतीतील तत्त्वांचे पालन करताना एका जैविक प्रणालीतील टाकाऊ पदार्थ दुसऱ्या जैविक प्रणालीसाठी पोषक म्हणून काम करतात. मासे आणि वनस्पतींच्या एकत्रीकरणामुळे बहुसंस्कृती निर्माण होते. ज्यामुळे विविधतावाढते आणि त्यापासून अनेक उत्पादने मिळतात. जैविक पुनर्संचलनाद्वारे पाण्याचा पुनर्वापर केला जातो.
एकात्मिक मत्स्यपालनाचे तंत्र
एकात्मिक मत्स्यपालनामध्ये माशांच्याबरोबर कुक्कुटपालन, पीक लागवड आणि पशुपालन केले जाते. शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये विविधता आणताना उपलब्ध संसाधनांचा जास्तीत जास्त वापर करणे आणि अपव्यय कमी करणे हा या दृष्टिकोनाचा उद्देश आहे.
मासे आणि बदक एकात्मिक संवर्धन प्रणाली
मत्स्य तलावाच्या बांधावर बदकांचे संगोपन केले जाते. तमिळनाडू, आसाम, बिहार, आंध्र प्रदेश, त्रिपुरा, ओरिसा, कर्नाटक, केरळ आणि उत्तर प्रदेशमध्ये या संवर्धन पद्धतीचा अवलंब केला जातो. प्रति एक हेक्टर तलावाच्या क्षेत्रामध्ये सुमारे ३०० ते ३५० बदकांचे संगोपन केले जाते. बदक हे जलीय कीटकांचे नियंत्रित करते. प्रत्येक बदकाला राहण्यासाठी सुमारे ०.३ ते०.५ चौरस मीटर क्षेत्र आवश्यक असते. या प्रकारच्या संवर्धनात एकूण उत्पादन सुमारे प्रति हेक्टरी ३,५०० ते ५,००० किलो मासे, १५,००० बदकांची अंडी आणि ६०० किलो बदकाचे मांस मिळते.बदकांची विष्ठा प्राथमिक उत्पादनासाठी खत म्हणून वापरली जाते. या संवर्धन पद्धतीचा दुसरा फायदा असा होतो की, माशाचा पूरक खाद्य खर्च ६० टक्यांपर्यंत कमी होते.
जनावरे आणि मासे एकात्मिक संवर्धन प्रणाली
एकात्मिक संवर्धन प्रणालीमध्ये लहान तलावांमध्ये खात्रीशीर मत्स्योत्पादनासाठी एकात्मिक पशुपालन आणि मत्स्यपालन ही एक उत्तम पद्धत आहे. यामध्ये तलावाच्या बंधाऱ्यावर किंवा शेताच्या इतर कोणत्याही योग्य जागेचा वापर करून मत्स्य उत्पादन वाढविले जाते. साधारणपणे एक हेक्टर तळ्याच्या क्षेत्रासाठी शेण पुरवठा करायचा असेल तर दहा गाईंचे संगोपन आवश्यक आहे. गाईचे शेणाचा वापर तळ्यातील माशांसाठीचे नैसर्गिक खाद्य वाढविण्यासाठी उपयोग होतो. त्यामुळे माशांसाठी कृत्रिम खाद्याचा खर्च कमी होतो.
तलावामध्ये मत्स्यबीज साठवून ठेवण्यापूर्वी सुमारे दोन महिने अगोदर गाय गोठ्यामध्ये आणावी. गाईचे शेण हे तलावाच्या पाण्यात दररोज सोडले जाते तथापि, तलावामध्ये मत्स्यबीजांचा साठा करण्यापूर्वी सुरवातीला सर्व तलावात शेणखत टाकले जाते.या एकात्मिक शेती प्रणालीमध्ये वर्षभरात प्रति हेक्टरी माशांचे ३,५०० किलो उत्पादन मिळू शिकते. या सोबत संगोपन केलेल्या गाईंपासून दुधाचे उत्पादन मिळते.
कुक्कुटपालन आणि मासे एकात्मिक संवर्धन प्रणाली
कुक्कुटपालनासह एकात्मिक मत्स्यपालन केले जाते. कारण कोंबडी खत हे मत्स्य तलावांसाठी अत्यंत कार्यक्षम खत आहे. कोंबडी विष्ठेमध्ये २ टक्के नायट्रोजन, १.२५ टक्के फॉस्फोरिक ॲसिड आणि ०.७५ टक्के पोटॅश असते. प्रति वैयक्तिक कोंबडीच्या कमी आहार, माशांसह कुक्कुटपालन हे शेतकऱ्यांसाठी एक सामान्य गुंतवणूक बनवते. खाद्य अपव्यय टाळण्यासाठी हॉपर्समध्ये कोंबड्यांना खाद्य दिले जाते. सर्व कोंबड्यांना नेहमी पाण्याचा मुबलक पुरवठा केला जातो. प्रत्येक ५ ते ६ कोंबड्यांसाठी एक घरटे दिले जाते. कोंबड्यांचे अंडी उत्पादन २२ आठवड्यांच्या वयापासून सुरवात होते आणि नंतर हळूहळू कमी होते. कोंबडी दरवर्षी २०० ते २५० अंडी घालते. या एकात्मिक शेती प्रणालीमध्ये माशांचे प्रति वर्ष प्रति हेक्टरी ३,००० किलो उत्पादन मिळते.
भातासह मत्स्य एकात्मिक संवर्धन प्रणाली
बिहार, पश्चिम बंगाल, ओरिसा आणि आसाम या राज्यांमध्ये या पद्धतीने एकात्मिक संवर्धन केले जाते. या पद्धतीसाठी भाताच्या शेतात पुरेसे पाणी साठवले जाते. भातशेतीमध्ये वर्षभरात ३ ते ८ महिने पाणी टिकवून ठेवले जाते. बांध अडवून त्यामध्ये मासे सोडले जातात. अलीकडच्या वर्षांत कीटकनाशकांच्या वापरामुळे या पद्धतीचा वापर कमी झाला आहे. या शेती पद्धतीतून माशांचे वर्षातून दोनदा उत्पादन घेता येते. दोन हंगामातील एक हेक्टर भात लागवडीतून चांगल्या प्रकारे भाताचे उत्पादन मिळते. तसेच काही प्रमाणात मत्स्य उत्पादनही मिळते.
- डॉ.रामेश्वर भोसले, ९८३४७११९२० (मत्स्य विज्ञान महाविद्यालय, उदगीर जि. लातूर)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.