
पुणे येथील कृषी महाविद्यालयांतर्गत माती- पाणी चिकित्सालय विभाग कार्यरत आहे. येथे शेतकऱ्यांना माती- पाणी परीक्षण (Soil And Water Testing) करून देण्यात येते. विभागात याच विषयातील शैक्षणिक कार्यानुभव मोड्यूल विकसित करण्यात आले आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत (Mahatma Phule Agriculture University) हे महाविद्यालय कार्यरत आहे. विद्यापीठाने २०१८-१९ मध्ये दोन लाख रुपयांचा फिरता निधी उपलब्ध करून दिला. त्यातून विद्यार्थ्यांना माती- पाणी परीक्षण विषयात कौशल्याधारित प्रशिक्षण (Skill Based Training On Soil and Water Testing) देणे हा उद्देश आहे.
विद्यार्थ्यांना प्रशिक्षण
मोड्यूलअंतर्गत पदवीच्या शेवटच्या वर्षातील किंवा सातव्या ते आठव्या सेमिस्टरमधील विद्यार्थ्यांची निवड केली जाते. त्यांना मध्य प्रदेशातील भोपाळ येथील भारतीय मृदा संशोधन संस्थेत अत्याधुनिक प्रशिक्षण देण्यात येते. या प्रकल्पात मुख्यतः ऊस व त्यातही खोडवा पिकाची निवड केली आहे. हे विद्यार्थी डिसेंबर ते एप्रिल काळात राज्यातील साखर कारखान्याच्या मदतीने निवडलेल्या शेतकऱ्यांकडून माती नमुने गोळा करतात. नमुना कसा काढावा इथंपासून ते प्रयोगशाळेपर्यंत तो आणण्याच्या पद्धतीचेही प्रशिक्षण देण्यात येते. मोड्यूल व्यवस्थापक डॉ. धर्मेंद्रकुमार फाळके, सहयोगी व्यवस्थापक डॉ. दीपक सावळे, डॉ. अभय पाटील व संदेश देशमुख येथे कार्यरत आहेत. विद्यापीठाच्या मृद्विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. बापूसाहेब भाकरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
विद्यार्थ्यांकडून या घटकांचे परीक्षण
प्रयोगशाळेत प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली नमुन्यांचे रासायनिक परीक्षण करण्यातही विद्यार्थी तयार होतात. मातीचा सामू, विद्युत वाहकता, सेंद्रिय कर्ब, उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाश, मुक्त चुन्याचे प्रमाण, उपलब्ध लोह, जस्त, मंगल, तांबे आदी घटकांचे परीक्षण होते. त्यानंतर नमुना घेतलेल्या शेतकन्याच्या नावाने मृदा आरोग्य पत्रिका ते तयार करतात. त्यात पूर्ण नाव, पत्ता, सर्वे- गट क्र., लॅब क्र. मृद् चाचणी अहवाल आदी बाबींचा समावेश असतो. शिवाय एकरी १०० टन खोडवा उत्पादनासाठी आवश्यक खतमात्रांचे वेळापत्रकदेखील असते. साखर कारखाना यंत्रणेमार्फत शेतकऱ्यांपर्यंत त्याचे वितरण होते. प्रति नमुना एक हजार रुपये शुल्क आहे.
संगणक प्रणाली, सल्ला, फलश्रुती
माती-पाणी परीक्षण आधारित अपेक्षित उत्पादनासाठी ऊस क्रांती संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. सन २०१८ ते २०२१ या कालावधीत ४०३० मृद् आरोग्यपत्रिका व मार्गदर्शिका ऊस उत्पादकांना वितरित करण्यात आल्या. आता आडसाली लागवडीच्या उसासाठीही मार्गदर्शिका तयार केली आहे. त्यातील माहिती शेतकऱ्यांना वाचण्यास सांगून तशी अंमलबजावणी प्रत्यक्ष शेतात करण्याविषयी सल्ला दिला जातो. संबंधित प्राध्यापक व विद्यार्थी प्रत्यक्ष शेताला भेट देऊन देखील मार्गदर्शन करतात. त्याचे फळ म्हणूनच शेतकऱ्यांना खोडवा उसाचे उत्पादन एकरी ४० ते ५० टनांवरून ७७ टन ते १०४ टनांपर्यंत मिळाल्याचे आढळले आहे. यंदा ऑक्टोबर ते एप्रिल २०२३ या कालखंडात पूर्वहंगामी, सुरू व खोडवा उसाच्या विक्रमी उत्पादनासाठी राज्यात पाचहजार मृद् आरोग्य पत्रिका व मार्गदर्शिका देण्यासाठी आमचे मोड्यूल कटिबद्ध असल्याचे डॉ. फाळके यांनी सांगितले.
मोड्यूल अंतर्गत ठळक बाबी
-डिसेंबर, २०२१ ते मार्च २०२२ या काळात या उपक्रमांतर्गत राज्यातील १६ जिल्ह्यांतील ५५ तालुक्यांचा समावेश. प्रामुख्याने १६ साखर कारखान्यांच्या परिसरातील १८०० शेतकऱ्यांची निवड.
- यात पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आदी भागांतील खासगी व सहकारी साखर कारखान्यांच्या यंत्रणेचा सहभाग.
-उपक्रमाचा व्यापक प्रसार व जनजागृतीसाठी प्रशिक्षण साहित्य निर्मिती, प्रशिक्षणे, शेतकरी मेळावे यांचे आयोजन. साखर आयुक्तालय, कृषी विभाग, विस्मा, पुणे तसेच राज्यातील सहकारी व खासगी साखर कारखाने यांची मदत. राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड, सहसंचालक ऊस विकास पांडुरंग शेळके व विस्माचे कार्यकारी संचालक अजित चौगुले यांचे बहुमोल सहकार्य.
सहभागी विद्यार्थी संख्या- सन २०१७ ते २०२२ पर्यंत- ३४ ते ४८ पर्यंत.
तपासलेले माती नमुने :
वर्ष --- माती नमुने
२०१७ --- ४५०
२०१८ -- ७५०
२०१९ -- १०००
२०२० --- ३०
२०२१ -- १८००
संपर्क : डॉ. डी. एच. फाळके, ९८९०४७५४६४, ९४२०४८६६५०
(मोड्यूल व्यवस्थापक)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.